‘मगो’च्या परिवर्तन यात्राने गोवा विधानसभा निवडणूक प्रचाराचा श्रीगणेशा

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 28 फेब्रुवारी 2021

येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राजकीय परिवर्तन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वात जुन्या ‘मगो’ पक्षाने कालपासूनच निवडणूक प्रचाराला सुरवात केली.

पणजी : येत्या विधानसभा निवडणुकीत राज्यात राजकीय परिवर्तन व्हावे, यासाठी राज्यातील सर्वात जुन्या ‘मगो’ पक्षाने कालपासूनच निवडणूक प्रचाराला सुरवात केली. राज्यभरात परिवर्तन यात्राही पक्ष काढणार असून १९ मतदारसंघात पहिल्या टप्प्यातील प्रचार सुरू करण्याचे नियोजन पक्षाने केले आहे. पक्षाने कालच्या घडीला प्रचार सुरु करून राजकीय पटलावर आघाडी घेतली आहे. ‘मगो’च्या केंद्रीय समितीची निवडणूक लोकशाही पद्धतीने झाली. पक्षाच्या सदस्यांनी अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या नेतृत्वावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब केले.

मोप विमानतळासाठी धारगळ गावालाही 'प्रकल्पग्रस्त' दर्जा मिळण्याची शक्यता

त्यांच्या नेतृत्वाखाली नवी समिती आता कार्यरत झाली आहे. राज्यभरातील संघटनात्मक बांधणी, राजकीय समीकरणे जुळवणे, लोकांचा कल पाहून उमेदवारी ठरवणे यासाठी पक्षाला वर्षभराचा कालावधी तसा अपुरा पडेल हे गृहित धरून इतर पक्ष पालिका निवडणुकीच्या तयारीत गुंतले असतानाच ‘मगो’ने विधानसभा प्रचाराचा श्रीगणेशा केला आहे. परंपरेप्रमाणे म्‍हार्दोळ येथील श्री महालसा देवीच्या आशीर्वादाने मगोने प्रचाराचे पाऊल पुढे टाकले तरी या प्रचाराचे लोण ते अल्पावधीत राज्यभरात नेणार आहेत. मगोची उमेदवारी मिळावी, यासाठी पक्षाकडे अनेकांनी संपर्क साधला आहे.

Goa Budget 2021: गोवा अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून

`मगो’ला विधानसभा निवडणूक मुदतपूर्व घेतली जाईल अशी शक्यता वाटते. ‘मगो’चे नेते, आमदार सुदिन ढवळीकर यांनी मेमध्येही विधानसभा निवडणूक झाल्यास आश्चर्य नाही, असे वक्तव्य केले आहे. सध्या कॉंग्रेस व ‘मगो’तून भाजपमध्ये गेलेल्या १२ आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. सभापती राजेश पाटणेकर यांनी आमदारांच्या बाजूने निकाल दिला तर कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर व ढवळीकर न्यायालयात जातील हे ठरून गेलेले आहे. आमदारांच्या विरोधात सभापतींचा निकाल गेला तर आमदार न्‍यायालयात दाद मागतील. त्यामुळे याचा परिणाम राजकारणावर होणार आहे. त्याचे गणित मांडून ‘मगो’ने प्रचाराचे बिगुल फुंकले आहे.

"`मगो’ला जनाधार आहे. अनेक युवक ‘मगो’कडे येत आहेत. युवा वर्गाकडे राजकारणाची धुरा असावी, असे पक्षाचे धोरण आहे. येत्या काही महिन्यांत राज्यभरात ‘मगो’ची ध्येयधोरणे नव्याने पोचलेली असतील. वीज, पाणी मोफत देण्यासह अनेक योजना गोमंतकीयांसाठी `मगो’ राबवणार आहे."

- दीपक ढवळीकर, मगोचे अध्यक्ष.

‘मगो’चे मतदारसंघ

मांद्रे, पेडणे, मडकई, प्रियोळ, शिरोडा, फोंडा, सावर्डे, कुडचडे, डिचोली, मये, म्हापसा, साखळी, वाळपई, दाबोळी, मुरगाव, वास्को, शिवोली, हळदोणे व थिवी.

संबंधित बातम्या