राज्याच्या सीमा खुल्या झाल्याने शॅकचालकांना दिलासा

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन खात्याने एकूण ३६४ शॅक्सना परवानगी दिली आहे. त्यातील २५९ उत्तर गोव्यात तर १०५ शॅक्स दक्षिणेत आहेत. ऑक्टोबर ते मे या काळात शॅक व्यवसाय सुरू असतो.

पणजी: राज्यात आजपासून मद्यालये तसेच आंतरराज्य सीमा खुल्या झाल्याने शॅकचालकांना दिलासा मिळाला आहे. पुढील महिन्यापासून किनारपट्टी भागात शॅक व्यवसायाला सुरवात होणार आहे. पर्यटन स्थळ असलेल्या गोव्यात देशी पर्यटक येण्यास सुरवात होईल, अशी अपेक्षा आहे. त्या दृष्टीने काही शॅकचालक उत्सुक आहेत. पर्यटन संचालकांची आज भेट घेतली जाणार असल्याची माहिती शॅक मालक संघटनेचे अध्यक्ष क्रुझ कार्दोज यांनी दिली. 

राज्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटन खात्याने एकूण ३६४ शॅक्सना परवानगी दिली आहे. त्यातील २५९ उत्तर गोव्यात तर १०५ शॅक्स दक्षिणेत आहेत. ऑक्टोबर ते मे या काळात शॅक व्यवसाय सुरू असतो. मात्र, गेल्यावर्षी या व्यवसाय सुरू होण्यास नोव्हेंबरचा शेवटचा आठवडा उजाडला होता. जेमतेम साडेतीन महिने हा व्यवसाय झाल्यानंतर मार्च अखेरीस कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर देशात तसेच राज्यात टाळेबंदी झाल्याने या व्यवसाय ठप्प झाला होता. मात्र, शॅक चालकांनी संपूर्ण मोसमासाठीचे पर्यटन खात्याला तसेच अबकारी खात्याकडे शुल्क जमा केले होते. सुमारे अडीच महिन्याचा व्यवसाय वाया गेल्याने अनेकांना नुकसान सोसावे लागले होते. त्यामुळे उद्या २ सप्टेंबरला संघटनेचे पदाधिकारी काही शॅक मालक पर्यटन संचालकांची भेट घेणार आहेत. गेल्यावर्षी मोसमाचे संपूर्ण शुल्क जमा केले होते. त्यामुळे यावर्षीच्या शॅक व्यवसायात सूट देण्याची विनंती करण्यात येणार असल्याची माहिती कार्दोज यांनी दिली. 

पर्यटक मिळतील याची शाश्‍वती नाही!
राज्यातील सीमा खुल्या केल्‍या, तरी कोरोनाचा संसर्ग अजूनही कमी झालेला नाही. त्यामुळे गोव्यात किती प्रमाणात देशी पर्यटक येतील यावरच शॅक व्यवसाय सुरू करावा की नाही हे अजून ठरलेले नाही. समुद्रकिनाऱ्यावर साध्या पद्धतीने शॅक उभारणी केली तरी किमान एक लाख तर आकर्षित करणारा शॅक उभारायचा झाल्यास तीन लाख रुपये खर्च आहे. हा खर्च करून पर्यटक येतील की नाही याचाही संशय आहे. आंतरराष्ट्रीय विमान सेवा सध्या बंदच आहे. त्यामुळे विदेशी पर्यटक येण्याची शक्यता कमीच आहे. हा व्यवसाय पर्यटक गोव्यात येणाऱ्यावर अवलंबून आहे. तसेच कोविडच्या मार्गदर्शक सूचनांचे पालन करणे हा सुद्धा मोठा प्रश्‍न आहे. त्यामुळे शॅक सुरू करण्यासाठी अनेक अडचणी आहेत. त्या दूर करताना शॅक मालकांच्या नाकीनऊ येणार आहे. त्यामुळे ज्याला हा शॅक व्यवसाय सुरू करायचा आहे त्याला मोकळीक दिली जाईल व त्याने तो त्याच्या जबाबदारीवर करण्याची सूचना केली जाईल असे कार्दोज यांनी माहिती दिली.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या