फर्मागुढीत ‘दिलासा’मध्ये रुग्ण तपासणी सुरू

Narendr Tari
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ अखेर कोविड इस्पितळात रूपांतर केल्यानंतर तालुका व लगतच्या भागातील रुग्णांची सोय करण्यासाठी फर्मागुढीतील ‘दिलासा’ इस्पितळाचा आधार घेण्यात आला आहे. फर्मागुढीतील या ‘दिलासा’ इस्पितळात सर्व तऱ्हेची रुग्ण तपासणी ‘ओपीडी’ व अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. रुग्णांनी ‘दिलासा’ला भेट द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

फोंडा
फर्मागुढीतील या ‘दिलासा’ इस्पितळात मर्यादित रुग्ण तपासणी होणार असल्याने तिस्क - फोंडा येथील आरोग्य केंद्राची पूर्वीची इमारत पुन्हा एकदा वापरात आणण्यासंबंधी निर्णय सरकार पातळीवर झाला आहे. त्यासाठी बंद असलेली ही वास्तू दुरुस्त करून त्यात रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे. या वास्तूची पाहणी आज (मंगळवारी) फोंड्याचे पालकमंत्री गोविंद गावडे यांच्यासह फोंड्याचे आमदार रवी नाईक, भाजपचे फोंड्यातील नेते सुनील देसाई व फोंडा पालिका मंडळासह सरकारी अधिकाऱ्यांनी केली.
फोंड्याचे जुने आयडी इस्पितळ पाडून त्या जागी नवीन इस्पितळ बांधण्यास सुरवात केल्यानंतर इस्पितळाचे कामकाज तसेच तपासणी याच प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीतून करण्यात आले होते. चार वर्षे ही इमारत इस्पितळ म्हणून कार्यरत होती. नवीन इस्पितळ सुरू झाल्यानंतर ही वास्तू बंद करण्यात आली होती. आताही आमदार रवी नाईक यांनी वापराविना पडून असलेल्या या इमारतीचा वापर करण्यासंबंधी सूचना केली आणि त्यानुसार ही पाहणी करण्यात आली. या इमारतीत लसीकरण तसेच इतर कामकाज हाताळले जाईल.
सरकारने फोंड्यातील आयडी उपजिल्हा इस्पितळ कोविड केंद्रात केले असून अचानकपणे घेतलेल्या या निर्णयामुळे फोंडावासीय धास्तावले होते. त्यासाठी मगो पक्षाने आंदोलनही उभारले होते. मात्र, मुख्यमंत्र्यांनी शेवटी फर्मागुढीतील ‘दिलासा’ इस्पितळ फोंड्यातील रुग्ण तपासणीसाठी घेतले. या इस्पितळात अतिदक्षता विभागासह इतर रुग्ण तपासणी करण्यात येणार आहे तसेच आयडी इस्पितळातील सर्व डॉक्‍टर दिलासात उपलब्ध असतील. दिलासामध्ये सर्व ‘ओपीडी’ तसेच अतिदक्षता विभाग सुरू करण्यात आला आहे. फोंड्याच्या आयडी इस्पितळाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांच्यासह आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी रुग्ण सेवेसाठीची उपकरणे व इतर सोयीसुविधांबाबत प्रयत्न चालवले असून सर्व तऱ्हेची रुग्ण तपासणी सुरू करण्यात आली आहे.
सकाळी पालकमंत्री गोविंद गावडे व आमदार रवी नाईक यांच्यासह इतरांनी जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्राची पडून असलेल्या वास्तूची पाहणी करून या इमारतीत वीजपुरवठा तसेच दुरुस्तीकामासंबंधी सार्वजनिक बांधकाम खात्याला सूचना केल्या. येत्या पंधरवड्याभरात ही वास्तू रुग्णसेवेसाठी सज्ज होईल, असे मंत्री गोविंद गावडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना सांगितले. आमदार रवी नाईक यांनी शक्‍य तेवढ्या लवकर कार्यवाहीची सूचना केली.
दरम्यान, फर्मागुढीतील दिलासामध्येही मंत्री गोविंद गावडे व आमदार रवी नाईक यांनी अधिकाऱ्यांसमवेत भेट देऊन पाहणी केली. मंत्री गोविंद गावडे तसेच आमदार रवी नाईक यांनी तालुक्‍यातील लोकांना सोयिस्कर व्हावे यासाठी पुढाकार घेऊन विविध खात्यांच्या अधिकाऱ्यांशी बोलणी केली व सूचनाही केल्या.

फर्मागुढीत रुग्णसेवा सुरू
फर्मागुढी येथील ‘दिलासा’ इस्पितळात रुग्णसेवा सुरू करण्यात आली आहे. ‘दिलासा’मध्ये सर्व तऱ्हेच्या रुग्णांची तपासणी करण्यात येणार असून त्यात मेडिसीन, सर्जरी, गायनाकॉलॉजी, ऑर्थोपेडिक, ईएनटीसह अल्ट्रासाऊंड सोयही उपलब्ध करण्यात येणार असल्याचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. विकास कुवेलकर यांनी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.

‘डायलिसीस’, फार्मसी आयडीत
मुत्रविकारावर उपचार घेणाऱ्या रुग्णांवर डायलिसीसची सोय आयडी उपजिल्हा इस्पितळात करण्यात आली असून कोविड केंद्रापासून हा विभाग वेगळा असेल. याशिवाय फार्मसी, प्रयोगशाळा व कार्यालयीन कामकाजही आयडी उपजिल्हा इस्पितळ इमारतीतून चालणार आहे. जुन्या प्राथमिक आरोग्य केंद्र इमारतीत लसीकरण व इतर कामकाज हाताळले जाईल.

संपादन - यशवंत पाटील

संबंधित बातम्या