कोरोनातून मुक्‍त रुग्णांनी सतर्क रहावे

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

सरकारच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या सतर्कतेमुळे आज ‘कोविड’ महामारीचा धोका नियंत्रणात येत आहे. ‘कोविड-१९’ संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी गाफील न राहता, आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असतील, तर त्या रुग्णांनी आरोग्य खात्याने सुरू केलेल्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी केले आहे.

डिचोली : सरकारच्या प्रयत्नामुळे आणि जनतेच्या सतर्कतेमुळे आज ‘कोविड’ महामारीचा धोका नियंत्रणात येत आहे. ‘कोविड-१९’ संसर्गातून बरे झालेल्या रुग्णांनी गाफील न राहता, आरोग्याच्या बाबतीत काही समस्या असतील, तर त्या रुग्णांनी आरोग्य खात्याने सुरू केलेल्या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन डिचोलीचे आमदार तथा सभापती राजेश पाटणेकर यांनी केले आहे.

डिचोली सामाजिक आरोग्य केंद्रात पोस्ट ‘कोविड-१९’ क्‍लिनिकचे उद्‌घाटन केल्यानंतर सभापती पाटणेकर प्रमुख पाहुणे या नात्याने बोलत होते. ‘राष्ट्रीय आयुष मिशन’ अंतर्गत आरोग्य खात्यातर्फे हे क्‍लिनिक सुरू करण्यात आले आहे. कोविड संकटकाळातील तत्पर सेवेबद्दल डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राचे डॉक्‍टर आणि कर्मचारीवर्गाचे सभापती पाटणेकर यांनी अभिनंदन केले. 

यावेळी डिचोलीचे उपनगराध्यक्ष कुंदन फळारी, नगरसेवक विजयकुमार नाटेकर, अडवलपाल पंचायतीचे सरपंच नारायण साळगावकर, कर्करोगतज्ज्ञ डॉ. शेखर साळकर, डिचोली सामाजिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य अधिकारी डॉ. मेधा साळकर, क्‍लिनिकचे प्रमुख डॉ. पुष्पराज आमोणकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. कृपाली तेंडुलकर, डॉ. सिद्धी तसेच आरोग्य केंद्राचे कर्मचारी आदी उपस्थित होते.

कोविड संसर्गातून मुक्‍त झाल्यानंतर आरोग्याच्या बाबतीत इतर समस्या उद्‌भवण्याची शक्‍यता नाकारता येत नाही. तशी लक्षणे आढळून आल्यास नागरिकांनी पोस्ट ‘कोविड-१९’ क्‍लिनिकमध्ये येवून तपासणी करावी. या क्‍लिनिकमध्ये विविध आजारांवर तज्ज्ञ डॉक्‍टरांतर्फे तपासणी करून मार्गदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती डॉ. मेधा साळकर यांनी दिली. डॉ. पुष्पराज आमोणकर यांनी आभार मानले.

संबंधित बातम्या