पत्रादेवी ते महाखाजन जीवघेणा महामार्ग

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

जिथे सर्व्हीस रोड केले आहेत ते केव्हाच उखडून गेले आहेत. अनेक ठिकाणी मार्ग अर्धवट स्थितीत आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेकांचे बळीही गेलेले आहेत, तर काहीजणांना अपंगत्व आलेले आहे. या अशा मार्गावरून वाहन हाकणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे.

पेडणे:  तालुक्यातील पत्रादेवी ते महाखाजनपर्यंत राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १७ च्या चौपदरीकरणाचे काम २०१७ मध्ये सुरू झाले व अद्याप हे काम रडतखडत सुरू आहे. चौपदरीकरणाचे काम सुरू असले तरी वाहतुकीसाठी चांगल्या मार्गाची उपाययोजना करून देणे हे मार्गाचे कंत्राट घेतलेल्या कंत्राटदाराचे काम होते. त्याचे सदर कंत्राटदार पालन करत नसेल, तर सरकारने त्यावर उपाययोजना करणे गरजेचे होते, पण या कंत्राटदाराने सरकारलाच गुंडाळले आहे की काय अशी स्थिती आहे. सध्या या मार्गाची स्थिती इतकी भयानक झालेली आहे की, मार्गाला सर्वत्र मोठमोठ्या खड्ड्यांचे जाळेच तयार झालेले आहे.

जिथे सर्व्हीस रोड केले आहेत ते केव्हाच उखडून गेले आहेत. अनेक ठिकाणी मार्ग अर्धवट स्थितीत आहे. महामार्गाचे काम सुरू झाल्यापासून या मार्गावर अनेक अपघात झाले आहेत. त्यात अनेकांचे बळीही गेलेले आहेत, तर काहीजणांना अपंगत्व आलेले आहे. या अशा मार्गावरून वाहन हाकणे म्हणजे एक दिव्यच झाले आहे.

पत्रादेवी ते महाखाजनपर्यंतचे अंतर हे सुमारे २२ किलोमीटर आहे. राष्ट्रीय महामार्गांवर चारपदरी मार्ग करण्यासाठी प्रारंभ करण्याअगोदर अपवादात्मक थोडे अंतर वगळता राष्ट्रीय महामार्गाचे सुमारे दोन तीन वर्षे हॉटमिक्स डांबरीकरण झाले नव्हते, तर काही ठिकाणी मार्गाला खड्डेही पडले होते. तशाच अवस्थेत या चारपदरी मार्गाच्या कामाला सुरवात झाली.
राज्याची आणि पेडणे तालुक्याची जिथून हद्द सुरू होते अशा  पत्रादेवी येथे एक जुना रस्ता बांदाच्या बाजूने जातो, तिथे उड्डाण पुलाचे काम गेले बरेच महिने सुरू आहे. सध्या तेथे उतरणी, वळण तर दुसऱ्या बाजूने उड्डाण पुलाच्या बांधकामामुळे खोल भाग अशा मार्गावरून वाहतूक सुरू आहे. 

या ठिकणाहून काही अंतरावर जे दोन गतिरोधक घालण्यात आले आहेत, त्यांचा आकार, उंची पाहिली तर हे गतिरोधक आहेत की शेतीच्या मळ्यातील बांध असा प्रश्न पडतो. या गतिरोधकावरून जाताना चारचाकी वाहने घासतात, दुचाकीना अपघात होतात.

वाहनांची मोडतोड
सर्वसामान्य माणूस दुसरीकडे काटकसर करून, कर्ज घेवून स्कूटर, मोटारसायकल किंवा कार घेतो. परंतु अशा खड्डेमय रस्त्यामुळे वाहनांची मोडतोड होते. वाहने पुरती खिळखिळी होतात. सामान्य माणूस अशी खिळखिळी झालेली वाहने मोडीत काढून दुसरे वाहन खरेदी करू शकत नाही. सरकार वाहने रस्त्यावर चालविल्याच्या बदल्यात वाहनधारकाकडून रस्ता कर घेते. त्याबदल्यात रस्तेही चांगल्या स्थितीत ठेवणे हे सरकारचे कर्तव्य आहे. एका बाजूने सरकार विविध माध्यमातून जाहिरातीसाठी लाखो रुपये खर्च करून इंधन बचतीचे आवाहन करते, पण या अशा खड्डेमय मार्गावर वाहनांचा सतत कमी जास्त वेग करावा लागत असल्याने इंधनही जास्त प्रमाणात लागते. नोकरदांराना, व्यावसायिकांना नियोजित ठिकाणी वेळेवर पोहचता येत नाही. त्यामुळे आर्थिक व वेगवेगळ्या प्रकारे नुकसानी सहन करावी लागते.

सरकारने कडक भूमिका घ्यावी
सरकारला जर या मार्गाने प्रवास करणारे प्रवासी व स्थानिकांबद्दल काही आपुलकी, जिव्हाळा वैगेर असेल तर गोवा सरकारने आता या संथगतीने सुरू असलेल्या तसेच चांगल्या प्रवासासाठी आवश्यक उपाययोजना घेण्यासाठी आपले गुळमुळीत धोरण सोडून कडक धोरण अवलंबिणे गरजेचे आहे.

आरोग्यालाही धोका 
पाऊस गेल्यावर या मार्गावर सगळीकडे धुळीचे साम्राज्य असते. या मार्गावरून कशी तरी वाट काढत मार्गक्रमण करताना वाहनाबरोबर शरीराचीही वाट तर लागतेच, पण वाहनामुळे उडणाऱ्या धुरळ्यामुळे  दुचाकीस्वारांचे कपडे धुळीने माखून जातात व  उपाय नसल्याने काम पूर्ण होवून घरी परतेपर्यंत नाईलाजाने तशाच अवस्थेत तेच कपडे अंगावर ठेवून रहावे लागते. तसेच नाका तोंडातून हा धुरळा पोटात गेल्यामुळे व डोळ्यात गेल्याने दुचाकी प्रवाशांना तसेच शेजारी घरे असलेल्या लोकांना आरोग्याच्या अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.

महामार्गांच्या विश्वासार्हतेबद्दल साशंकता
एका बाजूने चारपदरी महामार्गांची ही अशी अवस्था असताना १३ जुलै रोजी अमेरे -  पोरस्कडे येथे पूर्ण करण्यात आलेल्या मार्गाचा सुमारे २५ मीटरपर्यंतचा भाग संरक्षक भिंतीसह जवळच्या तेरेखोल नदीत कोसळला. घटना पहाटे घडली व त्यावेळी सुदैवाने कुठले वाहन यावेळी मार्गावरून धावत नव्हते, पण दिवसा हा मार्ग कोसळला असता, तर केवढी मोठी दुर्घटना होऊ शकली असती हे सांगता येत नाही. यामुळे या अशा मार्गाबद्दल लोकांच्या मनात विश्वासार्हता राहिलेली नाही. दुसरे म्हणजे कोसळलेला हा भाग मातीचा भराव टाकून समपातळीवर आणला आहे, पण त्याला सरक्षंक भिंत नाही. त्यामुळे ही माती कशी काय टिकून राहील असा सर्वसामान्यांना प्रश्न पडलेला आहे.

संबंधित बातम्या