पणजीतील पार्किंगमध्ये बाराशे चारचाकींची सोय!

गोमन्तक
मंगळवार, 8 डिसेंबर 2020

पणजी शहरात महापालिकेच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील पे-पार्किंग सुरू करण्यात आले आहे. शहरात पे-पार्किंगच्या ठिकाणी पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. 

पणजी  :  पणजी शहरात महापालिकेच्यावतीने दुसऱ्या टप्प्यातील पे-पार्किंग सुरू करण्यात आले आहे. शहरात पे-पार्किंगच्या ठिकाणी पट्टे मारण्याचे काम सुरू झाले आहे. पाटो परिसरासह शहरात एकावेळेस चारचाकी बाराशे वाहने पार्किंगच्या जागेत उभी राहणार आहेत. त्याचबरोबर दुचाकी आणि चारचाकींच्या पार्किंगसाठी पे-पार्किंगच्या कंत्राटदार कंपनीने सवलतीत पास उपलब्ध करून दिले आहेत.

 

पणजी शहरातील चारचाकी वाहनांचा पार्किंगविषय सध्या चर्चेत आहे. कारण प्रभाग क्रमांक २८ मध्ये महापालिकेने आत्तापर्यंत पार्किंगचे नियम मोडणाऱ्या सर्वाधिक चारचाकी वाहनांवर दंडात्मक कारवाईत केली आहे. या प्रभागात वाहन उभे केले की कसिनोंमध्ये जाण्यासाठी सोयीचे पडते. त्यामुळे परराज्यातून येणारी वाहनेही येथील मार्गावर बेशिस्तपणे उभी करून ठेवत होती. सध्या पे-पार्किंग असलेल्या ठिकाणी सध्या कंत्राटदार कंपनीकडून वाहनांच्या पार्किंगसाठीच्या जागेभोवती पांढरे आणि पिवळे पट्टे मारून आखणी केली जात आहे. राजधानीत पाटो परिसरात पे-पार्किंगच्या ठिकाणी ७०० कार उभ्या राहू शकतात, तर पाचशे कार शहरातील रस्त्यांवर उभ्या राहू शकतात. पणजीत दररोज चारचाकी आणि दुचाकी घेऊन येणारे लोक आहेत. त्यांच्यासाठी मासिक पासाची सवलत सुरू करण्यात आली आहे. पे-पार्किंगची कंत्राटदार कंपनी जुवारकर असोसिएट्सचे मालक सोहन जुवारकर यांनी सांगितले की, आम्ही दररोज वाहन घेऊन येणाऱ्यांसाठी सवलत पासाची सोय केली आहे. दुचाकींसाठी १७५ रुपये, तर चारचाकी वाहनासाठी एक हजार रुपयांचा मासिक पास उपलब्ध केला आहे. पाटो परिसरात आणि महात्मा गांधी मार्गावर दोन ठिकाणी हे पास उपलब्ध असतील. अधिक माहितीसाठी ७४४७७००००३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे कळविण्यात आले आहे.

 

 

संबंधित बातम्या