भाजपच्या स्वयंकेंद्रीत चेहऱ्यामुळेच जनता काँग्रेसकडे आकृष्ट

प्रतिनिधी
रविवार, 27 सप्टेंबर 2020

दिगंबर कामत यांचा दावा; उदय साळकर यांचा काँग्रेसमध्ये प्रवेश

पणजी: काँग्रेस सरकारने नेहमीच लोकभावनांचा आदर केला व सामान्य माणसांच्या हितासाठी योजना राबविल्या. भाजपच्या स्वयंकेंद्रीत राजवटीचा चेहरा आता लोकांना कळला आहे. त्यामुळेच जनता आता परत एकदा काँग्रेसकडे आकृष्ट होत आहे व काँग्रेस पक्षात प्रवेश करीत आहे, असा दावा काँग्रेस विधीमंडळ गटनेते दिगंबर कामत यांनी केला. 

काँग्रेस हाऊसमध्ये थिवी मतदारसंघातील कलाकार व सिने निर्माते उदय साळकर व त्यांच्या पाठिराख्यांना पक्षात प्रवेश देण्याच्या कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी प्रदेश काँग्रेस अध्यक्ष गिरीश चोडणकर, सरचिटणीस अमरनाथ पणजीकर, उत्तर गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष विजय भिके, थिवी गट अध्यक्ष सतीश चोडणकर उपस्थित होते. 

काँग्रेस सरकारच्या राजवटीत सेझ रद्द करणे, तज्ज्ञ व लोकांच्या सहभागाने तयार केलेला प्रादेशीक आराखडा, माध्यम प्रश्न यावर नेहमीच जनता, पालक व विद्यार्थ्यांच्या भावना लक्षात घेऊनच धोरण राबविले असे सांगून कामत म्हणाले, की दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे काम जवळ जवळ ६७ टक्के पूर्ण झालेले असतानाही २०१२ नंतर आठ वर्षे ते काम भाजप सरकारने रखडत ठेवले. आम्ही सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर आता ते इस्पितळ कोविड रुग्णांसाठी उपयोगी ठरले आहे.  सामान्य गोमंतकीयांसाठी तयार केलेली गोंयचे दायज योजना, व्हिजन-२०३५ अहवाल भाजप सरकारने जाणुनबुजून अमलात आणला नाही व त्यामुळेच आजची परिस्थिती निर्माण झाल्याचा आरोप कामत यांनी केला. 

काँग्रेस पक्षात प्रवेश केलेले उदय साळकर यांनी माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांनी आपल्या कार्यकाळात कलाकारांसाठी अनेक योजना अंमलात आणल्याचे सांगितले. 
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर म्हणाले, जनता भाजपच्या भ्रष्ट राजवटीला कंटाळली असून यापुढे अनेक नागरिक काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत. आज एक कलाकार काँग्रेस पक्षात प्रवेश करत असल्याचे पाहून मला आनंद झाला. सिने निर्माता उदय साळकर यांचे मी स्वागत करतो. दिगंबर कामत यांनी तसेच काँग्रेस पक्षाने गोव्यातील सिने निर्मात्यांसाठी चित्रपट अर्थसहाय्य योजना चालीस लावली होती याची आठवण ठेवली गेली पाहिजे. भाजप सरकारने २०१२ नंतर सदर योजना अधांतरी ठेवली. काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस अमरनाथ पणजीकर यांनी थिवी मतदारसंघातून काँग्रेस पक्षात प्रवेश केलेल्या सर्वांचे स्वागत केले.

संबंधित बातम्या