पेडे येथे ‘अंडरपास’ अत्यावश्यकच! रुग्ण, विद्यार्थी व लोकांनाही होणार सोईचे

गोमंतक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

राष्ट्रीय महामार्गावर पेडे-म्हापसा येथे ‘अंडरपास’ उभारणे विद्यमान परिस्थितीत अत्यावश्यक बनले आहे. पेडे जंक्शनच्या ठिकाणी ‘फ्लायओव्हर’ तथा ‘अंडरपास’ उभारल्याविना ही समस्या मिटणार नाही, असे स्थानिकांचे आग्रही म्हणणे आहे

म्हापसा : राष्ट्रीय महामार्गावर पेडे-म्हापसा येथे ‘अंडरपास’ (अधोमार्ग) उभारणे विद्यमान परिस्थितीत अत्यावश्यक बनले आहे. पेडे जंक्शनच्या ठिकाणी ‘फ्लायओव्हर’ तथा ‘अंडरपास’ उभारल्याविना ही समस्या मिटणार नाही, असे स्थानिकांचे आग्रही म्हणणे आहे. रुग्ण, विद्यार्थी व लोकांनाही होणार सोईचे व्हावे, या दृष्टीने केंद्र सरकार व राज्य सरकारने यासंदर्भात उपाययोजना काढावी, अशी मागणी करणारे सुमारे बाराशे नागरिकांच्या सह्या असलेले निवेदन अलीकडेच विविध शासकीय अधिकारिणींना देण्यात आले आहे. 

गोवा सरकारची परवानगी घेऊन केंद्र सरकारने राष्ट्रीय महामार्गावर विविध ठिकाणी मार्ग रुंदीकरणाचे व उड्डाणपुलांचे बांधकाम सुरू केल्याने गोमंतकीय जनता खुश आहे; तथापि, स्वत:च्या भागात उड्डाणपुलांची व्यवस्था करण्यात न आल्याने काही भागांतील नागरिक नाराज आहेत.
राष्ट्रीय हमरस्ता क्रमांक ६६ए महाराष्ट्रातून गोव्यात आला असून तो पेडणे तालुक्यातील पत्रादेवी येथून काणकोण तालुक्यातील लोलये-पोळे मार्गे पुढे कर्नाटक राज्यात जातो. राष्ट्रीय हमरस्त्यांच्या बांधकामासंदर्भात काही मूलतत्त्वे घालून दिली असली तरी महामार्गाच्या दोन्ही बाजूंनी असलेल्या गोव्यातील काही मोठ्या निवासी वासाहतींच्या गरजा लक्षात घेऊन केंद्र सरकारने त्यासंदर्भातील काही नियम थोडेफार शिथिल करून फ्लायओव्हर, अंडरपास इत्यादींचे बांधकाम करण्याबाबत चांगल्यापैकी दिलदारपणा दाखवलेला आहे. त्यासंदर्भात गोव्याची भौगोलिक परिस्थिती, लोकसंख्येचे प्रमाण आणि पर्यावरणीय मुद्दे विचारात घेण्यात आले होते; परंतु, गोव्यातील हमरस्त्यांवर अजूनही काही ठिकाणी असे फ्लायओव्हर/अंडरपास बांधणे अत्यावश्यक आहे. पेडे-म्हापसा येथेही असाच फ्लायओव्हर तथा अंडरपास उभारणे अत्यंत गरजेचे बनलेले आहे, असे उत्तर गोव्यातील नागरिकांचे तसेच गोव्याबाहेरील लोकांचेही म्हणणे आहे.

प्रारंभी या महामार्गाच्या रुंदीकरणासंदर्भातील ‘तपशीलवार प्रकल्प अहवाला’त पेडे येथे असा फ्लायओव्हर तथा अंडरपास उभारण्याचा प्रस्ताव होता. असे असले तरी सध्या तो प्रस्ताव शासकीय अधिकारिणीने रद्द केला आहे. त्यामुळे म्हापसा शहरवासीयांच्या बरोबरच डिचोली, साखळी, पेडणे इत्यादी भागांतील लोकांना मोठा त्रास होणार आहे. तसेच महाराष्ट्रातील वेंगुर्ला, कुडाळ, सावंतवाडी, दोडामार्ग भागात जाणाऱ्यांनाही ते त्रासदायक ठरणार आहे. उत्तर गोव्यासाठी कार्यरत असलेल्या म्हापसा येथील जिल्हा रुग्णालयात आणि या शहरातील पाच प्रमुख मोठ्या खासगी इस्पितळांत तातडीचे वैद्यकीय उपचार घेणाऱ्यांवरही त्याचा विपरीत परिणाम होणार आहे. वरील भागांतील लोकांचे तातडीचे फोन कॉल्स आल्यानंतर त्या रुग्णांना सेवा देताना रुग्णवाहिकांना सध्या पेडे जंक्शनवर येऊनच त्या इस्पितळांत जावे लागते; कारण, तोच एकमेव जवळचा तथा सुलभ मार्ग असतो. परंतु, महामार्गाच्या कामानिमित्त महामार्गावरील पेडे जंक्शन नजीकच्या काळात कायमचे बंद होणार आहे.

हा विषय लोकांच्या आरोग्याशी निगडित असल्याने म्हापशातील काही सामाजिक कार्यकर्त्यांनी त्यासंदर्भात विविध शासकीय शासकीय कार्यालयांशी संपर्क साधून त्याबाबत पाठपुरावा केला आहे. त्यांची मागणी नजीकच्या काळात मान्य झाली नाही तर त्या भागातील लोकांना करासवाडा चार रस्ता येथील अंडरपास किंवा तारीकडे-बस्तोडा येथील अंडरपासचा वापर करावा लागणार आहे. म्हापसा येथील कोर्ट जंक्शनवरही वाहतुकीत व्यत्यय आणणारी अशाच प्रकारे मोठी रहदारी असते. विशेष करून मोठा गंभीर अपघात, हृदयविकाराचा झटका, गरोदर महिला इत्यादी प्रकारच्या रुग्णांच्या जीविताबाबत ते धोकादायक आहे. 

महाराष्ट्रातून, गोव्यातील पेडणे, डिचोली व सत्तरी तालुक्यातून तसेच चोर्लामार्गे कर्नाटकातून गोव्यात म्हापसा शहरात प्रवेश करणारी वाहने पेडे जंक्शनच्या मार्गे वळवली आहेत. पेडे अंडरपासची सोय केली नाही तर म्हापशातील रहदारीचा प्रश्न अधिकाधिक गुंतागुंतीचा 
होईल, असे म्हापसावासीयांचे म्हणणे आहे.

 म्हापसा शहरात सध्या तीन महाविद्यालये, किमान दहा हायस्कुले आहेत तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था यांसारख्या शैक्षणिक संस्था आहेत. या शैक्षणिक संस्थामधील अर्ध्याअधिक विद्यार्थ्यांना दररोज राष्ट्रीय महामार्ग पार करावा लागतो. आगामी काळात पेडे बायपास झाला नाही तर त्यांना नाइलाजाने तारीकडे-बस्तोडा येथील अथवा धुळेर जंक्शनचा वापर करावा लागणार आहे. या दूरच्या पल्ल्यातील मार्गामुळे त्यांचा दररोज वेळ वाया जाऊन त्यांचे अप्रत्यक्षपणे शैक्षणिक नुकसानही होणार आहे.
- सत्यवान भोसले, पेडे-म्हापसा

संबंधित बातम्या