सासष्टीत दीडशेहून अधिक गणेशपूजन

वार्ताहर
मंगळवार, 25 ऑगस्ट 2020

कोरोना’मुळे सासष्टीत विविध ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्य करून असलेले कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकांना आपल्या मूळ गावी न जाता आल्याने सुमारे दीडशेहून अधिक लोकांनी गणपतीचे पूजन केले.

नावेली: ‘कोरोना’मुळे सासष्टीत विविध ठिकाणी नोकरी व्यवसायानिमित्त वास्तव्य करून असलेले कर्नाटक व महाराष्ट्र राज्यातील लोकांना आपल्या मूळ गावी न जाता आल्याने सुमारे दीडशेहून अधिक लोकांनी गणपतीचे पूजन केले.

‘कोरोना’च्या संकटामुळे गणेशचतुर्थी निमित्ताने आपल्या मूळ गावी अनेकांना जाता आले नाही. त्यामुळे त्यांनी गावी संपर्क साधून ज्येष्ठांचे मार्गदर्शन घेऊन तर काहींनी मंदिरात कौल प्रसाद घेऊन गणपती पूजन केले.

सर्वांग सुंदर चित्रशाळेचे मालक तुळशीदास नाईक यांनी दिलेल्या माहितीनुसार, आपल्या चित्रशाळेत काही लोकांनी आगाऊ गणपतीची मूर्ती बुकिंग केली होती. यात महाराष्ट्र राज्यातील सिंधुदूर्ग जिल्ह्यातील लोकांचा जास्त समावेश होता. कर्नाटकातील कारवार-खानापूर तसेच कुमठा येथील काही गणेशभक्तांना गणपतीच्या मूर्ती आपल्याकडून घेऊन गेले, असे नाईक यांनी सांगितले. सुमारे ३५ गणेशभक्तांनी आपल्याकडून नवीन मूर्ती नेल्याचे त्यांनी सांगितले.

विठ्ठल प्रियोळकर गणपती चित्रशाळेचे मालक सूर्यकांत प्रियोळकर यांनी आपल्या चित्रशाळेतून सुमारे ४० नवीन गणपतीच्या नवीन मूर्ती नेऊन गणेशभक्तांनी पूजन केल्याचे सांगितले. तर मडगावातील इतर काही गणपती चित्रशाळेच्या मालकांशी संपर्क साधला असता आपल्याही गणपती चित्रशाळांमधून १० ते १५ नवीन गणपतीच्या मूर्ती गणेशभक्तांनी पूजनासाठी घेऊन गेल्याचे सांगितले.

सूर्यकांत प्रियोळकर यांनी यावर्षी गणपती मूर्ती होम डिलिव्हरी देण्याचा प्रयत्न केला यावर्षी त्यांनी विरोधी पक्षनेते तसेच मडगावचे आमदार दिगंबर कामत यांच्या गणपती मूर्तीसहित २५ गणपती मूर्ती घरपोच सेवा दिली. पावसाने उसंत घेतल्याने गणेश भक्तांनी आपल्या गणपतीच्या मूर्ती स्वतः चित्रशाळेत येऊन नेल्या.

काही गणेशभक्तांनी आपण नवरात्रात गणपती पूजन करणार असल्याचे सांगितले. त्यासाठी गणेशमूर्ती तयार ठेवल्या आहेत. काही गणेश भक्तांच्या घरी कोरोना संक्रमित रूग्ण आढळून आल्याने त्यांनी गणपतीचे पूजन केले नसून, नवरात्रात पूजन करण्याचा निर्णय त्यांनी घेतला असल्याचे आम्हाला सांगण्यात आल्याचे नाईक यांनी म्हणाले.

संबंधित बातम्या