लोकांसाठीच्या जैवविविधता नोंदवहीला व्यवस्थापन मंडळाची तत्वतः मान्यता

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 11 सप्टेंबर 2020

अहवालात काही किरकोळ दुरुस्त्या करून त्याचे पुन्हा तज्‍ज्ञ समितीसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर तो छपाईसाठी जाणार आहे.

काणकोण: काणकोण तालुक्यातील श्रीस्थळ पंचायतीच्या जैवविविधता व्यवस्थापन समितीने तयार केलेल्या पीपल्स बायोडायव्‍हर्सिटी रजिस्टरला (लोकांसाठीच्या जैवविविधता नोंदवहीला) गोवा जैवविविधता व्यवस्थापन मंडळाने ग्राह्य धरून त्याला बुधवारी (ता.९) तत्वत: मान्यता दिली. गेली दीड वर्षे समिती या अहवालावर काम करीत होती. 

बुधवारी मंडळाच्या तज्‍ज्ञ समितीसमोर हा नोंदीच्या स्वरुपातील अहवालाचे दृक-श्राव्य माध्यमांद्वारे सादरीकरण करण्यात आले. अहवालात काही किरकोळ दुरुस्त्या करून त्याचे पुन्हा तज्‍ज्ञ समितीसमोर सादरीकरण करण्यात येणार आहे. त्यानंतर तो छपाईसाठी जाणार आहे. जैविक विविधता नियम २००४ प्रमाणे जैवविविधता व्यवस्थापन समितीने पंचायत स्तरावरील समुदायाशी सल्लामसलत करून लोकांसाठीची जैवविविधता नोंदवही तयार करणे, हे प्रमुख काम आहे. या नोंदवहीत स्थानिक जैविक संपत्तीची सखोल माहिती व ज्ञान समाविष्ट करणे अभिप्रेत आहे. त्यामध्ये औषधी व अन्य उपयोग त्याचप्रमाणे त्यासंदर्भातील पारंपरिक ज्ञानाची नोंद आहे.

सरपंच गणेश भिवा गावकर व पंचायत सदस्यांनी समितीला पूर्ण सहकार्य केले. बोटनिकल तज्‍ज्ञ धिल्लन वेळीप व श्री मल्लिकार्जुन महाविद्यालयाच्या झुओलॉजीचे प्राध्यापक दीपक बोवाळकर यांनी समितीला तांत्रिक सल्ला देऊन सहकार्य केले. पंचायतीची खास ग्रामसभा बोलावून पी.बी.आर.चे  सादरीकरण करून संमती घेण्यात आली. पी.बी.आर.चे सादरीकरण पर्वरी येथील दीनदयाळ  सभागृहात करण्यात आले.  सादरीकरण कार्यक्रमात उपस्थित तज्‍ज्ञ समितीच्या सदस्यांचे राज्य जैवविविधता व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सचिव डॉ. सरमोकादम यांनी स्वागत केले. समितीचे सदस्य शिरिष पै यांनी पी.बी.आर.चे सादरीकरण केले. यावेळी पंचायत सचिव संदीप देसाई, समितीचे दामोदर वसंत च्‍यारी, अंजली अर्जून गावकर, गोविंद बामटो वेळीप, समितीचे अध्यक्ष विनय तुबकी यांच्‍यासह अन्‍य मान्‍यवर उपस्थित होते.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या