पर्यावरणपूरक गणेशमूर्तीना पहिली पसंती!

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारनेच या प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणली. त्यामुळे गणेश भक्त पुन्हा एकदा चिकण मातीच्या आणि शाडू मातीच्या गणेश मूर्तींकडे वळले. 

फोंडा: पर्यावरणाला खूप मोठे महत्त्व प्राप्त झाले आहे. दोन दशकांपूर्वी पर्यावरणाच्या विषयाकडे लोक दुर्लक्ष करायचे, कारण पर्यावरणाचा हा विषय तेवढा गंभीर बनला नव्हता. पण आता पर्यावरण वाचले तरच माणूस वाचेल, हे सिद्ध झाल्यामुळे प्रत्येक बाबतीत पर्यावरणाचा अंतर्भाव झाला असून उत्सवांतही त्याची छबी उमटते आहे. 

राज्यातील सर्वांत मोठा उत्साहाचा सण असलेल्या गणेशोत्सवातही पर्यावरणाला फार मोठे महत्त्व मिळायला लागले आहे. पूर्वी प्लास्टर ऑफ पॅरिसच्या हलक्‍या वजनाच्या आणि दिसायला आकर्षक अशा गणेश मूर्तींना मोठी मागणी होती. कालांतराने या प्लास्टर ऑफ पॅरिसच्या गणेश मूर्तींमुळे पर्यावरणाचा ऱ्हास होत असल्याचे निष्पन्न झाल्याने सरकारनेच या प्लास्टर ऑफ पॅरिसवर बंदी आणली. त्यामुळे गणेश भक्त पुन्हा एकदा चिकण मातीच्या आणि शाडू मातीच्या गणेश मूर्तींकडे वळले. 

राज्यात गणेश मूर्ती तयार करणाऱ्या चित्रशाळांची संख्या आता बरीच कमी झाली आहे. गणेश मूर्ती तयार करण्यासाठी कामगार मिळत नाही, रंगरंगोटीचे सामान आणतानाही बरेच सायास पडतात, माती आणून ती भिजत घालण्याबरोबरच मूर्ती तयार करण्यासाठी मोठे कष्ट उपसावे लागतात. त्यामुळे बहुतांश गणेश मूर्तीकार महाराष्ट्रातील तयार मूर्ती आणून विकतात. त्यात वावगे असे काहीच नाही. फक्त प्लास्टर ऑफ पॅरिसचा मूर्तीकामात अवलंब होता कामा नये, एवढेच. 

फोंडा शहर भागात तर अनेक ठिकाणी सुबक सुंदर गणेश मूर्ती उपलब्ध करण्यात आल्या आहेत. चिकण माती व शाडूपासून बनवल्या जाणाऱ्या या गणेश मूर्तींना भक्तांची पहिली पसंती आहे. तिस्क - फोंडा येथील सरस्वती देवालयाजवळ तसेच वरचा बाजार भागाबरोबरच सांताक्रूझ भागात अशा अनेक पर्यावरणपूरक गणेश मूर्ती रास्त दरात उपलब्ध करण्यात आल्या आहेत. 

फोंडा अर्थातच अंत्रुज महालात आज बऱ्याच चित्रशाळा आहेत, पण काही चित्रशाळांत परराज्यातील गणेश मूर्ती आणून त्या विकल्या जातात. यासंबंधी एक मूर्तीकार दत्ताराम गावकर यांनी आपली प्रतिक्रिया व्यक्त करताना गणेश मूर्तीचा प्रत्यक्ष भाव आणि ग्राहकांकडून मिळणारे पैसे यांचा ताळमेळ घालताना कठीण बनते. 

यंदा अनेक मूर्तीकार!
कोरोनाच्या महामारीमुळे अनेक व्यवसायांवर गंडांतर आले आहे. गणेश चतुर्थी जवळ आली असल्याने अनेकांनी चतुर्थीला पूरक अशी दुकाने थाटली आहेत. त्यात सुबक सुंदर गणेश मूर्तीही उपलब्ध करण्यात आल्या आहेत. या गणेश मूर्ती उपलब्ध करण्यासाठी बेरोजगार झालेल्यांनीही पुढाकार घेतला आहे, हे विशेष.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या