गोव्यातील महिलांची जागृकता; गोव्यात गर्भाशयाच्या कर्करोगाचे प्रमाण कमी

दैनिक गोमन्तक
रविवार, 6 डिसेंबर 2020

गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हीकल कर्करोगाचे राज्यातील प्रमाण नगण्य आहे.

पणजी: गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग म्हणजेच सर्व्हीकल कर्करोगाचे राज्यातील प्रमाण नगण्य आहे. हा कर्करोग असणाऱ्या सरासरी ४५ ते ५५ महिलांची नोंद वर्षाकाठी राज्यात होत असल्याची माहिती कर्करोग तज्ज्ञ डॉ. शेखर साळकर यांनी दिली. 

राज्याच्या तुलनेत देशात या कर्करोगाचे प्रमाण खूप असल्याची माहिती अनेक संशोधन अहवालांमधून मिळते. इंडियन जर्नल ऑफ मेडिकल रिसर्च यांनी दिलेल्या माहितीनुसार, जगाच्या तुलनेत या कर्करोगाचे १६ टक्के महिला रुग्ण हे भारत देशात आहेत. इंडिया अगेन्स्ट कॅन्सर यांनी दिलेल्या माहितीनुसार, भारतात ८ मिनिटाला एका महिलेचा जीव या कर्करोगामुळे जातो. नॅशनल कॅन्सर इन्स्टिटयूट यांच्या अभ्यासानुसार दरवर्षी देशभरात ९६,९२२ महिला रुग्णांची नोंद होते, तर सरासरी ६०,०७८ इतक्या महिलांचा मृत्यू होतो. देशात २०१६ साली एक लाख महिलांना हा कर्करोग झाला होता, तर २०२० साली हा आकडा १.०४ लाखांवर गेला आहे. 

गोव्यात या कर्करोगाचे प्रमाण कमी असण्याचे मुख्य कारण म्हणजे महिलांमध्ये शिक्षणामुळे असणारी जनजागृती आहे. याशिवाय लैंगिक संबंधांच्या माध्यमातून पसरणाऱ्या रोगांबाबत राज्यात चांगली जनजागृती केली जाते, याविषयीच्या सेवा आणि उपचार आहेत. प्रामुख्याने हा रोग गुप्तांगांची काळजी न घेणाऱ्या महिलांमध्ये असतो. जर या कर्करोगाची लवकर चाचणी झाली, तर हा कर्करोग बरासुद्धा होतो, असे डॉ. साळकर म्हणाले. 

संपूर्ण देशात गोवा हे राज्य कर्करोगाच्याबाबतीत सुदैवाने चांगल्या स्थितीमध्ये आहे. हा कर्करोग महिलांच्या अस्वच्छतेमुळे गर्भाशयाच्या तोंडावर निर्माण होणाऱ्या ‘ह्युमन पपिल्लोमा व्हायरस’ (एचपीव्ही) विषाणूद्वारे होतो. हा विषाणू हळुवार कार्यरत होत असल्याने रोगाच्या सुरवातीला निदान होणे कठीण असते व आजार अगदी वरच्या स्तरात पोचल्यावर त्याचे निदान होते. इतर कर्करोगाप्रमाणे या कर्करोगावर वेळीच उपचार होणे आवश्यक असते. अगदी सुरवातीच्या टप्प्यात या कर्करोगाचे निदान होऊन वेळेत उपचार केले गेल्यास रुग्ण पूर्णपणे बरा होऊ शकत असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. 
या कर्करोगापासून बचावासाठी सध्या लस उपलब्ध आहे, मुलीचे पहिले लैंगिक संबंध येण्यापूर्वी तिला ही लस दिली, तर भविष्यात या कर्करोगाचा धोका अत्यल्प प्रमाणात असतो. यासंदर्भात स्त्रीरोग तज्ञांशी बोलणे आवश्यक असल्याचे डॉ. साळकर म्हणाले. 

गर्भशयाच्या मुखाचा कर्करोग होऊ नये म्हणून काय कराल? 
नियमित तपासणी न करणे आणि स्वस्त:कडे दुर्लक्ष करणे यामुळे हा कर्करोग वाढत जातो. या रोगाची लक्षणं म्हणजे सुरवातीला पांढरे पाणी अंगावरून जाते. शारीरिक संबंधानंतर रक्तस्त्राव होणं, रक्तमिश्रीत स्त्राव जाणं ही लक्षणं दिसतात. प्रत्येक स्त्रीने दरवर्षी स्त्रीरोग तज्ज्ञांकडून तपासून गर्भाशयाच्या मुखाच्या कॅन्सरचे‌ निदान प्राथमिक स्वरूपात असतानाच करायला पाहिजे. म्हणजेच उपचार होऊ शकतील. पॅप स्मीअर नावाची अत्यंत सोपी आणि स्वस्त तपासणी केल्यास गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग सुरवातीलाच लक्षात येतो. ही चाचणी अगदी ५०० रुपयांच्या दरात उपलब्ध आहे. महिलांनी गुप्तांगाची स्वछता ठेवणे गरजेचे आहे. एक किंवा अनेक पुरुषांसोबत लैगिंक संबंध ठेवल्यास या कर्करोगाचा धोका अधिक असल्याची माहिती डॉ. साळकर यांनी दिली.

संबंधित बातम्या