बायंगिणी प्रकल्पास गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिली परवानगी

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 25 डिसेंबर 2020

बायंगिणी येथील कचरा प्रकल्प उभारण्यास गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे.

पणजी: बायंगिणी येथील कचरा प्रकल्प उभारण्यास गोवा राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाने परवानगी दिली आहे. जल व वायू प्रदूषण (नियंत्रण व प्रतिबंध) कायद्यांनुसार कोणत्याही प्रकल्पासाठी अंतिम परवानगी मंडळाकडून घ्यावी लागते. मंडळाने तशी परवानगी दिली आहे.

बायंगिणीच्या या प्रकल्पाला काही स्थानिकांनी विरोध केला आहे. केंद्रीय आयुष राज्यमंत्री श्रीपाद नाईक यांनीही तो इतरत्र हलवावा असे मत मध्यंतरी व्यक्त केले होते. त्या प्रकल्पाजवळ लोकवस्ती आहे आणि तो वारसा स्थळांच्या परीघात येत असल्याची कारणे पुढे करून त्या प्रकल्पाला विरोध करण्यात येत आहे. सरकारने मात्र या प्रकल्पाचा विषय सोडून दिलेली नाही.

गोवा कचरा व्यवस्थापन महामंडळाच्या माध्यमातून हा प्रकल्प मार्गी लावण्यात येणार आहे. लोकवस्तीला या प्रकल्पाचा त्रास जाणवू नये यासाठी घ्यावयाची उपाययोजना पर्यावरण आघात मुल्यांकन अहवालात नोंदवण्यात आली आहे. त्याविषयीही हमी महामंडळाने दिल्यानंतर प्रकल्पाला पर्यावरण दाखलाही देण्यात आला आहे. आता बांधकामाला अंतिम परवानगी मंडळाने दिली आहे. त्यामुळे आधीच निविदा जारी करून कामाचा आदेश दिलेल्या या प्रकल्पाच्या बांधकामाचा मार्ग मोकळा झाला आहे.

२६० टन खताची दररोज होणार निर्मिती
बायंगिणी येथे २५० मेट्रीक टन (२० टक्के वाढीच्या तरतुदीसह) हा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पात दररोज शंभर घनमीटर पाणी लागणार आहे. प्रकल्पाच्या सांडपाण्यावर प्रकल्पातच प्रक्रिया केली जाणार आहे. या प्रकल्पातून निर्माण होणाऱ्या बायोगॅसवर जनित्रे चालविली जाणार आहेत त्यानंतर वायू वातावरणात उंच धुरांड्याच्या मदतीने सोडला जाणार आहे. या प्रकल्पातून दररोज ८.८१ टन टाकावू कचरा निर्माण होईल तो वैज्ञानिक पद्धतीने जमिनीत गाडला जाणार आहे. ९३.२३ मेट्रीक टन कचरा दररोज सिमेंट कंपन्यांच्या भट्ट्यांत उच्च दाबाखाली जाळण्यासाठी पाठवण्यात येणार आहे. २६० टन खताची या प्रकल्पातू दररोज निर्मिती होणार आहे.

संबंधित बातम्या