पेडणे बसस्थानकाचे लोकार्पण होणार

प्रतिनिधी
शुक्रवार, 28 ऑगस्ट 2020

उपमुख्यमंत्री आजगावकर ः वाहतूक खात्याच्या कार्यालयाचे लवकरच स्थलांतर

पेडणे: पेडणे बसस्थानकाला ग्रासणारे तांत्रिक अडचणीचे ग्रहण दूर झाले असून, हे सुसज्ज बसस्थानक पूर्ण क्षमतेने सुरू करून लोकार्पण करण्यात येणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी दिली. मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत व महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्याबरोबर चर्चा करून दोघांच्या सहकार्याने या विषयावर मार्ग काढून या तांत्रिक अडचणी दूर केल्या असल्याचेही उपमुख्यमंत्री आजगावकर म्हणाले. 

आवश्यक ती प्रक्रिया करून वाहतूक खाते हे बसस्थानक कदंब महामंडळाकडे सोपवणार आहे. या सुसज्ज बसस्थानक इमारतीत लवकरच वाहतूक खात्याच्या पेडणे कार्यालयाचे व त्यानंतर आणखी एका सरकारी कार्यालयांचे स्थलांतर करण्यात येणार आहे. पेडणेवासीयांच्या सोयीसाठी सरकारने आधुनिक सोयीनी युक्त असे बसस्थानक उभारले आहे. वाहतूक खात्यातर्फे हे बसस्थानक उभारण्यात आले आहे. प्रवाशांसाठी प्रतीक्षा स्थळ, कॅफेटेरिया, दुकाने अशा सोयी सुविधा या बस स्थानकावर उपलब्ध आहेत.वाहतूक खात्याच्या कार्यालयासह आणखी एका सरकारी खात्याचे कार्यालय या इमारतीत असेल. उद्‍घाटन करून हे बसस्थानक जनतेसाठी यापूर्वीच खुले करण्यात आले आहे. 

तथापि, प्रशासकीय तांत्रिक कारणांमुळे हे बसस्थानक पूर्णपणे सुरु करण्यात आले नव्हते. महसूल खात्याशी निगडीत हा विषय बराच काळ रेंगाळला होता. पण, उपमुख्यमंत्री बाबू आजगावकर यांनी पुढाकार घेऊन मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत व महसूलमंत्री जेनिफर मोन्सेरात यांच्या सहकार्याने तांत्रिक अडचणी दूर करून हा प्रकल्प मार्गी लावला. राज्याचे अॅडव्होकेट जनरल देविदास पांगम यांचा सल्ला घेऊन या अडचणींवर मार्ग काढण्यात आला. 

तांत्रिक अडचणी दूर झाल्याने हे सुसज्ज बसस्थानक पूर्ण क्षमतेने कार्यान्वित होणार असून याचा पेडणेवासीयांना लाभ मिळणार आहे.

संबंधित बातम्या