मालपेतील रेल्वे बोगद्याच्या तपासणी अहवालानंतर रेलसेवा शक्य

प्रकाश तळवणेकर
सोमवार, 14 सप्टेंबर 2020

बोगद्याच्या तपासणीनंतर रेल्वेच्या विविध चाचण्या घेण्यात येतील. वाहतुकीसाठी बोगदा योग्य आहे, असे प्रमाणपत्र तज्‍ज्ञांकडून मिळाल्यानंतर रेलसेवा सुरू होईल. त्यासाठी आणखी काही दिवस रेलसेवा बंदच राहणार आहे.

पेडणे: मालपे-पेडणे येथील कोकण रेल्वेच्या बोगद्यातील कोसळलेल्या भिंतीचे बांधकाम पूर्ण झाले असून ऑस्ट्रेलियातील तज्ञ त्याची उद्या (ता.१४) पहाणी करणार आहेत. मालपे येथील या रेल्वेच्या बोगद्याचा परिसर हा तसा पाणथळ भाग. बोगद्याचे काम सुरू केले होते, तेव्हा पाण्यामुळे बोगद्याचे काम करणे, बरेच कठीण होत होते, तर हल्ली बोगद्याची भिंत कोसळल्यानंतर मोठा पाऊस झाला, तर कोसळलेल्या भिंतीतून चिखलाखाली येऊन काम बंद करावे लागत होते, त्यामुळे या बोगद्याच्या दुरुस्तीबद्दल साशंकता निर्माण झाली आहे. गेल्या ६ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी सव्वा महिना काम चालले.

या बोगद्याच्या तपासणीनंतर रेल्वेच्या विविध चाचण्या घेण्यात येतील. वाहतुकीसाठी बोगदा योग्य आहे, असे प्रमाणपत्र तज्‍ज्ञांकडून मिळाल्यानंतर रेलसेवा सुरू होईल. त्यासाठी आणखी काही दिवस रेलसेवा बंदच राहणार आहे.

रेल्वे मार्गासाठी सर्व्हे करताना पहिल्यांदा पेडणे वीज कार्यालयाकडून सर्व्हे करण्यात आला होता. पण नंतर त्यात बदल करून बोगद्याची संकल्पना पुढे आली. बोगद्यामुळे बरेच अंतर कमी झालेही असेल, पण या पाणथळ भागामुळे या बोगद्याच्या दुरुस्तीबद्दल साशंकता आहे. १९९४ -९५ मध्ये जेव्हा या बोगद्याच्या कामाला सुरुवात झाली होती. तेव्हा खोदकाम करताना पाण्यामुळे तसेच या बाजूच्या बोगद्याकडील माती ही भुसभुशीत (शेड) असल्याने बोगद्याच्या कामात वारंवार अडथळे येत होते. बोगद्यात काही ठिकाणी गमबुट घालून चालताना गुढग्यापर्यंत जवळ पाणी येत असे. बोगद्यातील पाणी काढण्यासाठी त्यावेळी ॲमिस्टर या अद्ययावत यंत्राचा वापर करावा लागला होता. बोगद्यातील उत्खननामुळे भूमार्गातील पाण्याच्या प्रवाहात बदल झाला.

या बोगद्यापासून जवळ असलेल्या अमइ या गावाकडील पाण्याचा प्रवाह बंद होऊन खाजने या बोगद्याच्या दुसऱ्या दिशेने असलेल्या बाजूने मोठ्या धबधब्याप्रमाणे वाहू लागले. तर भूअंतर्गत पाण्याचा प्रवाह बंद होऊन तो दुसरीकडे वळल्याने अमइ गावावर वर्षाचे बाराही महिने वाहणारे झरे बंद झाले. माड-पोफळींच्या बागायती पाण्याअभावी सुकून गेल्या. एका निसर्गाने नटलेल्या भाग उजाड आणि रखरखीत झाला.

अमइ गावाकडे  जाणारा  पाण्याचा प्रवाह बदलला व दुसरीकडे वळला तरी बोगद्याच्या वर असलेला पाणथळ भाग मात्र तसाच आहे. कारण खाजने बोगद्याच्या दिशेने येथून पाणी जाते तर बोगद्याची भिंत कोसळल्यावर भरपूर पाऊस झाल्यावर या भिंतीतून वाहणारा चिखल हा अजूनही या बोगद्याच्या माथ्यावरील भाग हा पाणथळच असल्याचे सिध्द करतो. दुसरे म्हणजे या बोगद्याच्या भिंतींना पाणी जाण्यासाठी पाईप घालून वाट ठेवण्यात आलेली आहे. पण प्रत्यक्षात बोगद्याच्या माथ्यावर असलेल्या पाण्याच्या मोठ्या साठ्याच त्याद्वारे निचरा होऊ शकत नाही. याचमुळे या बोगद्याची किती शाश्वती आहे, असा प्रश्न उपस्थित होतो.

कोकण रेल्वेशी अनेक तंत्रज्ञानातील नामवंत लोक आहेत. कोकण रेल्वेच्या मार्गासाठी या बोगद्याची निवड करण्यात आली. तेव्हा कोकण रेल्वेच्या अशा भूगर्भ तंत्रज्ञानाच्या या पाणथळ भागाची  गोष्ट कशी काय लक्षात आली नाही, असा प्रश्न पडतो.

पेडणे वीज कार्यालयाकडून अगोदर सर्व्हे करण्यात आलेला रेल्वे मार्ग स्वीकारला असता तर अंतर वाढले असते. पण बोगद्यासाठी ज्या कामगारांचे बळी गेले. बोगद्याच्या बांधकामासाठी करोडो रुपये खर्च झाले. हे सगळे वाचवता तर आलेच असते. तसेच पुढे व मागे सगळीकडे रेल्वेचा मार्ग पूर्ण झाला होता. पण या बोगद्याचे काम बरीच वर्षे रखडल्याने कोकण रेल्वे सुरू होण्यासही बराच विलंब झाला. त्या ऐवजी पेडणे वीज कार्यालयाकडून हा मार्ग नेला असता तर कोकण रेल्वेचा पैसा व वेळ वाचला असता. पेडणे येथे रेल्वे स्थानक होऊन शहराला थोडी उभारी मिळाली असती आणि बोगद्याच्या माथ्यावर असलेली टांगत्या तलवारीचे संकटही उभे राहू शकले नसते.

दुरुस्तीसाठी सव्वा महिना!
६ ऑगस्ट रोजी कोसळलेल्या भिंतीच्या दुरुस्तीसाठी गेला सव्वा महिनाभर स्टील रॉड लावून व त्यावर प्लास्टरिंग करून दुरुस्तीचे काम सुरू होते. चतुर्थीपूर्वी हे काम पूर्ण होऊन रेल्वे सुरू होतील, असे अगोदर कोकण रेल्वेतर्फे सांगण्यात आले होते. पण या काळात जोरदार पावसामुळे कोसळलेल्या बोगद्याच्या भागातून चिखल येऊ लागल्याने काम हे काम करणे कठीण होऊन ते आजपर्यंत लांबणीवर पडले. १४ रोजी ऑस्ट्रेलियातील विशेष तज्ज्ञांद्वारे या कामाची पाहणी करण्यात येत आहे

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या