मुख्यमंत्र्यांना धमकीचे  मेसेज पाठवणारा अखेर गजाआड

गोमन्तक वृत्तसेवा
मंगळवार, 17 नोव्हेंबर 2020

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील अन्य राजकारणी व्यक्तींना धमकीचे मेसेज पाठवणाऱ्याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताचे नाव आशिष सुरेश नाईक (वय २५) असे असून तो कुठ्ठाळी येथील रहिवासी आहे.

फोंडा : मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्यासह राज्यातील अन्य राजकारणी व्यक्तींना धमकीचे मेसेज पाठवणाऱ्याला फोंडा पोलिसांनी अटक केली आहे. संशयिताचे नाव आशिष सुरेश नाईक (वय २५) असे असून तो कुठ्ठाळी येथील रहिवासी आहे. तो ‘कॅब’ कारचालक असल्याचेही चौकशीत स्पष्ट झाले आहे. 

आशिष सुरेश नाईक याने मुख्यमंत्र्यांसह इतर अनेकांना धमकीचे संदेश पाठवले होते. मानहानीकारक मेसेजसोबतच जीवे मारण्याची धमकीही देण्यात आली होती. फोंड्यात गोवा फॉरवॉर्डचे नेते दुर्गादास कामत यांना गेल्या २८ ऑक्‍टोबरला हा धमकीचा संदेश देण्यात आला होता. दुर्गादास कामत यांनी या धमकीप्रकरणी गेल्या ७ नोव्हेंबरला फोंडा पोलिसांत अज्ञाताविरुद्ध तक्रार नोंदवताना धमकी आलेल्या मोबाईलचा क्रमांक पोलिसांना दिला होता.

मुख्यमंत्री तसेच दुर्गादास कामत यांच्यासह अन्य राजकारण्यांनाही अशाचप्रकारची धमकी आल्यामुळे फोंडा व पणजीसह कुडचडे व वेर्णा पोलिस स्थानकात तक्रारी नोंद झाल्या होत्या. या धमकीसंबंधी तक्रारी दाखल केल्‍यानंतर चारही पोलिस स्थानकातील पोलिस अधिकाऱ्यांनी तपास सुरू करताना संशयित हा कुठ्ठाळीचा असल्याचे स्पष्ट झाले. फोंडा पोलिसांनी चौकशी केली असता त्याने दुर्गादास कामत यांच्यासह मुख्यमंत्री व इतरांना आपणच धमकी दिल्याचे कबूल केल्‍याची माहिती पोलिसांनी दिली.

संबंधित बातम्या