पिळगांव पंचायतीचा गोवा फॉरवर्ड पक्षावर विश्वास

गोमन्तक वृत्तसेवा
बुधवार, 17 फेब्रुवारी 2021

पिळगाव पंचायत सरपंच व तिघा पंचांनी गोवा फॉरवर्डमधून भाजपमध्ये प्रवेश केला तरी त्याचा परिणाम गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कामांवर होणार नाही.

पणजी: मये मतदारसंघात गोवा फॉरवर्ड पक्षाने सत्तेमध्ये असताना अनेक कामे हाती घेऊन सुरू केली होती मात्र पक्षातून बाहेर पडल्यावर त्यात खंड आला. पिळगाव पंचायत सरपंच व तिघा पंचांनी गोवा फॉरवर्डमधून भाजपमध्ये प्रवेश केला तरी त्याचा परिणाम गोवा फॉरवर्ड पक्षाच्या कामांवर होणार नाही. मयेचे आमदार प्रवीण झांट्ये यांनी गेल्या चार वर्षात या मतदारसंघात किती विकास केला व पुढील एका वर्षात किती कामे करणार आहेत याची माहिती देणारी श्‍वेतपत्रिका जारी करण्याचे आव्हान पक्षाचे सरचिटणीस संतोष कुमार सावंत यांनी आज पत्रकार परिषदेत बोलताना दिले. 

विद्यमान मयेचे आमदार प्रवीण झांट्ये हे काँग्रेसचे मात्र 2017 च्या निवडणुकीत त्यांना भाजपची उमेदवारी देण्यात आल्याने भाजपच्या कार्यकर्त्यांनी पक्षाने बजावलेली कामगिरी पार पाडताना त्यांना निवडून आणले होते. गेल्या चार वर्षात लोकांपर्यंत पोहचले नाहीत मात्र ते स्वतःच्या व्यवसायात गुंतून राहिले. या उलट गोवा फॉरवर्डचे तीन आमदार सत्तेमध्ये मंत्री होते तसेच कृषी व जलसंपदा खाती त्यांच्याकडे होती त्यामुळे मये मतदारसंघात कृषी व जलसंपदा खात्यातर्फे अनेक काम सुरू केली होती.

गोवा विधानसभेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 24 मार्च पासून 

पिळगांववासी हे गोवा फॉरवर्ड पक्षाबरोबर आहेत. सरपंच व पंचांनी भाजपमध्ये प्रवेश केला तरी त्याचा परिणाम गोवा फॉरवर्ड पक्षावर पडलेला नाही. मये मतदारसंघात असलेल्या सात पंचायतींपैकी पिळगाव पंचायत गोवा फॉरवर्डकडे होती. त्यातील सरपंच व पंचांना आमिषे दाखवून भाजपने आपल्याकडे ओढले असले तरी लोकांची कामे तसेच मतदारसंघाचा विकास कोणी केला हे लोकांना माहीत आहे. त्यामुळे आगामी विधानसभेच्या निवडणुकीत मतदार गोवा फॉरवर्डच्या बाजूनेच राहतील असा दावा सावंत यांनी केला. यावेळी त्यांच्यासोबत पिळगावचे आनंद पार्सेकर, ॲड. विशाल मातोंडकर व पक्षाच्या महिला अध्यक्षा शीला घाटवळ उपस्थित होत्या.

 

संबंधित बातम्या