माजी केंद्रिय मंत्री झाले पायलट; गोवा प्रवाशांनी अनुभवली अविस्मरणीय हवाई सफर

दैनिक गोमंतक
रविवार, 22 नोव्हेंबर 2020

इंडिगोची फ्लाईट क्र. ६ ई१७९ या विमानाचे ते आज सारथी होते तर विमानातील प्रवाशांमध्ये माजी केंद्रीय वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल होते.

पणजी : माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री राजीव प्रताप रुडी यांनी आज मुंबई ते गोवा असा भर दुपारचा विमान प्रवास केला. इंडिगोची फ्लाईट क्र. ६ ई१७९ या विमानाचे ते आज सारथी होते तर विमानातील प्रवाशांमध्ये माजी केंद्रीय वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल होते. रुडी यांनी अर्ध्या तासात दिलेली रंजक माहिती आणि पटेल यांनी कॉकपीटबाहेर येऊन केलेले स्वागत यामुळे या विमानातून प्रवास करणाऱ्या सर्वांसाठी आजचा विमान प्रवास संस्मरणीय ठरला आहे. इंडिगोची फ्लाईट क्र. ६ ई१७९ आज मुंबईच्या विमानतळावरून गोव्याच्या दिशेने झेपावली आणि विमानात घोषणा झाली की.

प्रवाशांनी कसे ओळखले त्यांना?

“मी कप्तान राजीव प्रताप रुडी,  सह कर्मचाऱ्यांसह सर्व प्रवाशांचे या विमानात स्वागत करतो. आपला प्रवास ३० मिनिटांचा आहे.” राजीव प्रताप रुडी हे नाव ऐकल्यानंतर प्रवाशांचा भुवया उंचावतात. आणि त्यांना हे नाव कुठेतरी ऐकले आहे असे त्यांना वाटणे सहाजिक होते. फ्लाईट मधील प्रवाशांनी त्वरीत इंटरनेटवर शोध घेतल्यावर रुडी हे माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्री आणि भाजपचे पदाधिकारी असल्याचे त्यांना समजले. हा आश्चर्याचा धक्का ते पचवत असतात तोच आणखीन एक घोषणा विमानात झाली.

अशी होती ती घोषणा होती
“विमानात आज एक खास प्रवासी प्रवास करत असून त्यांचे नाव प्रफुल्ल पटेल असे आहे. ते देशाचे माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री आहेत. त्यांच्या काळात त्यांनी राबवलेल्या धोरणांमुळे देशात हवाई वाहतुकीचा विस्तार होण्यास मदत झाली होती. त्यांचे आम्ही या विमानात स्वागत करतो.”

 या घोषणेमुळे सर्वांनाच आश्चर्याचा आणखीन एक धक्का बसला. विमानाचे सारथ्य एका माजी केंद्रीय हवाई वाहतूक मंत्र्याकडे तर दुसरा माजी केंद्रीय हवाई वाहतूकमंत्री प्रवासी, अशा या प्रवासाचा अनुभव घेण्याची संधी सकाळ मिडीयाचे मुख्य कार्यकारी अधिकारी उदय जाधव यांनाही मिळाली. त्यांनी हा प्रवास आनंदाने अनुभवला.

प्रवाशांना लाभला अविस्मरणीय प्रवास
त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, “रुडी यांनी कॉकपिटबाहेर येऊन पटेल यांचे विमानात स्वागत केले. अगदी आस्थेने त्यांची विचारपूस केली. रुडी यांनी प्रवासातील ३० मिनिटात वाटेत लागणारी शहरे त्यांचे वैशिष्टे यांची माहिती तर दिलीच याशिवाय विमानाबाहेरील तापमान वजा वीस अंश सेल्सिअस असून असे तापमान असणारे कोणते भाग जगभरात आहेत याची महत्वपूर्ण माहितीही प्रवाशांना दिली. विमानाचा वेग ४० नॉट आहे असे सांगातनाच त्यांनी नॉट हे परीमाण कधीपासून वापरात आले, नॉट म्हणजे काय, नॉटचे रुपांतर किलोमीटरमध्ये केल्यास किती होते याची नेमकेपणाने पण सरळ, साध्या, सोप्या शैलीत माहिती दिली.
रुडी यांचे रसाळ निवेदन, दोन मंत्र्यांची उपस्थिती यामुळे तीस मिनिटांचा हा प्रवास कधी संपला हे प्रवाशांना समजले तर नाहीच, याउलट तो प्रवास समस्त प्रवाशांसाठी अविस्मरणीय ठरला.

 विमानातून बाहेर पडण्यापूर्वी पटेल यांनी कॉकपीटमध्ये जात दोन्ही पायलटांचे सुरक्षित हवाई प्रवासाबद्दल अभिनंदन केले. पटेल हे राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोव्यातील कार्यालयाच्या उद्घाटनासाठी आले आहेत. येत्या दीड वर्षावर आलेल्या गोवा विधानसभेच्या निवडणुकीआधी राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोव्यातील उड्डाणाचे सारथ्य पटेल  कसे करतात याविषयी आता उत्सुकता आहे.

संबंधित बातम्या