शेतकऱ्यांसाठी किफायतशीर अननस लागवड

तुकाराम सावंत
गुरुवार, 3 सप्टेंबर 2020

अननस म्हटले की, बाहेरुन कडक दिसणारे पण आतून रसरशीत आणि गोड-आंबट चवीचे फळ आहे.

डिचोली: अननस म्हटले की, बाहेरुन कडक दिसणारे पण आतून रसरशीत आणि गोड-आंबट चवीचे फळ आहे. कमी वेळेत फळधारणा करणारे असे हे पीक आहे. अननस हे प्रामुख्याने दक्षिण भारतातील पीक असले, तरी हे पीक किफायतशीर असल्याने गोव्यातील काही भागात खास करून कुळागरी भागात अननसाचे पीक घेण्यात येते.

शेती-बागायती पिकासाठी अग्रेसर असलेला डिचोली तालुक्‍यातील कृषीसंपन्न साळ गावही आता अननस लागवडीसाठी प्रकाशात येत आहे. मागील तीन-चार वर्षांपासून गावात अननसांची मोठ्या प्रमाणात लागवड करण्यात येत असून, गावात अननसाच्या बागा बहरतात. क्‍वचित अपवाद सोडल्यास केरळमधील व्यावसायिकांनी अननस लागवडीत पाय रोवले असून, या व्यवसायिकांनी देवस्थान तसेच काही शेतकऱ्यांच्या मालकीच्या शेतजमिनी भाडे करारावर घेऊन अननसांच्या बागा तयार केल्या असल्या, तरी आता स्थानिक शेतकऱ्यांनी यात लक्ष घालण्यास सुरवात केली आहे. 

सध्याच्या घडीस ५० हेक्‍टरहून अधिक शेतजमिन अननस लागवडीखाली आली आहे. डिचोली हा एकूण २३८.७९ चौरस किलोमीटर क्षेत्रफळात विखुरलेला तालुका आहे. कृषीप्रधान म्हणून या तालुक्‍याची ओळख आहे. शेती, कुळागरे आणि काजू बागायती हे या तालुक्‍याचे कृषी वैभव. वायंगण, खाजन आणि भरड मिळून तालुक्‍यात ३ हजार हेक्‍टर एवढी शेतजमीन आहे. पंचवीस-तीस वर्षांपूर्वी गावोगावी शेतजमीनी बहरल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, कालांतराने शेती व्यवसायाला गळती लागली. शेतजमीन असली, तरी काही भागात खाण व्यवसायाचा शेतीवर परिणाम झाल्याने तेथील शेतजमिनी पडीक आहेत. 

कृषी क्षेत्राचा विकास करण्यासाठी सरकार अनेक अनुदानीत योजनांना चालना देत असले, तरी कामगारांची कमतरता, वाढती महागाई त्यातच अनास्था आदी अनेक कारणांमुळे बहुतेक भागात शेती व्यवसायाची व्याप्ती हळूहळू कमी होत आहे. अडवलपाल, कुडचिरे आदी काही भागात तर रानटी जनावरांच्या उपद्रवामुळे शेती धोक्‍यात आली आहे. भरड शेतजमिनीत तर शेतकऱ्यांचा भातशेती पिक घेण्याऐवजी काजू कलमांची लागवड करण्याकडे अधिक कल आहे. काही भरड शेतजमिनीत बांधकामेही उभी राहत आहेत. त्यामुळे भरड भातशेती प्रकार हा जवळपास संपुष्टात आल्यातच जमा आहे. सध्या पारंपरिक भागात खाजन आणि वायंगण भातशेतीची लागवड करण्यात येते. तालुक्‍यातील मये, शिरगाव, मुळगाव, अडवलपाल आदी खाणपट्ट्यातील गावातील शेती खाण व्यवसायामुळे धोक्‍यात आली आहे.

संबंधित बातम्या