मायबाप सरकार जरा खड्ड्यांकडे बघा ना!

Dainik Gomantak
शनिवार, 4 जुलै 2020

राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या चौपदरीकरणाचे काम होईल तेव्‍हा होऊ दे, पण रस्‍ते खड्डेमय रस्‍त्‍यांकडे दुर्लक्ष करून आमचे कंबरडे मोडू नका, आमचा जीव तुम्‍ही का म्‍हणून धोक्‍यात घालता? मायबाप सरकार ठेकेदाराची मनमानी थांबवा व जरा खड्ड्यांकडे लक्ष द्या, असे आर्जव वाहनचालकांकडून केले जात आहे.

पणजी 

राष्‍ट्रीय महामार्गाच्‍या चौपदरीकरणाचे काम होईल तेव्‍हा होऊ दे, पण रस्‍ते खड्डेमय रस्‍त्‍यांकडे दुर्लक्ष करून आमचे कंबरडे मोडू नका, आमचा जीव तुम्‍ही का म्‍हणून धोक्‍यात घालता? मायबाप सरकार ठेकेदाराची मनमानी थांबवा व जरा खड्ड्यांकडे लक्ष द्या, असे आर्जव वाहनचालकांकडून केले जात आहे. म्‍हापसा - गिरी महामार्गावरील दोन कि.मी. परिसरात खड्ड्यांचे एवढे साम्राज्‍य पसरले की, ‘महामार्ग गेला खड्ड्यात!’ अशीच परिस्‍थिती विर्नोडा, धारगळ, कोलवाळ, करासवाडा परिसरात निर्माण झाली आहे.
चौपदरी महामार्गाचे काम एका बाजूने युद्धपातळीवर सुरू आहे, तर दुसऱ्या बाजूने जेथे काम अपूर्ण आहे, तेथील रस्‍ता ठेकेदाराच्‍या अवजड वाहनांमुळे अक्षरश: उखडून खड्डेमय बनला आहे. पावसामुळे तर खड्ड्यांची गंभीरता एवढी वाढली की, वाहने हेलकावे खातात, तर दुचाकीस्‍वार तोल जाऊन अपघातग्रस्‍त होतात. संबंधित ठेकेदार व सरकारने त्‍याकडे दुर्लक्ष केल्‍याने कुणाचा बळी जाण्‍याची वाट पाहता का? असा परखड सवाल वाहनचालकांकडून उपस्‍थित केला जात आहे. गिरी - म्‍हापसा येथे सुमारे दोन कि.मी.च्‍या रस्‍त्‍यावर खड्डे एवढे पडले की, अक्षरश: जीव मुठीत घेऊन मार्गक्रमण करावे लागते. पाऊस सुरू असताना आणि रात्रीच्‍यावेळी तर खड्ड्यांचा अंदाज न आल्‍यामुळे अपघातही होत आहेत.

गिरी येथे खड्ड्यांचे साम्राज्‍य
गिरी - म्‍हापसा येथे खड्ड्यांकडे दुर्लक्ष करीत भर पावसात सिमेंट काँक्रिट रस्‍त्‍याचे काम पावसातही सुरू आहे. या परिसरात तब्‍बल एक मीटर व्‍यासाचे खड्डे पडले असून त्‍यात पाणी साचत असल्‍याने नीट अंदाज न आल्‍याने अपघातांना निमंत्रण ठरत आहे. ‘दैनिक गोमन्‍तक’ने मे महिन्‍यात खड्डेमय रस्‍त्‍यांचे छायाचित्र प्रसिद्ध करून सरकारचे लक्ष वेधले होते. तरीही महामार्ग ठेकेदाराकडून दुर्लक्ष करण्‍यात आल्‍याने आता वाहनचालकांना त्रासदायक ठरत आहे. पर्वरी व गिरी - म्‍हापसा महामार्गावरून जाताना खड्डेमय रस्‍त्‍यांमुळे वाहनचालकांना तब्‍बल ४५ ते ५० मिनिटांचा कालावधी लागतो. सकाळी, दुपारी व सायंकाळच्‍या वेळेत साधारण ४ कि.मी. अंतर पार करण्‍यासाठी वाहनचालकांना समोरील वाहन कधी जाते, याची प्रतीक्षा करावी लागते.

ठेकेदाराचा मुजोरपणा!
रस्‍ता खचल्‍याने ठेकेदाराला खड्डेमय रस्‍त्‍याकडे दुर्लक्ष करून आपली मनमानी सुरूच ठेवली आहे. गिरी येथे गुरुवारी रस्‍त्‍याचा काही भाग खचून मोठा खड्डा पडला, तेथे ठेकेदाराने एक बॅरल ठेवले आहे. मात्र, तेथे अरुंद रस्‍त्‍यावर दोन्‍ही बाजूंनी वाहतूक सुरू असताना तो खड्डा का बुजविला नाही. उलट बॅरल ठेवून वाहनचालकांना अपघाताला निमंत्रण दिले आहे. खड्डेमय रस्‍त्‍यांकडे दुर्लक्ष केल्‍याने वाहतचालकांकडून नाराजी व्‍यक्‍त केली जात आहे.

अपघाताला निमंत्रण
महामार्गाचे काम सुरू असताना म्‍हापसा- पणजीच्‍या दिशेने जाणाऱ्या मुख्‍य रस्‍त्‍यावर दोन्‍ही बाजूंनी वाहतूक सुरू करून समस्‍येत आणखी भर घातली आहे. त्‍यात खड्ड्यांचे साम्राज्‍य एवढे पसरले की, वाहनांचा वेग कमी होतो व वाहतुकीचा खोळंबा होतो. खड्डे चुकविण्‍याचा एखाद्या वाहनचालकाने प्रयत्‍न केला, तर समोरून व मागून येणाऱ्या वाहनाला अपघाताला निमंत्रण ठरते. कित्‍येकवेळा वाहनचालकांचेही वादही उद्‍भवतात. चूक कुणाची आणि भोगावे लागते कुणाला, अशी परिस्‍थिती नित्‍याचीच बनली आहे. सरकारचेही त्‍याकडे दुर्लक्ष होत आहे आणि त्‍यामुळे ठेकेदाराचे आयतेच फावते. ठेकेदाराला एवढा वरदहस्‍त का? असा प्रश्‍‍न वाहनचालकांकडून उपस्‍थित केला जात आहे.

GOA GOA GOA

 

संबंधित बातम्या