स्मार्ट सिटी च्या संचालक मंडळात, मोन्सेरात व मडकईकर यांना स्थान

गोमंतक वृत्तसेवा
शनिवार, 17 ऑक्टोबर 2020

इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) नवे संचालक मंडळ आज जाहीर झाले. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडेच आयपीएससीडीएलचे चेअरमनपद कायम राहिले आहे.

पणजी:  इमेजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडचे (आयपीएससीडीएल) नवे संचालक मंडळ आज जाहीर झाले. राज्याचे मुख्य सचिव परिमल राय यांच्याकडेच आयपीएससीडीएलचे चेअरमनपद कायम राहिले आहे. अपक्षेप्रमाणे आमदार बाबूश मोन्सेरात व महापौर उदय मडकईकर यांना मंडळात स्थान दिलेले आहे. 

राज्य सरकारने आयपीएससीडीएलच्या नूतन मंडळाविषयीची अधिसूचना जाहीर केली. जा मंडळावर संचालक म्हणून अर्थखात्याचे सचिव तथा आयएएस अधिकारी पुनित कुमार, नगरविकास खात्याचे सचिव आयएएस अमित सतिजा, नगरविकास खात्याचे संचालक तथा संयुक्त सचिव आयएएस डॉ. तारिक थॉमस, उत्तर गोवा जिल्हाधिकारी आर. मेनका, महापालिका आयुक्त आयएएस संजित रॉड्रिग्स, प्रि. मुख्य अभियंता (साबांखा) उत्तम पार्सेकर, गृह आणि नगरकल्याण खात्याचे संचालक नवीनकुमार यादव, आमदार बाबूश मोन्सेरात, महापौर उदय मडकईकर यांचा समावेश आहे. त्याशिवाय राज्य सरकारने यापूर्वीच व्यवस्थापकीय संचालक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून अतिरिक्त ताबा आयएएस हेमंत कुमार यांच्याकडे सुपूर्द केला आहे. या अधिसूचनेनुसार त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब झालेला आहे. 

आयपीएससीडीएलच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावरून नुकतेच स्वयंदिप्ता पाल चौधरी यांना बाजूला करण्यात आले आहे. त्यामुळे अतिरिक्त पदभार स्वीकारणारे हेमंत कुमार पणजीचा किती कायापालट करतात हे काही दिवसांत दिसून येईल.

संबंधित बातम्या