मेळावली आयआयटीसाठीच्या जागेत वृक्षारोपण

प्रतिनिधी
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

पर्यावरण जतनाचा संदेश देत नागरिकांचा प्रकल्पाला विरोध कायम

वाळपई: सत्तरी तालुक्यातील मेळावली गावात सर्वे क्रमांक ५७/‘ या जागेत होऊ घातलेल्या आयआयटी संस्थेविरोधात नागरिकांचा एल्गार सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून १५ ऑगष्ट रोजी मेळावलीवासीयांनी प्रस्थावित आयआयटी संस्थेच्या जागेत मोठ्या प्रमाणावर विविध प्रकारची झाडे लावून निसर्ग जतनाचा संदेश दिलाच, शिवाय आयआयटी संस्थेला विरोध कायम असल्याचे दाखवून दिले आहे.

मेळावलीच्या जंगलातील लाखो झाडांची कत्तल करून आयआयटी संस्था बांधली जाणार आहे, पण नागरिकांनी येथील निसर्गसंपदा नष्ट करून संस्था नको असल्याचे स्पष्ट केले आहे. तसेच ही सरकारी जागा असली तरीही त्यात आल्वारा जमीनधारक लोक आहेत. त्यामुळे संस्थेमुळे उत्पन्नावर गडांतर येऊन पोटच्या जमिनी जाणार आहेत. नागरिक शुभम शिवोलकर म्हणाले, सरकारने लोकांचा विरोध पाहून देवस्थानची काही जागा सोडतो असे म्हटले आहे. तसे सरकार करीत असल्यास येथील लोकांच्या जमिनीही नावावर सरकारने करून दिल्या पाहिजेत. पण तसे न करता सरकार बळजबरीने आयआयटी संस्था मेळावलीत करण्याचा घाट घातला आहे. आम्ही सर्व नागरिकांनी देशाच्या स्वातंत्र्य दिवशी मोठ्या प्रमाणावर विविध झाडांची लागवड या जैवसंपत्तीत केली आहे. या पर्यावरण जतन कार्यात पुरुष, महिला वर्ग मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. निसर्ग हा आपला आहे. त्याचे रक्षण करण्याची जबाबदारी सर्वांची आहे.

संबंधित बातम्या