बेकायदा प्लास्टर ऑफ पॅरिस गणेशमूर्तीची टाळेबंदीतही बिनधास्त वाहतूक सुरू

dainik gomantak
रविवार, 24 मे 2020

त्वरित कडक कारवाई करण्याची गरजही स्थानिक मूर्तिकारांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.

पणजी, 

राज्यात आणि देशातही कोरोनाच्या पार्श्वभूमीवर टाळेबंदी असतानाही राज्यातील सीमाभागात गणेश मूर्ती आयात करण्यात येत आहेत. खात्रीलायक सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, या मूर्ती प्लास्टर ऑफ पॅरिसच्या आहेत. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी इतकी काळजी घेतली जात असताना या मूर्ती आणणाऱ्या ट्रकांसाठी रान कसे मोकळे होते? असा प्रश्न आता सीमाभागातील लोक विचारत आहेत. संबंधितांनी हे प्रकारावर निर्बंध घालायला हवा. त्वरित कडक कारवाई करण्याची गरजही स्थानिक मूर्तिकारांतर्फे व्यक्त करण्यात येत आहे.
टाळेबंदीत काळातही बिनधास्तपणे गणेशमूर्तीची वाहतूक सुरू होती. सगळीकडेच पोलिसांतर्फे नाक्यानाक्यावर तपासणी करण्यात येत होती. अशा काळात प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती घेऊन येणारे ट्रकमात्र सहीसलामत राज्यात दाखल होत आहेत. याकडे संबंधितांचे दुर्लक्ष होत असल्याची टीका स्थानिक मूर्तिकारांतर्फे करण्यात येत आहे.
राज्यात प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्ती तयार करण्यास आणि त्या बाहेरून आणण्यासाठी बंदी आहे. या मूर्तीमुळे राज्यातील पारंपरिक मूर्तीकाम करणाऱ्या लोकांच्या व्यवसायावर गदा तर येतेच, पण या कामातून जे काय थोडेथोडके पैसे त्यांना मिळत असतात. ते मिळण्याची शक्यताही कमी होते. त्यामुळे राज्य सरकारने याबाबतीत कडक नियम लागू करून त्यांची अंमलबजावणी करणेही आवश्यक आहे.

सीसीटीव्हीद्वारे शोध घ्या
सरकारने या ट्रकमधून राज्यात आणण्यात आलेल्या मूर्तीची माहिती काढून कारवाई करणे अपेक्षित आहे. रस्त्यांवर अनेक ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे आहेत, सरकारने हे कॅमेरे पाहून या ट्रकांची माहिती काढणे अपेक्षित आहे. सरकारी यंत्रणेला सीसीटीव्हीद्वारे शोध घेणे शक्य आहे.
राज्यात दरवर्षी थोड्याफार प्रमाणात असा प्रकार होतोच, पण यावर्षी टाळेबंदी असतानाही असा प्रकार होणे चुकीचे आहे. मुळात प्लास्टर ऑफ पॅरिस हे निसर्गासाठी घातक आहे. गणपती बाप्पा आपल्याला निसर्ग प्रदूषण करण्यास सांगत नाहीत, मात्र चार पैशासाठी माणूसच नियम मोडत आहे. खरी मूर्तिकला जगणे, ही काळाची गरज असून याबाबतीत सरकारने ठाम भूमिका घेणे आवश्यक असल्याचे एका मूर्तिकाराने म्हटले आहे.

संबंधित बातम्या