उत्पादन क्षेत्राला प्रोत्साहन

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 12 नोव्हेंबर 2020

भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी आणि आंतराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक, औषध उत्पादन, अपारंपरिक उर्जा, दूरसंचार यासह दहा क्षेत्रांमध्ये उत्पादनांशी निगडित दोन लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन देणाऱ्या ‘पीएलआय’ योजनेची घोषणा केली आहे

नवी दिल्ली  : भारताला जागतिक उत्पादन केंद्र बनविण्यासाठी आणि आंतराष्ट्रीय गुंतवणूक आकर्षित करण्यासाठी सरकारने इलेक्ट्रॉनिक, औषध उत्पादन, अपारंपरिक उर्जा, दूरसंचार यासह दहा क्षेत्रांमध्ये उत्पादनांशी निगडित दोन लाख कोटी रुपयांचे प्रोत्साहन देणाऱ्या ‘पीएलआय’ योजनेची घोषणा केली आहे. निर्यातवृद्धी आणि रोजगारनिर्मितीवर या योजनेचा भर असेल.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली केंद्रीय मंत्रिमंडळाची आज बैठक होऊन त्यात महत्त्वाच्या निर्णयावर शिक्कामोर्तब करण्यात आले. त्यानंतर माहिती व प्रसारणमंत्री प्रकाश जावडेकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी निर्णयांची माहिती दिली. या अर्थिक प्रोत्साहनपर ‘पीएलआय’ योजनेसाठी नितीआयोगाने प्रस्ताव मांडला होता. भारतीय उद्योजकांना वैश्विक स्पर्धेसाठी सक्षम बनविणारी तसेच महत्त्वाच्या क्षेत्रांत अत्याधुनिक तंत्रज्ञानासोबतच गुंतवणूक आकर्षित करणारी ही योजना भारताला आत्मनिर्भर बनविणारी आणि जागतिक पुरवठा साखळीचा घटक बनविणारी असल्याचे अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या. तर उद्योग क्षेत्राला ही दिवाळी भेट असल्याचा दावा मंत्री जावडेकर यांनी यावेळी केला. 

इलेक्ट्रॉनिक उत्पदनांना चालना
पीएलआय योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक्स, इलेक्ट्रिक वाहने, अपारंपरिक ऊर्जा या क्षेत्रात गुंतवणूक वाढणे अपेक्षित आहे. डेटा केंद्रीकरण, इंटरनेट ऑफ थिंग्ज, स्मार्ट सिटी, डिजिटल इंडिया यासारख्या उपक्रमांमध्ये इलेक्ट्रॉनिक उत्पादनांची लागणारी गरज पाहता ‘पीएलआय’ योजनेमुळे इलेक्ट्रॉनिक उत्पादनाला प्रोत्साहन मिळेल. तसेच भारतीय वाहन उद्योगाच्या क्षमतेतही वृद्धी होईल. 

संबंधित बातम्या