दाबोळी चिखली पोलिस निवासी इमारतींची दुर्दशा

वार्ताहर
बुधवार, 16 सप्टेंबर 2020

दाबोळी चिखली येथील पोलिस निवासी इमारतींची दुर्दशा झाली असून पैकी दोन इमारती मोडकळीस काढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. तर आज सकाळी एका इमारतीचा भाग कोसळल्याने या इमारतींत राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

दाबोळी:  दाबोळी चिखली येथील पोलिस निवासी इमारतींची दुर्दशा झाली असून पैकी दोन इमारती मोडकळीस काढण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून माहिती प्राप्त झाली आहे. तर आज सकाळी एका इमारतीचा भाग कोसळल्याने या इमारतींत राहणाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

  चिखली उतरणी जवळ ४० वर्षांपूर्वीची पोलीस वसाहत असून या वसाहतीत आठ इमारती उभ्या आहेत. ज्या आता जीर्ण झाल्या आहेत. त्यामुळे त्या धोकादायक बनल्या आहेत. गेल्या चार पाच वर्षापासून या जीर्ण झालेल्या इमारतीचे कॉंक्रीटचे तुकडे पडत असून येथील पोलीस रहिवाशांनी याविषयी तक्रार केली होती. सरकारकडे याविषयी प्रस्ताव मांडला होता मात्र प्रस्ताव आजपर्यंत लालफितीत आहे. पावसाळ्यात या इमारतींना आतल्या बाजूने गळती लागत असून स्वयंपाक घरात हॉटेलमध्ये बेडरूममध्ये सिमेंटचे तुकडे पडत असल्याच्या घटना पाच वर्षांपूर्वी घडत होत्या. 

दरम्यान पाच वर्षापूर्वी दाबोळीचे आमदार माविन गुदिन्हो यांनी संबंधित अधिकाऱ्यां बरोबर या इमारतींची पाहणी केली होती. त्यावेळी येथील इमारतींची घाण सर्वत्र रस्त्यावर वाहत होती. तसेच काही इमारतींना तडे आले होते. त्यावेळी आमदार माविन गुदिन्हो आणि पोलिस अधिकाऱ्यांनी याची पाहणी केली होती. तेव्हा श्री गुदिन्हो यांनी आपण सरकार दरबारी प्रस्ताव मांडून इमारतींची डागडुजी करणार असल्याचे येथील रहिवाशांना सांगितले होते. मात्र आजपर्यंत या इमारतीची ना देखभाल झाली ना डागडूजी झाली. या आठ इमारती पैकी सात इमारती पूर्णपणे जीर्ण झाल्या असून या इमारतींवर केव्हा गंडांतर येईल सांगता येत नाही. अजून या इमारतींत १४ पोलीस कुटुंब राहतात. त्यांना यापासून धोका निर्माण झाला आहे. त्यांना इतर स्थलांतरित करण्यात यावे अशी त्यांची मागणी आहे. परंतु ते शक्य होत  नाही.

दरम्यान आज सकाळी यापैकी एका इमारतीचा वरच्या भागाचा स्लॅब कोसळून पडला. सुदैवाने यावेळी खाली कोणीही नव्हता. बाहेरच्या बाजूच्या कोसळ्याने या खोलीत राहणारे पोलीस कुटुंबीय सहीसलामत बचावले. आता तरी सरकारने जागे व्हावे व या इमारतींचा सोक्षमोक्ष लावून त्या ठिकाणी नवीन इमारत उभारण्यात यावी अशी मागणी होत आहे. तत्पुर्वी येथे राहणाऱ्यांची इतर ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी अशीही मागणी होत आहे. 

संबंधित बातम्या