केरीत कर्नाटकातील मजुरांची फरफट

dainik Gomantak
शुक्रवार, 15 मे 2020

गोव्याच्या विविध भागात काम करणारे कर्नाटकातील मजूर आपल्याला गावी जाण्यासाठी सत्तरीतील केरी तपासणी नाक्यावर गर्दी करत आहेत. जोपर्यंत त्यांची ऑनलाईन प्रकिया करून आवश्यक सर्व सोपस्कार पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना केरी तपासणी नाका परिसरातच रस्त्यावर रहावे लागत आहे.

पर्ये

गोव्याच्या विविध भागात काम करणारे कर्नाटकातील मजूर आपल्याला गावी जाण्यासाठी सत्तरीतील केरी तपासणी नाक्यावर गर्दी करत आहेत. जोपर्यंत त्यांची ऑनलाईन प्रकिया करून आवश्यक सर्व सोपस्कार पूर्ण होत नाही, तोपर्यंत त्यांना केरी तपासणी नाका परिसरातच रस्त्यावर रहावे लागत आहे. गेल्या सहा दिवसांपासून येथून कर्नाटकचे अनेक मजूर कुटुंबे त्यांच्या गावी रवाना झाली आहेत. त्याचबरोबर अनेक मजुरांना ऑनलाईन प्रक्रिया न झाल्याने २-३ दिवस केरीतच ताटकळत राहावे लागते. यातील बरीच कुटुंबे आपल्या लहान लहान मुलांसह असल्याने या सर्वप्रकारचा त्यांना त्रास सोसावा लागत आहे.
दिवसभर अनेक मजूर केरीत दाखल झाले. ज्यांची गावी जाण्याच्या अर्जांची प्रक्रिया पूर्ण झाली त्यांना जाता आले. तसेच अनेक कुटुंबे प्रक्रियेअभावी ताटकळून राहिली. गेल्या दोन दिवसांपासून बिजापूर जिल्ह्यातील मुद्देबिहाळ तालुक्यातील अनेक कुटुंबाना म्हापसा आश्रय केंद्रात पाठवण्यात आले आहे.
गेल्या काही दिवसांत ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण न होताच केरीत आणि मोर्ले येथे अडकून राहिलेल्या कर्नाटकच्या मजुरांना आज दुपारी म्हापशातील आश्रयगृहात पाठवण्यात आले. हा निर्णय वाळपई मामलेदारांतर्फे घेण्यात आला. यासंबंधी वाळपई मामलेदारांनी सांगितले की, या मजुरांची ऑनलाईन प्रक्रिया पूर्ण झाली नव्हती. त्यांची प्रक्रिया होण्यासाठी काही अवधी लागेल. तोपर्यंत येथे त्यांना ठेवल्यास त्यांच्या राहण्याची व जेवणाची समस्या निर्माण होणार आहे. केरी व मोर्ले येथे त्यांची ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी व्यवस्था नाही. म्हापसा येथील आश्रयगृहात ही प्रक्रिया आमचे कर्मचारी वर्ग करणार आहेत. त्यामुळे आम्ही त्यांना म्हापशात पाठवल्याचे संयुक्त मामलेदार संजीवनी सातरडेकर यांनी सांगितले. म्हापशात त्यांना राहण्याची व जेवणाची सोय होईल, असे त्यांनी सांगितले. दरम्यान, आज संध्याकाळी प्रक्रिया अपूर्ण असलेल्या मजुरांना म्हापशात हलवले.

ऑनलाईन प्रक्रिया ठरते अडचणीची
गोव्यातून कर्नाटकात जाण्यासाठी ऑनलाईन प्रक्रिया करणे गरजेचे आहे. मजूर असलेल्या या लोकांना हा ऑनलाईन अर्ज भरण्याची माहिती नसते. हे अर्ज एक तर स्मार्ट फोनवर किंवा सायबर कॅफेमध्ये भरावे लागतात. त्यातील बऱ्याच जणांकडे स्मार्टफोन नसल्याने त्यांची गैरसोय होते. सायबर कॅफेमध्ये त्यांच्याकडून अव्वाच्या सव्वा पैसे आकारले जातात. काहींना याची कल्पनाच नाही. त्यामुळे बहुतेक मजूर ही प्रक्रिया करण्यापूर्वीच केरीत दाखल झाले.

वाळपई पोलिसांची चांगली कामगिरी
गेल्या आठवड्याभरापासून केरी तपासणी नाक्यावर मोठ्या प्रमाणात कर्नाटकचे मजूर गावी जाण्यासाठी दाखल झाले होते. त्यांना हाताळण्यासाठी वाळपई पोलिस, उपजिल्हाधिकारी व मामलेदार कार्यालय यांनी चांगली कामगिरी बजावली आहे. गरीब स्थलांतरित मजूर थकून भागून केरीत पोहचल्यावर पोलिसांकडून त्यांना चांगले माणुसकीच्या दृष्टीने हाताळण्याचे चित्र पाहायला मिळाले. बुधवारी जेव्हा या मजुरांना म्हापसा आश्रयगृहात पाठवण्याचा निर्णय घेतला, तेव्हा भीतीने व अविश्वासाने मजूर जाण्यास तयार नव्हते. पण, शेवटी पोलिसांनी शांतपणे समजून सांगितल्याने मजूर तयार झाले.

संबंधित बातम्या