आता नागरिकांना मिळणार 'स्वामित्वा'चा हक्क

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 12 ऑक्टोबर 2020

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वामित्व’ योजनेअंतर्गत मालमत्ता पत्रकाचे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करण्याच्या मोहिमेचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी जनतेशी संवाद साधला. ग्रामीण भारतात मोलाचा बदल घडवून आणण्याची क्षमता मालमत्ता पत्रकात असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला.

नवी दिल्ली- ग्रामीण भागातील नागरिकांना मालमत्ता पत्रकाचे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप हे ‘आत्मनिर्भर भारता’च्या दिशेने टाकलेले मोलाचे पाऊल आहे, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज केले. या माध्यमातून गावातील लोकांना आर्थिक लाभ मिळविण्याची मोठी संधी निर्माण झाली आहे, असा दावाही त्यांनी आज केला. 

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज ‘स्वामित्व’ योजनेअंतर्गत मालमत्ता पत्रकाचे (प्रॉपर्टी कार्ड) वाटप करण्याच्या मोहिमेचे उद्घाटन केले. व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून मोदींनी जनतेशी संवाद साधला. ग्रामीण भारतात मोलाचा बदल घडवून आणण्याची क्षमता मालमत्ता पत्रकात असल्याचा दावा यावेळी त्यांनी केला. पंतप्रधानांनी यावेळी काही लाभार्थींशी संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘मालमत्ता पत्रकाचे वाटप ही ऐतिहासीक घटना आहे. या पत्रकाचा आर्थिक संपत्तीप्रमाणे उपयोग करून लोकांना कर्ज आणि इतर आर्थिक फायदे मिळविता येतील. तसेच, जमिनीच्या मालकीवरून गावकऱ्यांमध्ये होणारे वादही यामुळे मिटतील. भारताला आत्मनिर्भर बनविण्याच्या दिशेने टाकलेले हे महत्त्वाचे पाऊल आहे. संपत्तीच्या मालकीचा अधिकार ही देशाच्या विकासात मोठी भूमिका बजावू शकणारी बाब असल्याचे जगभरातील तज्ज्ञांचे म्हणणे आहे.’’ जगातील फक्त एक तृतियांश लोकसंख्येकडेच स्वत:च्या नावावर नोंद असलेली मालमत्ता असल्याचेही मोदींनी यावेळी सांगितले. 

पंतप्रधान कार्यालयाने दिलेल्या माहितीनुसार, ग्रामस्थांना त्यांच्या मोबाईलवर आलेल्या एसएमएस लिंकच्या मदतीने मालमत्ता पत्रक डाऊनलोड करता येणार आहे. त्यांना प्रत्यक्ष प्रतही नंतर मिळणार आहे. टप्प्या टप्प्यांमध्ये राबविल्या जाणाऱ्या या योजनेत देशभरातील एकूण साडे सहा लाख गावांचा समावेश केला जाणार आहे. 

काय  म्हणाले पंतप्रधान मोदी?

-मालमत्तेचा अधिकार असणे भारतासारख्या देशात आवश्‍यक

-युवकांना कर्ज घेऊन नवीन उद्योग सुरु करता येईल

 -यामुळे युवकांमधील आत्मविश्‍वास वाढून ते स्वावलंबी बनतील.

 -ग्रामपंचायतींचेही कामकाज सोपे होईल.

  -पुढील चार वर्षांत प्रत्येक कुटुंबाला मालमत्ता पत्रक देण्याचा प्रयत्न
 

संबंधित बातम्या