गोव्यात उद्यापासून पोलिस, सुरक्षा रक्षकांना कोरोना प्रतिबंधक लस मिळणार

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 7 फेब्रुवारी 2021

गोव्यात डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मिळून 19,329 जणांची नोंद झालेली असून आतापर्यंत 7,246 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे.

पणजी :  गोव्यात डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचारी मिळून 19,329 जणांची नोंद झालेली असून आतापर्यंत 7,246 जणांना कोरोना प्रतिबंधक लस देण्यात आली आहे. १२ फेब्रुवारीपर्यंत उर्वरित सर्वांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस पूर्ण केला जाणार आहे. त्याचबरोबर 8 फेब्रुवारीपासून पोलिस, सुरक्षा रक्षक व इतर फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यास सुरवात होणार आहे. त्यासाठी आतापर्यंत 15,647 जणांची नोंदणी झालेली आहे, अशी माहिती कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेच्या अधिकारी डॉ. वंदना धुमे यांनी दिली. कांपाल - पणजी येथील आरोग्य संचालनालयाच्या कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधताना डॉ. धुमे यांनी सांगितले, की 16 जानेवारीपासून राज्यातील डॉक्टर, परिचारिका व आरोग्य कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्याची मोहीम सुरू झालेली आहे .

वैद्यकीय कचरा विल्हेवाटीसाठी अत्याधुनिक सुविधा

आतापर्यंत 7,246 जणांनी ती टोचून घेतली असून २८ दिवसानंतर लसीचा दुसरा डोस देण्यात येणार आहे. गोव्याला केंद्राकडून 12 जानेवारीला कोविशिल्ड व्हॅक्सिनचे १८ हजार डोस व  20 जानेवारीला 23500 डोस मिळाले आहेत.  यानंतर तिसरा हप्ता लवकरच मिळण्याची शक्यता आहे. 8 फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या दुसऱ्या टप्प्यात पोलिस, सुरक्षा रक्षक व इतर फ्रन्टलाइन कर्मचाऱ्यांना कोरोना प्रतिबंधक लस टोचली जाईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये 50 वर्षांवरील नागरिकांना आणि चौथ्या टप्प्यात 50 वर्षांखालील नागरिकांना लस टोचली जाणार आहे. मात्र, तत्पूर्वी ज्यांना विविध आजार आहेत अशा व्यक्तींना कोरोना प्रतिबंधक लस टोचण्यात येणार आहे, असे डॉ. धुमे यांनी सांगितले.

गोवा नगरपालिका निवडणुक प्रभाग आरक्षणाला थेट न्यायालयात आव्हान

एक डोस घेतल्यानंतर 28 दिवसानंतर दुसरा डोस घेण्याची गरज असते. त्यामुळे  ज्यांनी लस घेतलेली आहे. त्यांना दुसरा डोस देण्यात आलेला नाही. तो त्यांना घेतलेल्या लसीच्या 28 दिवसानंतर दिला जाणार आहे. ज्यांना  कोरोना प्रतिबंधक लस घ्यायची आहे त्यांनी कोरोना पोर्टलवर नोंदणी करावी लागते. गोवा सरकारने सुरवातीला सात केंद्रामध्ये लस टोचण्यास सुरवात केली होती आता या केंद्राची संख्या 14 ते 15 पर्यंत वाढविण्यात आलेली आहे, असेही डॉ. धुमे यांनी सांगितले. कोरोना प्रतिबंधक लस सुरक्षित आणि परिणामकारक असून ती घेण्यास कुणीही घाबरू नये, असे आवाहन यावेळी डॉ. राजेंद्र बोरकर यांनी केले. जगाचा विचार केल्यास भारतामध्ये कोरोना संसर्ग झालेले कमी व्यक्ती असल्याचे सांगून कोरोनावर कोरोना प्रतिबंधक लस हाच उपाय असल्याचे डॉ. बोरकर म्हणाले.

संबंधित बातम्या