पोलिसच करतायेत अपराध्याला वाचविण्याचा प्रयत्न

गोमंतक वृत्तसेवा
गुरुवार, 5 नोव्हेंबर 2020

पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी रात्री उशिरा अनामिक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याप्रमाणे चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. 

काणकोण : चापोली धरणावर काढलेल्‍या अश्‍लील व्हिडिओ संदर्भात पहिल्यांदा काणकोण पोलिसांत तक्रार केलेले सम्राट भगत यांनी हा व्हिडिओ सतरा मिनिटांचा असून सकाळी पोलिसांच्या संगनमताने त्याचे चित्रीकरण करण्यात आल्याचा आरोप केला. यावेळी पोलिस निरीक्षक चव्हाण यांनी रात्री उशिरा अनामिक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल केली होती. त्याप्रमाणे चौकशी सुरू असल्याचे सांगून वेळ मारून नेण्याचा प्रयत्न केला. 

बहुचर्चित मॉडेलला काणकोण पोलिस चांगलेच ओळखत आहेत. त्यामुळे अनामिक व्यक्तीविरुद्ध तक्रार दाखल करून पोलिस अपराध्याला वाचविण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. यावेळी गौरव भगत यांनी आपल्या साडेतीन वर्षाच्या मुलीने हा व्हिडिओ बघितला, तिला उत्तर काय द्यायचे यासाठी ज्यांनी व्हिडिओ काढण्यासाठी सहकार्य केले आहे त्यांना शिक्षा होण्याची मागणी केली.

अल्‍पवयीन मुलांनी 
पाहिला व्‍हिडिओ!

काँग्रेसच्या प्रतिमा कुतिन्हो यांनी आपल्या मुलाने ऑनलाईन शिक्षण घेत असताना हा व्हिडिओ पाहिला. अशा अनेक अल्पवयीन मुलांनी हा व्हिडिओ पाहिला असेल. त्यासाठी त्याला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्याविरूद्ध कारवाई होण्याची गरज व्यक्त केली. या आंदोलनात शांताजी नाईक गावकर, माजी मंत्री रमेश तवडकर, मोहनदास लोलयेकर, जनार्दन भंडारी,  प्रशांत नाईक, संजू नाईक, नगराध्यक्षा नीतू देसाई, देवेंद्र नाईक, भाजपचे मंडळ अध्यक्ष नंदीप भगत, नगरसेवक शामसुंदर नाईक देसाई, रमाकांत नाईक गावकर व अन्य आंदोलक उपस्थित होते. आज संध्याकाळी आंदोलकांनी चावडी बाजारात फिरून या अश्‍लील  व्हिडिओच्या निषेधार्थ गुरुवारी बाजार बंद ठेवण्याचे आवाहन दुकानदारांना केले.

वातावरण तापल्‍याने ‘त्‍या’ मॉडेलकडून काढता पाय
मॉडेलचा अत्यंत अश्‍लील व्हिडीयो आज विविध समाजमाध्यमांवर फिरत असल्याने या प्रकरणाचा छडा लावण्याची मागणी सम्राट भगत यांनी काणकोण पोलिसात तक्रार दाखल करून ४८ तास झाले तरीही कारवाई झाली नाही. या संदर्भात उपसभापती इजिदोर फर्नांडिस यांनी चापोली धरणाला भेट देऊन तेथील सुरक्षा व्यवस्थेची पाहाणी केली. त्याचप्रमाणे या अश्‍लील व्हिडिओ संदर्भात कालच पोलिसांत तक्रार दाखल केली होती. भाजप मंडळानेही तक्रार दाखल केली आहे. चित्रीकरण केलेल्या व्यक्तीने जलस्त्रोत खात्याकडून परवानगी घेतली नाही. यासाठी जलस्त्रोत खात्याच्या काणकोणमधील अधिकाऱ्यानी व्हिडिओ चित्रीकरण करणाऱ्या अनामिक व्यक्तीविरुद्ध काणकोण पोलिसांत तक्रार दाखल केली आहे. दरम्यान पाळोळे येथील एका तारांकीत हॉटेलात दोन महिन्यांसाठी या मॉडेलने खोलीचे आरक्षण केले होते. मात्र, हा व्हिडिओ व्हायरल होऊन काणकोणात वातावरण तापू लागल्याने या मॉडेलने काणकोणातून काढता पाय घेतला आहे.

संबंधित बातम्या