सहजपणे दिलेली माहिती झाली ध्वनिमुद्रित आणि तो पकडला गेला....

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 7 सप्टेंबर 2020

स्वप्नील वाळके याचे सराफी दुकान लुटण्याचा कट काही महिन्यांपूर्वी रचण्यात आला होता. ही माहिती कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी मुसा (मुख्य संशयीत मुस्तफा शेख) याने मला दिली होती.

मडगाव: स्वप्नील वाळके याचा खून करण्यासाठी सुपारी देण्यात आली होती व काही महिन्यांपूर्वी स्वप्नील याच्या हत्येचा कट रचण्यात आला होता, अशी माहिती या प्रकरणात ताब्यात घेऊन पोलिसांनी सुटका केलेल्या एडसन गोन्साल्‍विस याने एका पत्रकाराकडे सहजपणे बोलताना दिली होती. ती त्याच्या नकळत ध्वनिमुद्रित करण्यात आली आहे. त्याच्या या माहितीमुळे तपासाला वेगळी कलाटणी मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

स्वप्नील वाळके याचे सराफी दुकान लुटण्याचा कट काही महिन्यांपूर्वी रचण्यात आला होता. ही माहिती कोणाला सांगितल्यास जिवे मारण्याची धमकी मुसा (मुख्य संशयीत मुस्तफा शेख) याने मला दिली होती. एकदा गाडी चालवत असताना मुस्तफा याने मला फाईल (सुपारी) मिळाली असल्याचे सांगितले होते. त्यासाठी किती पैसे मिळाले व कोणी सुपारी दिली ते मुस्तफाने सांगितले नाही, असे त्याने पत्रकारांकडे बोलताना सांगितले.  

मुस्तफा व एव्हेंडर हे दोघेही टाळेबंदीच्‍या पूर्वी बिहारमध्ये पिस्तूल आणण्यासाठी गेले होते. त्यांचे टार्गेट कोण व्यक्ती आहे व तारीख कधी ती मुस्तफाने सांगितली नव्‍हती. त्यामुळे मी त्याला विचारले तेव्हा तुला कशाला हवे, उद्या ही माहिती कुणालाही देऊन आम्हाला खड्ड्यात घालण्यासाठी का? असा प्रतिसवाल मुस्तफाने मला केल्याचे एडसन याने ध्वनिमुद्रित झालेल्या माहितीत सांगितले आहे.

मुस्‍तफाची गुन्‍हेगारी पार्श्वभूमी
संशयित मुस्तफा शेख हा काही वर्षापूर्वी सांताक्रुझ परिसरात गुन्हेगारी कारवायांमध्ये होता. तसेच त्याच्याविरुद्ध चोऱ्या व हल्ल्याचे गुन्हे पोलिसांत नोंद आहेत. मडगाव येथे त्याने गुन्हेगारीची दहशत सांताक्रुझच्या काही गुन्हेगारांना हाताशी धरून निर्माण केली होती व कारवाया सुरू होत्या. संशयित मुस्तफा शेख याचे कुटुंब सांताक्रुझ भागात राहत असल्याने तसेच तो या भागातच मोठा झाल्याने तो सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील जेनेटो कोर्दोज गँगमधील असल्याचा संशय पोलिसांना होता. मात्र केलेल्या तपासात तसे काही आढळून आलेले नाही. त्याने मोठी लूट करण्याचा बेत आखूनच साथीदार ओमकार व एव्हेंडर या दोघाना सराफी दुकानाबाहेर हे धाडस केले होते. त्याच्या साथीदाराकडून त्याच्याकडे मोठ्या चोऱ्या करण्याचे धाडस नसल्याची हेटाळणी होत होती त्यामुळे पिस्तुलाचा धाक दाखवून लुटण्याचे ठरवून हे कृत्य केले.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या