गोवा: अभ्यासक्रम 'ऑनलाईन' शिकवला मग परीक्षा 'ऑफलाईन' का? विद्यार्थ्यांचा सरकारला सवाल

protest for offline exam.jpg
protest for offline exam.jpg

पणजी: देशात तसेच राज्यात कोविड संसर्गाचे प्रमाण झपाट्याने वाढत असल्याने इतर राज्यांनी परीक्षा रद्द व पुढे ढकलल्या आहेत. गोव्यात मात्र गोवा शालान्त मंडळाच्या दहावी व बारावीच्या परीक्षा ‘ऑफलाईन’ घेण्यात येत असल्याने त्याच्या विरोधात विद्यार्थ्यांनी मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानावर आज दुपारच्या सुमारास मोर्चा नेला. या परीक्षा पुढे ढकलाव्या किंवा ऑनलाईन’ घेण्याची मागणी केली व त्यांनी यावेळी निदर्शने केली. पणजी पोलिसांनी सुमारे 25 जणांना ताब्यात घेऊन पेडणे पोलिस स्थानकात नेले व त्यांना संध्याकाळी सोडून दिले.  (Police arrested students who opposed the offline exam)

राज्यात दिवसेंदिवस कोविड संसर्ग तसेच मृत्यूचे प्रमाण वाढल्याने 10 वी व 12वीच्या परीक्षा तहकूब करण्यात याव्यात किंवा त्या ऑनलाईन घ्याव्यात अशी मागणी विद्यार्थ्यांनी केली. त्याला भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटनेच्या गोवा विभागाने त्यांना पाठिंबा देत या मोर्चात सहभागी झाले. आज सकाळी विद्यार्थ्यांनी पर्वरी येथील गोवा शालान्त मंडळाच्या अध्यक्षांना भेटण्यास गेले मात्र ते अनुपस्थित असल्याने  सचिवांना भेटून ऑफलाईन परीक्षेमुळे कोविडचा धोका असल्याने ती पुढे ढकलावी किंवा ऑनलाईन घेण्याची मागणी केली. मात्र या सचिवांनी त्याचा निर्णय मंडळाशी नसून सरकारने घेतलेला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आल्तिनो - पणजी येथील मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानावर मोर्चा काढला. कोविड महामारीमुळे इतर राज्यांनी विद्यार्थ्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने परीक्षा रद्द करण्याचा तर काही परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला आहे. गोव्यात मात्र मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना विद्यार्थ्यांच्या आरोग्याबाबत काळजी नाही. परीक्षा केंद्रावर सरकारने सर्व ती व्यवस्था व सुविधा उपलब्ध केल्या असल्या तरी परीक्षेला येणारे विद्यार्थी हे प्रश्‍नपत्रिका सोडविल्यानंतर मित्रांशी चर्चा करतील त्याची जबाबदारी कोण घेणार व त्यातून कोविडची बाधा झाल्यास त्याला सरकार जबाबदारी घेणार आहे का असा सवाल विद्यार्थ्यांनी केला.  

कोविड रुग्णांच्या संख्येमुळे ही परीक्षा ठरल्यानुसार घेण्यात येऊ नये व ती तहकूब करण्यात यावी. गेले वर्षभर विद्यार्थ्यांना ऑनलाईन पद्धतीने अभ्यासक्रम शिकविला गेला तर परीक्षा ऑफलाईन पद्धतीने का? इतर राज्यांनी परीक्षा पुढे ढकलल्या आहेत त्यामुळे मुलांना अभ्यास करण्यास पुरेसा वेळ मिळणार आहे तर गोव्यातील विद्यार्थ्यांना या परीक्षा ऑफलाईन सक्तीच्या करून सरकार नुकसान करत आहे. त्याचा फटका विद्यार्थ्यांना प्रवेश मिळण्यास बसणार आहे. हजारो विद्यार्थ्यांनी या परीक्षांना विरोध केला आहे व त्यासंदर्भातचे सहीचे निवेदन ईमेलने मुख्यमंत्र्यांना पाठवूनही कोणतीच दखल घेतली जात नाही. मुख्यमंत्र्यांना भेटण्याची वेळ मागूनही ती दिली जात नाही. त्यामुळे हे सरकार विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी खेळत असल्याचा आरोप एनएसयूआय गोवा विभागाचे अध्यक्ष अफराज मुल्ला यांनी केला.  केंद्र सरकारने कोविड संक्रमणाच्या पार्श्‍वभूमीवर ‘सीबीएससी’ किंवा ‘आयसीएससी’ परीक्षा पुढे ढकलल्या आहेत. त्यामुळे सरकार गोव्यात या परीक्षा विद्यार्थ्यांवर का लादत आहेत? 24 एप्रिलपासून सुरू होणारी गोवा शालांत मंडळाच्या 10 व 12 वीच्या परीक्षेला सुरुवात होत असून सुमारे 30 हजार विद्यार्थी बसणार आहेत. अनेक शिक्षक - पालक समित्यांचाही या ऑफलाईन परीक्षेला विरोध आहे. मात्र सरकार आपल्या निर्णयाशी ठाम राहून विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात घालत असल्याची टीका विद्यार्थ्यांनी केली.

विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्याचा निषेध
कोविडमुळे जिवाला धोका असल्याचे विद्यार्थ्यांनी व्यक्त केले मत हा गुन्हा नोही. दहावी व बारावीच्या परीक्षा पुढे ढकलण्यासाठी निदर्शने करणाऱ्या एनएसयूआय गोवा विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याच्या सरकारच्या निर्णयाचा मी निषेध करतो. कोणत्याही अटीशिवाय या विद्यार्थ्यांची त्वरित सुटका करण्याची मागणी विरोधी पक्षनेते दिगंबर कामत यांनी केली. 

‘कोविड’बाबत मुख्यमंत्री अपयशी 
विद्यार्थ्यांना ताब्यात घेण्याच्या राज्य सरकारच्या कृत्याचा गोवा प्रदेश युवा कॉंग्रेसचे अध्यक्ष वरद म्हार्दोळकर यांनी निषेध केला. असंवेदनशील प्रमोद सावंत यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला विद्यार्थी समुदायाविषयी कोणतीही भावना नाही, हे त्यांनी आजच्या घटनेवरुन सिद्ध केले आहे. असंवेदनशील मुख्यमंत्री विद्यार्थ्यांना कोविड -19 च्या जोखमीत टाकत  आहेत. कोविडशी लढा देण्यास मुख्यमंत्री अयशस्वी झाले आहेत, परंतु आपल्या अहंकाराची पूर्तता करण्यासाठी ते विद्यार्थ्यांचे आयुष्य धोक्यात घालत आहेत, असे म्हार्दोळकर म्हणाले.

कोरोना झाल्यास जबाबदार कोण? 
आम आदमी पक्षाचे (AAP) राज्य संयोजक राहुल म्हांबरे यांनी विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी पेडण्यात धाव घेतली. ते पेडणे पोलिस ठाण्यात   विद्यार्थ्यांना भेटले. पोलिसांनी विद्यार्थ्यांना ताब्यात घेतल्यानंतर पिण्याच्या पाण्याचीही सोय न केल्याबद्दल म्हांबरे यांनी नाराजी व्यक्त केली. परीक्षेच्या दरम्यान जर कोरोनाचा संसर्ग विद्यार्थ्यांना झाला तर विद्यार्थ्याचे भवितव्य काय असेल? आणि उर्वरित पेपरची परीक्षा तो कसा देऊ शकेल? आणि कोणत्याही विद्यार्थ्याला कोरोनाचा संसर्ग झाला तर त्यासाठी सरकारला जबाबदार धरले जाईल का? अशी विचारणा त्यांनी यावेळी केली.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com