मच्छीमारी धक्क्यांवर पोलिस तैनात करा 

विलास महाडिक
गुरुवार, 30 जुलै 2020


राज्यात किरकोळ मासळी विक्री करणाऱ्यांना मच्छिमारी खात्याकडे नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले असून त्यासाठीचे शुल्क ठरविणारी अधिसूचना खात्याने यापूर्वीच काढली आहे. त्याची अंमलबजावणी या १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे.

पणजी

येत्या १ ऑगस्टपासून राज्यातील मासेमारी बंदीकाळ संपणार असल्याने काही मच्छीमारी ट्रॉलर्सनी समुद्रात मासेमारीसाठी जाण्याची तयारी सुरू केली आहे. कोविड - १९ ची मार्गदर्शक सूचनांच्या अंमलबजावणीसाठी मासेमारी धक्का येथे पोलिस तैनात करण्याची विनंती मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांना आज झालेल्या बैठकीत करण्यात आली. 
मच्छिमारी खात्याने आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन मासेमारी व्यवसायावर कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर मार्गदर्शक सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणीसाठी पोलिसांची गरज असल्याचे सांगितले. मासेमारी व्यवसायामध्ये मोठ्या परप्रांतीय कर्मचारी काम करत असल्याने त्यांना या सूचनांची सक्ती करण्याची गरज आहे. मासेमारी धक्क्यावर पोलिस तैनात करण्यात आल्यामुळे सूचनांचे योग्यप्रकारे पालन होईल, अशी माहिती मुख्यमंत्र्यांना देण्यात आली. याव्यतिरिक्त मासेमारी ट्रॉलर्सना राज्यातील मासळी मार्केटमध्ये किमान १० टक्के चांगल्या दर्जाची मासळी विक्री करण्यास सक्तीचे करण्यात येणार आहे, अशी माहिती मच्छीमारी खात्याच्या अधिकाऱ्यांनी दिली. 
राज्यात किरकोळ मासळी विक्री करणाऱ्यांना मच्छिमारी खात्याकडे नोंदणी करणे सक्तीचे करण्यात आले असून त्यासाठीचे शुल्क ठरविणारी अधिसूचना खात्याने यापूर्वीच काढली आहे. त्याची अंमलबजावणी या १ ऑगस्टपासून करण्यात येणार आहे. ‘एलईडी’ वापर करून मासेमारी करणाऱ्या ट्रॉलर्सवर देखरेख ठेवण्यासाठी अत्याधुनिक यंत्रणा अवलंबिण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्याविरुद्ध 
कारवाई करणे सोपे जाणार आहे, अशी माहिती मच्छिमारमंत्री फिलीप नेरी रॉड्रिग्ज यांनी दिली. १ ऑगस्टपासून मासेमारी सुरू होणार असली तरी काही मच्छिमाऱ्यांनी ऑगस्ट पूर्ण महिना मासेमारीसाठी न जाण्याचा निर्णय घेतला आहे तर ऑगस्ट महिन्यात मोठ्या प्रमाणात मोठी कोळंबी (प्राऊन्स) मिळत असल्याने काहींनी मासेमारी सुरू करण्याचे ठरविले आहे. 
या नव्या अधिसूचनेनुसार मासळी व्यापाऱ्यांना मच्छीमारी खात्याकडे नोंदणी करणे सक्तीचे असून प्रतिवर्ष २ लाख रुपये शुल्क व वीस हजार रुपये ठेव, मासळी मार्केटात मासे विक्री करणाऱ्या विक्रेत्यांना १०० रुपये शुल्क, बास्केट घेऊन फिरणाऱ्या विक्रेत्यांना १०० रुपये शुल्क, सायकलवरून मासळी विक्रेत्यांना २०० रुपये शुल्क, दुचाकीवरून मासळी विक्रेत्यांना ५०० रुपये शुल्क, तीनचाकीवरून मासळी विक्रेत्यांना १ हजार रुपये तर चारचाकीवरून मासळी विक्रेत्यांना पाच हजार रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. 
 

 

संबंधित बातम्या