मिलिंद सोमण विरुद्ध कोलवा पोलिसांत गुन्हा नोंद

गोमन्तक वृत्तसेवा
रविवार, 8 नोव्हेंबर 2020

वार्का  किनाऱ्यावर विवस्र अवस्थेत धावत असतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला मॉडेल मिलिंद सोमण याच्या विरुद्ध कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणात पुढील चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्याला कोलवा पोलिस समन्स बजावणार आहेत. 

सासष्टी : वार्का  किनाऱ्यावर विवस्र अवस्थेत धावत असतानाचा फोटो इन्स्टाग्रामवर शेअर केलेला मॉडेल मिलिंद सोमण याच्या विरुद्ध कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंदवला असून, या प्रकरणात पुढील चौकशीसाठी हजर राहण्यासाठी त्याला कोलवा पोलिस समन्स बजावणार आहेत. 

मिलिंद सोमण आपला ५५वा वाढदिवस साजरा करण्यसाठी पत्नी अनिता कुंवर हिच्यासह वार्का येथील एका हॉटेलात उतरला होता. हॉटेलमधील वास्तव्यादरम्यान ४ नोव्हेंबर रोजी तो विवस्त्रावस्थेत धावताना अऩिता हिने त्याचा फोटा काढला. हा फोटो मिलिंद सोमण याने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे.  या प्रकरणी गोवा सुरक्षा मंचच्या युवा आघाडीने वास्को पोलिस स्थानकांत तक्रार नोंदवली होती. तथापि, वार्का किनारा कोलवा पोलिस स्थानकाच्या हद्दीत येत असल्याने हे प्रकरण कोलवा पोलिसांत वर्ग करण्यात आले. कोलवा पोलिसांनी या प्रकरणी शुक्रवारी उशीरा रात्री मिलिंद सोमण याच्या विरुद्ध भादंसंच्या कलम २९४ व माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ खाली गुन्हा नोंदवला होता. दरम्यान हा फोटो कुणी सोशल मीडियावर शेअर केला याची पोलीस पडताळणी करत असून यानंतर सोमण याला समन्स पाठविण्यात येणार असल्याचे कोलवा पोलिसांनी सांगितले.

मिलिंद सोमण विरुद्ध यापूर्वीही विवस्त्रावस्थेतील जाहिरात प्रकरणी गुन्हा नोंद झाला होता. मुंबई पोलिसांनी १९९५ मध्ये हा गुन्हा नोंदवला होता. या प्रकरणातून त्याची निर्दोष मुक्तताही झाली होती. मॉडेल मधू सप्रे हिच्या सोबत एका जाहिरातीत विवस्त्र अवस्थेत पोज दिल्या प्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला होता.

संबंधित बातम्या