काणकोण मटका जुगारप्रकरणी कॉन्स्टेबल संशयाच्या फेऱ्यात

प्रतिनिधी
बुधवार, 2 सप्टेंबर 2020

काणकोण येथील चावडी मार्केटमध्ये सुरू असलेल्या मटका जुगारप्रकरणी अटक केलेल्या मटकाबुकींना काणकोण पोलिस स्थानकातीलच एका पोलिस कॉन्स्टेबलचे अभय होते.

पणजी: काणकोण येथील चावडी मार्केटमध्ये सुरू असलेल्या मटका जुगारप्रकरणी अटक केलेल्या मटकाबुकींना काणकोण पोलिस स्थानकातीलच एका पोलिस कॉन्स्टेबलचे अभय होते. त्याचे या संशयितांशी लागेबांधे असल्याचे क्राईम ब्रँच एसआयटीच्या प्राथमिक चौकशीत निष्पन्न झाले आहे. त्यामुळे या जुगारप्रकरणी कॉन्स्टेबल संशयाच्या फेऱ्यात आला असून त्याला  अटक होण्याची दाट शक्यता आहे. 

रायबंदर येथील गुन्हा अन्वेषण विभागाच्या क्राईम ब्रँचने काल दुपारच्या सुमारास अनंत नारायण गावकर व किशोर अर्जुन गावकर या दोघांना सुमारे ७० हजार रुपयांच्या रोख रक्कमेसह रंगेहात पकडले होते. काणकोण परिसरात भर मार्केटमध्ये हा मटका जुगार सुरू असूनही काणकोण पोलिसांना त्याचा थांगपत्ता नसल्याने यामध्ये कोठेतरी पाणी मुरते आहे याची कल्पना क्राईम ब्रँचला आल्याने अटक केलेल्या दोघा संशयितांची कसून चौकशी करण्यात आली. या चौकशीत काणकोण पोलिस स्थानकातील एका कॉन्स्टेबलचे या दोघांनी वर्णन सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी या वर्णनाशी मिळत्याजुळत्या कॉन्स्टेबलची बाहेरून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे तो या प्रकरणाच्या जाळ्यात अडकण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्यातील मटका जुगारप्रकरणी उच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार एक एसआयटी पोलिस अधीक्षकाच्या नेतृत्वाखाली नेमण्यात आलेली असून या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, काणकोण येथील मार्केट परिसरात राजरोसपणे मटका जुगार सुरू असल्याची माहिती विभाग पोलिस निरीक्षक सोमनाथ महाजिक याना मिळाली होती. त्यांच्या नेतृत्वाखाली पथकाने त्या ठिकाणी छापा टाकला व मटका जुगार घेणाऱ्या तरुणाना ताब्यात घेतले. क्राईम ब्रँचने हा छापा टाकून कारवाई केल्याने तेथील स्थानिक पोलिसांच्या कार्यपद्धतीबाबत प्रश्‍नचिन्ह उभे राहिले आहे.

संबंधित बातम्या