सांताक्रुझ टोळीयुद्धातील २० संशयितांच्या पोलिस कोठडीत वाढ 

dainik gomantak
मंगळवार, 30 जून 2020

अर्जदार जेनेटो कार्दोझ याने अटकपूर्व जामीन अर्जात सांताक्रुझ टोळयुद्धाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. पोलिस हे जाणुनबुजून या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ला झाला त्यावेळी त्या टोळीमध्ये माझा समावेश नव्हता व या घटनेची माहितीही मला नव्हती.

पणजी

सांताक्रुझ टोळीयुद्ध प्रकरणातील गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेला व मुख्य सूत्रधार असल्याचा पोलिसांचा संशय असलेल्या जेनेटो कार्दोझ याच्या अटकपूर्व जामिनावरील सुनावणी उद्या (३० जून) पणजी सत्र न्यायालयासमोर होणार आहे. या प्रकरणात अटक केलेल्या २० संशयितांना आज न्यायालयाने ३ दिवसांची पोलिस कोठडी वाढविली आहे. 
पूर्ववैमनस्यातून तसेच एका तरुणीवरून इम्रान बेपारी याच्या घरावर झालेल्या हल्लाप्रकरणी पोलिसांनी २० जणांना अटक केली आहे तर २ बालगुन्हेगारांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये मार्सेलिनो डायस, रोनी डिसोझा, सॅम्यूएल डिसोझा, डेव्हिड आरावजो, मिंगेल आरावजो, फ्रांसिस नडाल, डेव्हिड डिसोझा, यासीन, साहिल, जयेश, डॉमनिक नाझारेथ, विशाल गोलतकर, जावेद, आदिल, सुरज शेट्ये सनी डिसोझा, सलिम शेख, अँथनी नडार, मयूर आर्लेकर, सनथ शिरोडकर यांचा समावेश आहे. या हल्ल्यामागे गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्या अट्टल गुन्हेगाराचा हात असल्याची माहिती अटक केलेल्या या संशयितांकडून मिळाल्यानंतर पोलिसांनी या गुन्हेगाराचा शोध घेण्यास सुरुवात केली होती. 
अर्जदार जेनेटो कार्दोझ याने अटकपूर्व जामीन अर्जात सांताक्रुझ टोळयुद्धाशी त्याचा काहीही संबंध नसल्याचा दावा केला आहे. पोलिस हे जाणुनबुजून या प्रकरणात गुंतवण्याचा प्रयत्न करत आहेत. हल्ला झाला त्यावेळी त्या टोळीमध्ये माझा समावेश नव्हता व या घटनेची माहितीही मला नव्हती. पोलिसांनी चौकशीसाठी बोलावल्यावर त्याना तपासकामात सहकार्य केले आहे व यापुढेही पोलिसांना सहकार्य करण्यास तयार आहे. पोलिस किंवा न्यायालयात या प्रकरणातील तपासासाठी जेव्हा बोलावतील तेव्हा उपस्थित राहण्यास तयार आहे त्यामुळे अटकपूर्व जामीन मंजूर करण्यात यावा अशी विनंती अर्जदाराने न्यायालयाला केली आहे.  

 
 

संबंधित बातम्या