टाळेबंदीत किनारपट्टीत रेव्ह पार्ट्यांना ऊत; पोलिस यंत्रणेचे दुर्लक्ष

गोमन्तक वृत्तसेवा
सोमवार, 17 ऑगस्ट 2020

पोलिस स्थानकाची गुप्तचर यंत्रणा असूनही या पार्ट्यांबाबत त्यांना माहिती मिळत नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सीआयडी क्राईम ब्रँचने हणजूण येथील एका बंगल्यात छापा टाकून सुरू असलेली बेकायदेशीर पार्टी उधळून लावली. क्राईम ब्रँचने हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही कारवाई केल्याने या पोलिसांचे अपयश उघड झाले आहे. 

पणजी: राज्यात टाळेबंदीच्या काळात मार्गदर्शक सूचनांनुसार हॉटेलातील पार्ट्यांना बंदी असल्याने किनारपट्टी भागात पोलिसांच्या नाकावर टिच्चून मोठ्या प्रमाणात बंगल्यामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित होत आहेत. हल्लीच काही दिवसांपूर्वी एका बंगल्यात पार्टीवेळी झालेल्या मारहाणीमुळे हा प्रकार उघडकीस आला होता. या पार्ट्या रोखण्यात व कारवाई करण्यात पोलिस यंत्रणा कुचकामी ठरली आहे. विरोधकांकडून या पार्ट्यांबाबत आरोप होऊनही सरकारचे दुर्लक्ष होत आहे. 

कोविड - १९ च्या पार्श्‍वभूमीवर गोव्यातील किनारपट्टी परिसरातील हॉटेल्समध्ये पार्ट्यांवर निर्बंध घालण्यात आले आहे. त्यामुळे पर्यटन व्यवसाव बंद असला तरी किनारपट्टी भागात अलिशान बंगल्यामध्ये रेव्ह पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. हे बंगले पार्ट्यांसाठी भाडेपट्टीवर घेऊन काही मोजक्याच व्यक्तींना आमंत्रण देण्याचे प्रकार घडत आहेत. या पार्ट्यांसाठी आवश्‍यक परवानगीही घेतली जात नाही. पोलिस स्थानकाची गुप्तचर यंत्रणा असूनही या पार्ट्यांबाबत त्यांना माहिती मिळत नसल्याबाबत आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे. सीआयडी क्राईम ब्रँचने हणजूण येथील एका बंगल्यात छापा टाकून सुरू असलेली बेकायदेशीर पार्टी उधळून लावली. क्राईम ब्रँचने हणजूण पोलिस स्थानकाच्या हद्दीत ही कारवाई केल्याने या पोलिसांचे अपयश उघड झाले आहे. 

किनारपट्टी भागात मोठ्या प्रमाणात अनेक व्हिला (अलिशान बंगले) आहेत. हे बंगले उच्चभ्रू पर्यटकांकडून पार्ट्यांसाठी भाडेपट्टीवर दिले जातात. या पार्ट्यांमध्ये अंमलीपदार्थाचाही वापर होतो. त्यामुळे अशा पार्ट्यांना स्थानिक पोलिसांचा छुपा पाठिंबा असल्याशिवाय त्या होऊ शकत नाही असे आरोप शिवोलीचे आमदार विनोद पालयेकर यांनी अनेकदा केले आहेत. यापूर्वी सत्ताधारी पक्षातील आमदार व मंत्री मायकल लोबो यांनीही किनारपट्टी भागातील रेव्ह पार्ट्यांमध्ये ड्रग्जचा वापर होत असल्याचे अनेकदा उघड केले आहे. राज्यात पर्यटन व्यवसाय बंद असला तरी या रेव्हा पार्ट्यांना ऊत आला आहे. काही विदेशी नागरिक उच्चभ्रू पर्यटकांशी संपर्क साधून या पार्ट्या आयोजित केल्या जात आहेत. 

राज्य सरकार रेव्हा पार्ट्यांवर कारवाई करत असल्याचे सांगत असले तरी या पार्ट्यांना पोलिसांचा छुपा पाठिंबा मिळत असतो. काही वेळा या पार्ट्यांसाठी राजकीय हस्तक्षेपही असतो त्यामुळे पोलिसही त्याविरुद्ध कारवाई करण्यात कमी पडतात. या रेव्ह पार्ट्या बंद बंगल्यांमध्ये होत असल्याने त्याचा गाजावाजाही होत नाही. पोलिसच या पार्टी आयोजकांशी संगनमत करून पाठिंबा देतात व त्याची माहिती अनेकदा वरिष्ठांनाही माहिती असते. बंगल्याच्या शेजारी परिसरातून तक्रार आल्यासच पोलिस सक्रिय होतात नाही तर चिडीचूप या पार्ट्या आठवड्याच्या शनिवारी व रविवारी किनारपट्टी भागात आयोजित केल्या जातात. 

‘कोविड-१९’ मुळे राज्यातील देशी व विदेशी पर्यटकांची उपस्थिती नसली तरी राज्यात ड्रग्ज व्यवहार किनारपट्टी परिसरात सुरूच आहे.

या व्यवसायात नायजेरियन, नेपाळी हे विदेशी नागरिक तसेच काही स्थानिकही गुंतलेले आहेत. ग्राहक मिळत नसले तरी अशा पार्ट्यांना ते ड्रग्ज पुरविण्याचे काम करतात. पर्यटक कमी झाले असले तरी ड्रग्ज व्यवसाय बंद झालेला नाही. अशा रेव्ह पार्ट्यांवर कारवाईसाठी  सरकारने पोलिसांना धारेवर धरण्याची वेळ आली आहे.

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या