पोलिस चौकी, फायरींग प्रशिक्षण तळ ऐतिहासिक

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्‍त झाल्यास ६० वर्षे होत आली, तरी आजही राज्यातील काही भागात आजही पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा दर्शवणारी बांधकामे वा स्थळे आहेत. डिचोली तालुक्‍यात येणाऱ्या महाराष्ट्र सिमेलगत असलेला वन-म्हावळिंगे गाव तर पोर्तुगीज राजवटीचा साक्षीदार आहे. 

डिचोली :पोर्तुगीजांच्या तावडीतून गोवा मुक्‍त झाल्यास ६० वर्षे होत आली, तरी आजही राज्यातील काही भागात आजही पोर्तुगीज राजवटीच्या खाणाखुणा दर्शवणारी बांधकामे वा स्थळे आहेत. डिचोली तालुक्‍यात येणाऱ्या महाराष्ट्र सिमेलगत असलेला वन-म्हावळिंगे गाव तर पोर्तुगीज राजवटीचा साक्षीदार आहे. 

म्हावळिंगेतील काही चोरवाटांद्वारे स्वातंत्र्यसैनिक महाराष्ट्रात जात असत. त्यामुळेच पोर्तुगीजांनी म्हावळिंगे भागाकडे ज्यास्त लक्ष केंद्रीत केले होते. मुख्य केंद्रस्थान असलेल्या म्हावळिंगे भागात पोर्तुगीजांनी ‘पॉस्त’ अर्थातच पोलिस चौकी आणि फायरींग तळ उभारला होता. गोवा मुक्‍त झाल्यास ६० वर्षे होत आली, तरी आजही फायरींग तळ शाबूत आहे. तर पोर्तुगीजांनी उभारलेली पोलिस चौकी शेवटची घटका मोजत आहे. 

फायरींग तळ सुरक्षित..!
म्हावळिंगे पठारावर आज ज्याठिकाणी पोलिसांना फायरींगचे प्रशिक्षण देण्यात येते, त्या पठारालाही पोर्तुगीजकालीन इतिहास आहे. या तळाची रचनाही पोर्तुगीजांनीच केली होती. या तळाला भेट दिल्यास तेथील खंदकाची बांधणी आणि अन्य खाणाखुणावरुन त्याची प्रचीती येईल. याच पठारावर पोर्तुगीजा ‘सोलदारांना’ (पोलिस) राहण्यासाठी वसाहतही बांधली होती. पठारावर खंदक उभारून पोर्तुगीज लष्कर सेवेतील जवानांना फायरींगचे प्रशिक्षण देण्यात येत असे. फायरींग तळ परिसराला पोर्तुगीज राजवटीच्या काळात ‘मॅट’ म्हणून ओळखण्यात येत असे. तेव्हापासून हा पठार ‘मॅट’ याच नावाने ओळखण्यात येत आहे, अशी माहिती काही जाणकारांकडून मिळाली आहे. सध्या पोलिस वसाहतीच्या मागच्या भागाची काही प्रमाणात झालेली पडझड सोडल्यास ही वसाहत मात्र अजूनही शाबूत आहे. खंदकही आपले अस्तित्व टिकवून आहे. पोर्तुगीजकालीन वसाहतीतील एक खोली सध्या डिचोली पोलिस वापरत आहेत. तर बाकीच्या खोल्या बंदावस्थेत आहेत.

१९६१ साली गोवा पोर्तुगीजांच्या तावडीतून मुक्‍त झाला आणि साहजिकच पोर्तुगीजांनी उभारलेल्या या फायरींग प्रशिक्षण तळाचा ताबा गोवा सरकारकडे आला. तेव्हापासून राज्य प्रशासन सेवेतील पोलिसांना या तळावर फायरींगचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. अधूनमधून नौदलाचे जवानही या तळावर फायरींगचे प्रशिक्षण घेण्यासाठी येत आहेत. विशेष करून पहाटेच्यावेळी या तळावर फायरींग प्रशिक्षण सुरू असते. पोर्तुगीजकालीन या तळाचा आजही फायरींग प्रशिक्षणासाठी वापर करण्यात येत असला, तरी सुधारणा करण्याकडे मात्र, राज्य सरकारचे दुर्लक्ष झाले आहे. या पठारावरील मोकळ्या जागेत आता अपघातग्रस्त वाहनेही ठेवण्यात येत आहेत. जवळपास लोकवस्तीही तयार झाली आहेत.

पॉस्त’च्या केवळ खाणाखुणा..!
पोर्तुगीज राजवट काळात वन-म्हावळिंगे पंचायत क्षेत्रातील पठार निर्मनुष्य होता. गोव्यावर सुमारे साडेचारशे वर्षे पोर्तुगीजांची राजवट होती. याच पोर्तुगीजांनी डिचोली शहराला जोडून असलेल्या वन-म्हावळिंगे पंचायत क्षेत्रातील चामारकोंड परिसरात पोलिस चौकी उभारली होती. दोडामार्गला जाताना चामरकोंड पूल ओलांडताच उजव्या बाजूने मोडकळीस आलेले बांधकाम नजरेला पडत आहे. नामशेष होण्याच्या वाटेवर असलेले हे बांधकाम म्हणजेच पोर्तुगीजांनी उभारलेले ‘पॉस्त’ अर्थातच पोलिस चौकी. पोर्तुगीजांनी याच पोलिस चौकी परिसरात स्वातंत्र्यसैनिकांना कैद करून ठेवण्याची व्यवस्थाही करण्यात आली होती, अशी माहिती वन गावातील स्वातंत्र्यसैनिक लक्ष्मण येंडे यांनी दिली.

गोवा मुक्‍त झाल्यानंतर या पोलिस चौकीचा ताबा गोवा सरकारकडे आला. कालांतराने शिक्षण खात्याने या चौकीत इयत्ता पाचवी ते सातवीपर्यंत उच्च प्राथमिक शाळाही सुरू केली होती. मात्र, या चौकीच्या इमारतीची देखभाल करण्याकडे दुर्लक्ष झाल्याने कालांतराने या चौकीत सुरू करण्यात आलेली शाळा बंद करण्यात आली. तेव्हापासून म्हणजेच मागील जवळपास चाळीस वर्षांपासून या इमारतीकडे कोणीच लक्ष दिले नसल्याने ही इमारत पूर्णपणे मोडकळीस आली आहे. या इमारतीला वेली-झुडपांनी वेढलेले आहे. कोसळण्याच्या वाटेवर असलेली ही इमारत म्हणजे पोर्तुगीजांनी उभारलेली पोलिस चौकी होती.
 

संबंधित बातम्या