‘जनता कर्फ्यू’मुळे राज्यात पोलिस गस्त 

विलास महाडिक
गुरुवार, 16 जुलै 2020

दुकाने बंद झाल्यानंतर लोकांची रस्त्यावरील वर्दळ कमी होईल या उद्देशाने ही वेळ ठरविण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत लोक रस्त्यावरून वाहने घेऊन फिरत असल्याने तसेच काही रात्रीच्या पार्ट्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे.

पणजी

राज्यात जनता कर्फ्यूची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केल्यानंतर आज (१५ जुलै) रात्री आठ वाजल्यापासून पोलिसांनी गस्त सुरू केली आहे. या गस्तीवेळी पोलिसांनी दुकानदारांना आठ वाजल्याने दुकाने बंद करण्यास विनंती केली. आज जनता कर्फ्यूचा पहिल्याच दिवस असल्याने सौम्य भूमिका घेण्यात आली आहे. उद्यापासून (१६ जुलै) ठिकठिकाणी नाकाबंदी तसेच वाहनांची तपासणी केली जाईल अशी माहिती वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांनी दिली. 
हा जनता कर्फ्यू आजपासून लागू झाला असला तरी त्याची काटेकोर अंमलबजावणी उद्या रात्री ८ वाजल्यापासून करण्यात येणार आहे. यावेळी काही मोक्याच्या ठिकाणी नाकाबंदी करून पोलिस तैनात केले जातील. अत्यावश्‍यक सेवेव्यतिरिक्त इतरांना कोणालाही या काळात रस्त्यावर येता येणार नाही. रात्रीच्यावेळी एखादा वाहन चालक विनाकाम रस्त्यावर फिरताना आढळून आल्यास त्याच्याविरुद्ध कारवाई केली जाणार आहे. त्यामुळे लोकांनी कामाशिवाय रात्री ८ वाजल्यानंतर वाहने घेऊन बाहेर पडू नये. जनता कर्फ्यूचे उल्लंघन केल्यास गोवा आपत्ती कायद्याखाली कारवाई केली जाणार आहे असे पोलिस अधिकाऱ्याने सांगितले. 
या जनता कर्फ्यूच्या काळात राज्यातील सर्व दुकाने येत्या १० ऑगस्टपर्यंत रात्री ८ वाजल्यानंतर बंद करावी लागणार आहे. सरकारने टाळेबंदीमध्ये दुकानधारकांबरोबर मद्यविक्रीलाही रात्री ९ वाजेपर्यंत परवानगी दिली होती. दुकाने बंद झाल्यानंतर लोकांची रस्त्यावरील वर्दळ कमी होईल या उद्देशाने ही वेळ ठरविण्यात आली आहे. रात्री उशिरापर्यंत लोक रस्त्यावरून वाहने घेऊन फिरत असल्याने तसेच काही रात्रीच्या पार्ट्यावर नियंत्रण आणण्यासाठी सरकारने हा निर्णय घेतला आहे. पोलिसांनी उद्यापासून रस्त्यावर रात्री आठ वाजल्यानंतर वाहन चालक अथवा व्यक्ती रस्त्यावरून जाताना आढळून आल्यास त्याची चौकशी करण्यास सुरुवात करणार आहे. औषधालयात जाणाऱ्यांना परवानगी दिली जाईल, मात्र त्यासाठी परतताना त्याला औषधाचे बिल किंवा डॉक्टरने दिलेले प्रिस्क्रिप्शन पोलिसांना दाखवावे लागेल. अत्यावश्‍यक सेवा परवाना असलेल्या वाहन चालाकांना रात्री ८ वाजल्यानंतर परवानगी असेल, मात्र त्यासाठी परवाना सादर करावा लागणार आहे. 
 

 
 

संबंधित बातम्या