पोलिस ‘प्लाझ्मा’दानासाठी सरसावले

प्रतिनिधी
मंगळवार, 8 सप्टेंबर 2020

पोलिस महासंचालकांच्या आवाहनानंतर झाल्या वेगाने हालचाली  

पणजी: राज्यात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढण्याबरोबरच अनेकजण कोरोनामुक्त होत आहेत. या कोरोनामुक्त रुग्णांमध्ये कोरोना योद्धे म्हणणाऱ्या पोलिसांचाही समावेश आहे. गंभीर स्थितीत असलेल्या कोरोना रुग्णांची प्रतिकारशक्ती वाढवण्यासाठी प्लाझाची गरज आहे. मात्र, त्यात पोलिसही मागे असल्याचे ‘गोमन्तक’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यावर पोलिस महासंचालक मुकेश कुमार मीणा यांनी पोलिसांना आवाहन केले. आजपासून कोरोनामुक्त पोलिसांनी प्लाझ्मादान करण्यासाठी गोमेकॉ इस्पितळात हजेरी लावण्यास सुरवात केली आहे. 

राज्यात कोरोनाबाधित रुग्णांपैकी सुमारे एक हजारापेक्षा अधिक सरकारी कर्मचाऱ्यांना लागण झाली होती व त्यातील बहुतेकजण हे कोरोनामुक्त झाले आहेत. सरकारने कोरोनामुक्त रुग्णांना प्लाझ्मादान करण्यासाठी वारंवार आवाहन करूनही कोणीही पुढे येत नव्हते. प्लाझ्मादानची अत्यंत आवश्‍यकता असूनही दिवसाला हाताच्या बोटावर मोजण्याइतकेच रुग्ण पुढे येत असल्याने सरकारची कुचंबणा झाली होती. 

..आणि पोलिसांनी दाखवला उत्‍साह!
पोलिस खात्यातच सुमारे ३५०हून अधिकजण कोरोनाबाधित झाले आहेत. त्यापैकी १० टक्के जणांनीही प्लाझ्मादान करण्यासाठी पुढाकार घेतला नव्हता. मुख्यमंत्र्यांनीही सरकारी कर्मचाऱ्यांना हल्लीच आवाहन केले तसेच आरोग्यमंत्र्यांनीही प्लाझ्मादान करण्याऱ्यांना आरोग्यकवच देण्याचे आमिष दाखविले. तरीही प्लाझ्मादान करण्यासाठी पुढे येण्यास अनेकजण गैरसमजुतीमुळे पुढे येत नव्हते. पोलिस खात्यातही हीच स्थिती असल्याने वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ड्युटीवर रूजू झालेल्या कोरोनामुक्त झालेल्या पोलिस तसेच गृहरक्षकांना प्लाझ्मादान करण्याचे आवाहन केले अन् अनेक पोलिसांनी उत्साह दाखवला. त्यामुळे प्लाझ्माची गरज तूर्त तरी काही प्रमाणात आटोक्यात येण्याची शक्यता आहे.

संबंधित बातम्या