Goa Crime: खंडणीसाठी किनारपट्टीवर पोलिसांची दहशत!

खंडणीसाठी पोलिसांनी किनाऱ्यांवर शॅक व रेस्टॉरंटना दहशत बसवायला सुरुवात केली आहे- आग्नेल फर्नांडिस
Goa Crime
Goa CrimeDainik Gomantak

एका बाजूला ‘खंडणीराज’विरोधात कोणी अधिकृत तक्रार घेऊन पुढे येत नसल्याचा दावा सरकारने केला असतानाच आज आणखी एका आरोपामुळे या प्रकरणाविषयी संशय गडद झाला आहे. खंडणीसाठी पोलिसांनी किनाऱ्यांवर शॅक व रेस्टॉरंटना दहशत बसवायला सुरुवात केली आहे, असा आरोप कळंगुटचे माजी आमदार तथा हॉटेल व्यावसायिक आग्नेल फर्नांडिस यांनी केला आहे.

‘गोमन्तक’शी संवाद साधताना ते म्हणाले, मला भीती दाखवून पोलिसांनी हप्ते वसूल करण्याचा प्रयत्न केला; परंतु मी जुमानले नाही. तेव्हा ते निघून गेले खरे; परंतु या किनारपट्टीवरील शॅक व उपाहारगृहांकडून त्यांनी हप्ते वसूल करायला सुरुवात केली आहे.

‘‘न्यायालयाने रात्री दहानंतर संगीत बंद करायला सांगितल्याच्या बहाण्याने त्यांनी खंडण्या गोळा करण्याचा उपदव्याप सुरू केला आहे. उच्च न्यायालयाने ध्वनिक्षेपक बंद करण्याचा आदेश दिला आहे, जेवण नाही, ’’ असे फर्नांडिस म्हणाले. असे सांगून मी त्यांना आदेश दाखविण्यास सांगितले. ‘‘उपाहारगृहांना रात्री दहानंतर हॉटेल्स बंद करण्याच्या धमक्या द्यायच्या व हप्ते गोळा केल्यानंतर ‘सेटल’ करायचे, असा त्यांचा खेळ या भागात सुरू आहे,’’ असे फर्नांडिस म्हणाले.

...अन्यथा मायकल लोबो यांना अटक करा!

मायकल लोबो यांना कळंगुट भागात ‘प्रोटेक्शन मनी’ घेतले जात असल्याची माहिती होती. आमदार म्हणून त्यांनी हा प्रकार बंद केला नाही.

सत्ताधारी पक्षाचेच आमदार या प्रकरणाविषयी बोलतात. त्यामुळे लोबो यांनी जी नावे सांगितली आहेत, त्यांना अटक करावी. मायकल यांनी खरे काय ते सांगितले आहे.

जर ते नावे सांगत नसतील तर मायकल यांना अटक करा, अशी मागणी माजी आमदार आग्नेल फर्नांडिस यांनी एका वृत्तवाहिनीशी बोलताना केली.

कारवाईत पक्षपात

मायकल लोबो यांच्याकडे जेव्हा इतर व्यावसायिक तक्रारी घेऊन आले, तेव्हाच त्यांनी या प्रकरणाचा सोक्षमोक्ष लावला असता तर खंडणीखोरांना जरब बसली असती, असेही आग्नेल फर्नांडिस म्हणाले. स्थानिकांची उपाहारगृहे बंद करून कळंगुट भागात बेकायदा सुरू असलेले बिगर गोमंतकीयांचे गाडे पोलिसांना सुरू ठेवायचे आहेत, असा आरोप त्यांनी केला.

Goa Crime
Lairai Devi: शिरगावच्या लईराई देवीची 24 एप्रिल रोजी जत्रा

हवेत गोळ्या नकोत!

खंडणी प्रकरणात गुंतलेल्यांची नावे आमदार मायकल लोबो यांनी जाहीर करावीत. त्यांनी हवेत गोळ्या झाडणे बंद करावे, असा टोला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव यांनी लगावला.

काँग्रेस भवनातील पत्रकार परिषदेत युरी म्हणाले, खंडणी वसूल केली जात असल्याचा प्रकार उघड झाल्यानंतर प्रथम आम्हीच त्यावर आवाज उठविला होता.

सत्ताधारी पक्षातील आमदारच जर खंडणीविषयी खुलेआम बोलत असतील तर सरकारची काय पत राहिली, असेही युरी आलेमाव म्हणाले.

Goa Crime
Goa Corona Update: गोव्यात आजच्या दिवसांत वाढले 'इतके' कोरोना रूग्ण; जाणून घ्या सक्रिय रूग्णसंख्या..

केवळ वल्गना नको

ना खाऊंगा... ना खाने दुंगा’ ही भाजप सरकारची फक्त निवडणुकीच्या काळातील घोषणा होती. आता त्या उलट गोव्यातील भाजप सरकारचा कारभार चालला आहे. सध्या उत्तर गोव्यातील ‘प्रोटेक्शन मनी’च्या नावाने खंडणीचे प्रकरण गाजत असून सत्ताधारी आमदारही आरोप करत आहेत, अशी माहिती काँग्रेसचे सरचिटणीस विजय भिके यांनी दिली.

मुळात आरोप करणारे भाजपचेच नेते असून खंडणी प्रकरणाच्या मुळाशी जाण्यासाठी क्राईम ब्रँचने आमदार मायकल लोबो यांची चौकशी करावी. लोबोंकडून संबंधित खंडणीबहाद्दरांची नावे घ्यावीत, अशी मागणी विजय भिके यांनी शनिवारी म्हापशात पत्रकार परिषदेत केली.

आमदार हॉटेल व्यावसायिकांना भेडसावणारे कथित खंडणी प्रकरण उघड करीत आहेत. दुसरीकडे राज्य सरकारकडून नोकऱ्या विकल्या जातात, असे पक्षाचाच मंत्री बोलतो, तेव्हा हे ‘स्वच्छ सरकार’ कसे म्हणायचे?

- युरी आलेमाव, विरोधी पक्षनेते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com