Goa Politics: मुख्यमंत्र्यांच्या मडगाववाऱ्या चांगल्याच चर्चेत!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या दिवसात मडगाववाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे सासष्टी मिशनच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीचा हा एखादा छुपा अजेंडा तर नाही ना, अशी चर्चा सासष्टीतील राजकीय वर्तुळात सुरू असलेली ऐकायला मिळते.
cm Pramod Sawant
cm Pramod SawantDainik Gomantak

मुख्यमंत्र्यांच्या मडगाववाऱ्या

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या या दिवसात मडगाववाऱ्या वाढल्या आहेत. त्यामुळे सासष्टी मिशनच्या धर्तीवर लोकसभा निवडणुकीचा हा एखादा छुपा अजेंडा तर नाही ना, अशी चर्चा सासष्टीतील राजकीय वर्तुळात सुरू असलेली ऐकायला मिळते. विशेषतः आठ काँग्रेस आमदारांच्या भाजप प्रवेशानंतरची ही घडामोड असल्याने तिला अधिक महत्त्व दिले जात आहे. या दिवसांत दिंडी महोत्सवानिमित्त व त्यानंतर सोमवारी मुख्यमंत्री तीर्थयात्रा शुभारंभानिमित्त मडगावात होते. गेल्या आठवड्यातही ते दिवसाआड मडगावात होते. खरे तर मनोहरभाई मडगावातील कोणताही कार्यक्रम टाळत नसत. तोच कित्ता तर दोतोर गिरवत नसावेत ना? नाही तरी आठ मतदारसंघ असलेल्या सासष्टीत सध्या पाच ठिकाणी भाजप वा त्यांचे मित्रच आहेत ना! ∙∙∙

(political gossip in goa about cm pramod sawant )

cm Pramod Sawant
Margao Municipality: मडगाव नगरपालिकेत कारकून भरतीबाबत संशयाचे वातावरण

कचरा आगीमागील कुतूहल

मडगाव व कचरा समस्या हे एक समीकरणच होऊन बसले आहे. प्रत्येक दिवशी तेथे कसली ना कसली तरी समस्या निर्माण होतच असते. सरकार कोणतेही असो, पालिका कोणत्याही गटाची असो, त्यात काहीही बदल होत नाही. या दिवसांत तेथील कदंब बस स्थानकाजवळील कचरा राशींना लागलेली आग, हा चर्चेचा मुद्दा ठरला आहे. आमदार- नगराध्यक्ष वगैरेंनी पाहणी करून चिंता व्यक्त केली व कोणीतरी मुद्दाम आग लावत असल्याचा संशयही व्यक्त केला. पण तेथे इतक्या मोठ्या प्रमाणात कचरा का साठविला जातो, असा जाब मात्र कोणीच विचारला नाही. यापूर्वी सोनसोडोवर कचरा साठला की, तेथेही आग लागे. मग प्रकल्पातील लोकच प्रक्रियेची झंझट नको म्हणून गुपचूप काडी टाकत, असेही बोलले जाई. हाही त्यातलाच तर प्रकार नाही ना? ∙∙∙

फोंड्याचा गड कोण लढवणार?

गोवा फॉरवर्डचे फोंड्यातील काम पार थंडावले आहे. मागच्या विधानसभा निवडणुकीत गोवा फॉरवर्डचे उमेदवार म्हणून माजी नगराध्यक्ष व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांना संधी देण्याचे ठरवले होते. मात्र, गोवा फॉरवर्ड आणि काँग्रेसचा समझोता झाल्याने शेवटी फोंड्यात काँग्रेसचे राजेश वेरेकर यांना गोवा फॉरवर्डला पाठिंबा द्यावा लागला. मात्र, या निवडणुकीत गोवा फॉरवर्डने काय केले, ते सर्वांनाच ठाऊक आहे. त्यामुळे सध्या फोंड्यात गोवा फॉरवर्डला नेताही सापडलेला नाही. फोंड्यात तसे अनेक विषय आहेत आणि ते लावून धरण्याची गरजही आहे. सध्या तरी फोंड्यात गोवा फॉरवर्डचे अस्तित्व नसल्याने पक्षाचे उपाध्यक्ष दुर्गादास कामत हेच गड लढवतात, हेही नसे थोडके. कारण फोंडा पालिकेने घरपट्टी व व्यावसायिक करात वाढ केल्याने दुर्गादास कामत यांनी पालिकेला ही करवाढ मागे घेण्यासाठी निवेदन दिले आहे, त्यावरून हे सिद्ध होते, नाही का!∙∙∙

...मग मैदानात कधी उतरणार?

काँग्रेसचे पदाधिकारी म्हापशात आठवड्यातून दोन-तीन वेळा पत्रकार परिषदा घेऊन सरकारवर हल्लाबोल करत आहेत. म्हापशातील उत्तर गोवा कार्यालयात अलीकडेच एसी बसविण्यात आला आहे. तेव्हापासून कार्यालयातील वातावरण जरा जास्तच ‘कूल’ झालेले दिसते. अशावेळी पदाधिकारीही थंडगार कार्यालयात बसून सरकार व त्यांच्या धोरणांवर आवाज उठविताना दिसतात. मात्र, प्रत्यक्षात ग्राउंडवर उतरून कोणीही काम करताना दिसत नाही. लोकांचे तसेच शहरातील अनेक प्रश्न असताना हे पदाधिकारी फक्त कार्यालयात बसूनच सरकारवर तोंडसुख घेताहेत. मुळात पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मैदानात उतरून लोकांचे प्रश्न हाती घेण्याची गरज आहे. अन्यथा या पत्रकार परिषदांचा काहीच उपयोग नसतो. त्याकडे केवळ राजकीय टीका-टिप्पणी या नजरेतूनच पाहिले जाते. कदाचित काँग्रेसकडे सध्या कार्यकर्त्यांची कमतरता असल्यानेच कार्यालयात बसून सरकारचा सामना करायचे ठरल्याचे दिसते. हे आम्ही नाही तर लोकच आता बोलू लागलेत! ∙∙∙

दिंडी उत्सवाला राज्यदर्जा

शतक उलटलेल्या मडगाव दिंडी उत्सवाला राज्य उत्सवाचा दर्जा देण्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली असली तरी ती प्रत्यक्षात यायला म्हणजे हा दर्जा मिळायला आणखी वर्ष जावे लागणार आहे. साखळीतील त्रिपुरारी पौर्णिमा उत्सवाला प्रतापसिंह राणे हे मुख्यमंत्री असताना हा दर्जा लाभला. फार दूर कशाला, दिवाडीतील तवशांचे फेस्तसुध्दा हा दर्जा मिळवता झाले. मात्र, व्यापारी व सांस्कृतिक राजधानीतील दिंडी महोत्सव दुर्लक्षित का राहिला, हा खरे तर मडगावकरांना विचार करायला लावणारा मुद्दा ठरला आहे. नाही तरी मागची कित्येक वर्षे मडगावकर या राज्य दर्जाचे तुणतुणे ऐकतच आले आहेत. ∙∙∙

काँग्रेसवाल्यांना जॅक सिक्वेरांचा पुळका का?

‘सम पीपल्स हॅव हॅबिट ऑफ मेकिंग इश्यु आऊट ऑफ टिशू.’ कारण नसताना वाद घालण्याची सवय असलेली जात म्हणजे राजकारणी. नव्यानेच बांधलेल्या मोपा विमानतळाला नाव कुणाचे द्यावे, यावरून सध्या वाद सुरू आहे. कॉंग्रेसी नेते ‘मोपा’ला जॅक सिक्वेरा यांचे नाव देण्याची आग्रही मागणी करतात. खासदार फ्रासिस सार्दिन, आमदार कार्लुस फेरेरा व इतर काँग्रेसजनांचा यात समावेश आहे. गोव्याच्या ओपिनियन पोलसाठी लढा दिलेल्या जॅक सिक्वेरांचे नाव एकाही प्रकल्पाला का नाही? असा प्रश्न सार्दिनबाब व इतर कॉंग्रेसजन करतात. हा प्रश्न फातोर्डा फुटबॉल मैदानाला पंडित जवाहरलाल नेहरू यांचे नाव दिले, तेव्हा का विचारला नाही? गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या इस्पितळाला राजीव गांधी यांचे नाव दिले, तेव्हा का हा प्रश्न विचारला नाही? आताच काँग्रेसजनांना जॅक सिक्वेरा का आठवले?असा प्रश्न आम जनता विचारत आहे. ‘मोपा’ला नाव कोणाचे, यावरून वाद निर्माण करण्यात कोणाचाच फायदा नाही. ‘मोपा’ला गोवा आंतराष्ट्रीय विमानतळ नाव देऊन वादावर कायमचा पडदा टाकण्यात काय गैर आहे? ∙∙∙

cm Pramod Sawant
Goa News: CBI अधीक्षक आशेश कुमार यांना लाचविषयक ‘ते’ वक्तव्य भोवले; थेट उचलबांगडी

बाबू-अर्जुनचे मनोमीलन

माजी उपमुख्यमंत्री बाबू कवळेकर आणि त्यांचे पूर्वीचे स्वीय साहाय्यक अर्जुन वेळीप यांच्यातील संबंध विधानसभा निवडणुकीवेळी बरेच ताणले गेले होते. याचाच परिपाक म्हणून वेळीप यांनी बाबूंच्या विरोधात निवडणूक लढविण्याचे ठरविले होते. त्यासाठी त्यांनी सरकारी नोकरीचा राजीनामाही देण्याची तयारी दर्शविली होती. मात्र, त्यांचा राजीनामा स्वीकारला गेला नाही आणि ते बाबूंच्या विरोधात निवडणूकही लढवू शकले नाहीत. पण आता त्यांच्यातील मतभेदांची दरी कमी झाली आहे, असे सांगण्यात येते. बाबूंचे बंधू बाबल यांचा काही दिवसांपूर्वी वाढदिवस साजरा करण्यात आला होता. त्यासाठी दक्षिण गोव्यातील एका हॉटेलमध्ये पार्टी ठेवली होती. त्या पार्टीला अर्जुन वेळीप उपस्थित होते. बाबू आणि अर्जुन यांनी एकाच मेजावर रुचकर व्यंजनांचा आस्वाद घेतल्याची छायाचित्रे व्हायरल झाली आहेत. आता त्यांच्यात मनोमीलन झाले, असे म्हणायला काही हरकत नसावी. ∙∙∙

मुख्यमंत्र्यांची चित्रपटवारी

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे आधुनिक काळातील दूरदृष्टी असलेले नेते असून ‘ट्रेंड’ असलेल्या गोष्टींमध्ये त्यांचे बारीक लक्ष असते. सध्या देशात कन्नड चित्रपट कांतारा बराच गाजत असल्याने रसिक चित्रपटगृहात गर्दी करत आहेत. मुख्यमंत्र्यांनाही हा चित्रपट बघण्याची सूचना कोणीतरी केली आणि त्यांनी हा चित्रपट सिनेमागृहात जाऊन बघितला. कांतारा चित्रपटातील अनेक गोष्टी त्यांना गोव्यातही असल्याचा अनुभव आला. यात वीरभद्र उत्सव आणि वन जमिनीबाबत गोमंतकीय संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्र्यांना कळून चुकले. आपले सरकार संवेदनशील असल्याचे मुख्यमंत्री म्हणतात, तरी देखील विविध विषयांवर गोमंतकीयांना का आंदोलन करावे लागत आहे, असा प्रश्‍न लोक विचारत आहेत. ∙∙∙

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
www.dainikgomantak.com