राजकीय पक्षांचे लक्ष फोंडा तालुक्‍यावर!

गोमंतक वृत्तसेवा
रविवार, 1 नोव्हेंबर 2020

राज्याची विधानसभा निवडणूक आता दीड वर्षांवर येऊन ठेपली असताना राजकारणाला गती आहे. कोरोना महामारीमुळे सुरुवातीला राज्यात राजकारणाच्या क्षेत्रात सामसूम होती, मात्र आता सर्वच लॉकडाऊन उठल्यामुळे राजकारणाचे वारेही जोरात वाहू लागले आहे.

फोंडा:  राज्याची विधानसभा निवडणूक आता दीड वर्षांवर येऊन ठेपली असताना राजकारणाला गती आहे. कोरोना महामारीमुळे सुरुवातीला राज्यात राजकारणाच्या क्षेत्रात सामसूम होती, मात्र आता सर्वच लॉकडाऊन उठल्यामुळे राजकारणाचे वारेही जोरात वाहू लागले आहे. राज्याची सांस्कृतिक राजधानी मानल्या गेलेल्या अंत्रुज महाल अर्थातच फोंडा तालुक्‍यातही राजकारण जोरात सुरू आहे. फोंडा तालुक्‍यातील राजकारणाचा "ट्रेलर''च सध्या पालिका राजकारणावरून दृष्टीस पडत आहे.

सद्यस्थितीत येत्या निवडणुकीत फोंडा तालुक्‍यातील चारही मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली असली तरी राजकारणाच्याबाबतीत सध्या भारतीय जनता पक्षच सर्वांत पुढे आहे. 
फोंड्यात भाजप, मगो आणि कॉंग्रेस अशा तीन पक्षात साठमारी असली तरी गोवा फॉरवॉर्ड पक्षही नजीकच्या काळात आपले अस्तित्व सिद्ध करण्यासाठी निदान फोंड्यातून तरी नशीब अजमावणार असल्याची चिन्हे आहेत. गोवा फॉरवॉर्डचे फोंड्यातील नेते राजेश वेरेकर यांनी त्यादृष्टीने कामही सुरू केले आहे. मात्र राजेश वेरेकर यांना इतर पक्षांकडूनही ऑफर येण्याची शक्‍यता व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणुकीच्या धामधुमीतच यासंबंधीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

फोंडा तालुक्‍यातील फोंडा, प्रियोळ, मडकई आणि शिरोडा या चार मतदारसंघांवर भाजपने आपले लक्ष केंद्रीत केले आहे. फोंडा पालिका ताब्यात घेतल्यापासून तालुक्‍यातील चारही मतदारसंघात भाजपचाच झेंडा फडकणार असा विश्‍वास भाजपचे कार्यकर्ते व्यक्त करताना दिसतात. दुसऱ्या बाजूला प्रादेशिक पक्ष असलेल्या मगो पक्षाकडून फोंडा तालुक्‍यातील चारही मतदारसंघांवर खास लक्ष देण्यात येत आहे. कॉंग्रेस पक्षाचे फोंडा सोडल्यास इतर मतदारसंघांकडे दुर्लक्षच झाले आहे. वास्तविक फोंडा आणि शिरोडा हे दोन्ही मतदारसंघ कॉंग्रेसचे आहेत, मात्र कॉंग्रेस आमदाराला फोडून भाजपने या मतदारसंघावर आपले वर्चस्व प्रस्थापित केले आहे. 

मडकई मतदारसंघात मगोचे सुदिन ढवळीकर यांना कडवे आव्हान उभे करण्याचे मनसुबे भाजपने रचले आहेत, पण त्यात ते कितपत यशस्वी होतील, कोण जाणे. कारण मडकई मतदारसंघात वैयक्तिक कामांवर सुदिन ढवळीकर यांनी भर दिल्याने सत्तेवर नसले तरी सुदिन ढवळीकर यांचा दरारा या मतदारसंघात आहे.

प्रियोळ मतदारसंघात अपक्ष आमदार गोविंद गावडे यांनी गेल्यावेळी बाजी मारली. भाजपच्या पाठिंब्यावर गोविंद गावडे निवडून आले. त्यांनी या मतदारसंघात बऱ्यापैकी विकासकामे केली आहेत. तरीही मगो या मतदारसंघात पुन्हा एकदा मुसंडी मारण्याच्या तयारीत आहे. येत्या निवडणुकीत गोविंद गावडे पुन्हा एकदा स्वतंत्रपणे निवडणूक लढवणार की सरळ भाजपमध्ये प्रवेश घेऊन मतदारांसमोर जाणार हे अजून ठरलेले नाही. कॉंग्रेसकडून आपल्यापरीने या मतदारसंघात धडपड चालली असली तरी खरी लढत आहे ती भाजप अर्थातच गोविंद गावडे आणि मगोतच.

फोंडा मतदारसंघात कॉंग्रेसचे वर्चस्व असले तरी यावेळेला फोंडा मतदारसंघात भाजपचा प्रतिनिधी निवडून येईल, असे खुद्द मुख्यमंत्र्यांनी महिन्याभरापूर्वी आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात जाहीर केले होते. कॉंग्रेसचे रवी नाईक हे फोंड्याचे आमदार असले तरी त्यांचे दोन्ही पुत्र भाजपमध्ये आहेत. त्यामुळे येत्या निवडणुकीत कशी काय व्यूहरचना असेल हे नंतरच स्पष्ट होईल. 

शिरोडा मतदारसंघात मागच्या पोटनिवडणुकीत भाजप विरुद्ध मगो पक्षात जोरदार टक्कर झाली होती. यावेळेलाही तशी टक्कर अपेक्षित आहे. एकंदर फोंडा तालुक्‍यातील राजकारण हे प्रत्येक पक्षासाठी प्रतिष्ठेचे ठरले आहे. चारही मतदारसंघात वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी विविध पक्षांच्या राजकीय नेत्यांनी कंबर कसली असली तरी मतदारच ठरवतील या लोकांचे भवितव्य. 

दरम्यान, फोंडा तालुक्‍यातील एकमेव असलेल्या फोंडा पालिकेत मागच्या काळात जे सत्तांतर झाले, इकडून तिकडे उड्या मारण्याचे प्रकार झाले, त्यावरून तालुक्‍यातील राजकारण कोणत्या दिशेने चालले आहे, याचा अंदाज मतदारांना आला आहे. शेवटी विकास हा महत्त्वाचा आहे. त्यामुळे असे प्रकार हे पूर्वीही झाले आहेत, आणि आताही होत आहेत.

"झेडपी'' निवडणूक झाली असती तर!
राज्यात जिल्हा पंचायत निवडणूक झाली असती तर कदाचित पुढील विधानसभेचे चित्र काही अंशी स्पष्ट झाले असते. जिल्हा पंचायत निवडणुकीत यावेळेला भाजपविरुद्ध मगो असा सामना फोंडा तालुक्‍यात होता. फोंडा सोडल्यास इतर ठिकाणी कॉंग्रेसचे अस्तित्व तसे फारसे नाही. फक्त प्रियोळ मतदारसंघातील कार्यकर्ते आपल्यापरीने कार्य करताना दिसतात. मात्र वरिष्ठ कॉंग्रेस नेत्यांकडून प्रियोळातही तसेच दुर्लक्षच झाले आहे. त्यामुळे फोंडा तालुक्‍यात खरी लढत ही मगो आणि भाजपातच आहे.

संबंधित बातम्या