येणाऱ्या निवडणूकांचा राजधानीतील नरकासुरांना फायदा

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 14 नोव्हेंबर 2020

राजधानी पणजीत ठिकाठिकाणच्या नरकासुरांना आमदारांनी बळ (आर्थिक) दिल्याने ते चांगलेच धष्टपुष्ट आणि सिक्सपॅक दाखविणारे दिसत होते. कोरोना महामारीचा काहीही परिणाम या नरकासुरांवर दिसून आला नाही. उलट ते थाटामाटात ठिकठिकाणी रात्रभर दिमाखात उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

पणजी :  राजधानी पणजीत ठिकाठिकाणच्या नरकासुरांना आमदारांनी बळ (आर्थिक) दिल्याने ते चांगलेच धष्टपुष्ट आणि सिक्सपॅक दाखविणारे दिसत होते. कोरोना महामारीचा काहीही परिणाम या नरकासुरांवर दिसून आला नाही. उलट ते थाटामाटात ठिकठिकाणी रात्रभर दिमाखात उभे असल्याचे चित्र पाहायला मिळाले.

राजधानीत ज्या-ज्या ठिकाणी नरकासूर होते, त्या-त्या ठिकाणच्या मंडळांना आमदारांनी बळ दिले. तीन महिन्यांवर येऊन ठेपलेल्या महापालिकेच्या निवडणुका पाहता युवकांचा रोष नको म्हणून मदतीचा हात सैल केल्याची चर्चा सध्या आहे. काही नगरसेवकांनीही त्यास दुजोरा दिला आहे. कोरोनामुळे दिवाळीवर त्याचा परिणाम जाणवेल असे वाटत होते, परंतु मंडळांतील युवकांचा उत्साह पाहता कोरोना काय चिज आहे, असेच म्हणत युवा वर्ग गेली पंधरा दिवस नरकासुर प्रतिमा करण्यात गुंग होता. 
सध्या कोणत्या मंडळांना आमदारांनी किती पैसे दिले, हे मंडळांचे सदस्यच एकमेकांना सांगतात. एका बाजूला आमदारांनी जरी मदत केली असली, तरी पुढील महापालिका निवडणुकीत निवडून येण्याची दाट शक्यता असणाऱ्या नगरसेवकांनीही त्या-त्या ठिकाणच्या मंडळांना आर्थिक मदतीचा हात दिला आहे. बळ पोहोचल्यामुळे नरकासुरांच्या प्रतिमा करण्यात आणि त्याला धष्टपुष्ट दाखविण्यात कोणतीही कसर युवकांनी सोडलेली दिसून आली नाही. नरकासुर प्रतिमा बनविण्यापूर्वीच्या दहा-पंधरा दिवसांत युवकांना आवश्‍यक असणाऱ्या सर्व बाबी पुरविण्याची जबाबदारी काही महापालिका निवडणुकीसाठी इच्छुक उमेदवारांनी घेतल्याची चर्चा सध्या मळा परिसरात आहे.

वाहनांची वर्दळ कमी
यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळे अनेक कुटुंबांनी घरातून बाहेर न पडण्याचा निर्णय घेतल्याचे दिसून आले. मागील काही वर्षांसारखी यावर्षी रस्त्यावर वाहनांची गर्दी दिसून आली नाही. वाहतूक विभागाने काही मार्गांवरील एकेरी वाहतूक केल्याने त्याचा फायदा झाल्याचे दिसून आले.  तुरळक प्रमाणात वाहने ये-जा करीत होती, परंतु डिजे आणि ध्वनिक्षेपक लावण्यास परवानगी घेतल्यामुळे सायंकाळनंतर कर्णकर्कश आवाजाचा नुसता मारा सुरू होता.

संबंधित बातम्या