‘स्मार्ट सिटी‘च्या सीईओ पदाभोवती राजकारणाचा वास

गोमन्तक वृत्तसेवा
गुरुवार, 15 ऑक्टोबर 2020


आयपीएससीडीएलच्या सीईओ पदावरून चौधरी यांना हटविण्याची माहिती म्हणे मुख्यमंत्र्यांनी स्वतः आमदार मोन्सेरात यांना दिली होती. परंतु त्यांच्या जागी कोणाची वर्णी लागणार हे मात्र त्यांना समजले नव्हते. त्यामुळे खरोखरच आमदारांना त्या माहितीपासून दूर ठेवण्यात आले होते का, याविषयी त्यांच्या गटातील नगरसेवकांमध्ये चर्चा आहे. आमदारांनी चौधरी यांना जी कामे दिली होती, ती पूर्ण झाली तर पणजीचा विकास होईल आणि तो कोणाला नको होता, त्यासाठी भाजपचा एक गट पडद्याआड राहून कार्यरत आहे हे काही लपून राहिले नाही.
 

पणजी- इमॅजिन पणजी स्मार्ट सिटी विकास लिमिटेडच्या (आयपीएससीडीएल) मुख्य कार्यकारी अधिकारीपदावरून (सीईओ) स्वयंदीप्ता पाल चौधरी यांना हटविल्यानंतर नव्या चर्चेला ऊत आला आहे. त्यातच महत्त्वाची बाब म्हणजे चौधरी यांना हटवणार असल्याची कल्पना आमदार बाबूश मोन्सेरात यांना मिळाली होती. परंतु त्यांच्या जागी कोणता अधिकारी बसविणार याबाबत त्यांना कल्पना दिली नव्हती. त्यामुळे सध्या त्याठिकाणी स्थानिक अधिकारी नेमायला हवा होता, असा आमदारांच्या गटातील नगरसेवकांची कुजबूज सुरू झाली आहे. 

आयपीएससीडीएलच्या कामकाजावर महालेखा परीक्षकांनी बोट ठेवले होते. त्याशिवाय गुरुनाथ नाईक नावाच्या एका आरटीआय कार्यकर्त्याने माहिती अधिकाराखाली चौधरी यांच्या नियुक्तीविषयी माहिती घेतली होती. त्यात त्यांना अनियमितता आढळल्याने नाईक यांनी चौधरी यांच्याविषयी दक्षता आयोगाकडे तथा भ्रष्टाचार विरोधी खात्याकडे तक्रार केली होती. सध्या या तक्रारीमागे नाईक यांचा बोलाविता धनी कोणतरी सत्ताधारी पक्षातीलच असल्याची चर्चा आहे. त्यामुळे चौधरी यांना हटविण्यासाठी सत्ताधारी पक्षाच्या नगरसेवकांची एक फळी पडद्याआडून काम करीत होती, हे स्पष्ट आहे. 

आयपीएससीडीएलचे चेअरमन स्वतः मुख्यमंत्री आहेत. त्यामुळे चौधरी यांची सीईओ मुदत संपूनही ते त्या पदावर टिकून होते आणि हेच अनेकांना पटले नसणार. सध्या भाजपात आलेल्या आमदार बाबूश मोन्सेरात हे पणजीचे आमदार होण्यापूर्वी स्मार्ट सिटीच्या कामांवर बोट ठेवले होते. त्यावेळी चौधरी यांना हटविण्याची मागणी महापौर उदय मडकईकर यांनी लावून धरली होती. तो झाला राजकारणाचा भाग परंतु ज्यापद्धतीने आमदार आणि उदय मडकईकर यांना स्मार्ट सिटीच्या मंडळावर स्थान देण्यात आले, त्यामुळे पणजीतील मूळ भाजपच्या कार्यकर्ते आतून दुखावले असणार हे निश्‍चित आहे. शिवाय चौधरी यांच्याकडे शहर विकासाच्या दृष्टीने जेवढी कामे आमदार मोन्सेरात यांनी दिली होती, त्या कामांना त्यांनी प्राधान्य दिले होते.
 

संबंधित बातम्या