अमली पदार्थांवरून राजकारण सुरू

अवित बगळे
मंगळवार, 18 ऑगस्ट 2020

पिसुर्ले येथील एका बंद कारखान्यात केटामाईनचा मोठा साठा सापडल्यानंतर सत्ताधारी व अमली पदार्थ यांच्या साटेलोट्यांविषयी आरोप होऊ लागले. त्यानंतर कळंगुटमध्ये अमली पदार्थ पकडले गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडे त्याची सुई वळवण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने झाले.

पणजी

आमदार अपात्रतेभोवती फिरणारा राजकारणाला आज नवी दिशा मिळाली. हणजुण येथील पार्टीवर छापा पडल्यानंतर पार्टी आयोजक कपिल झवेरी याची सत्ताधाऱ्यांसोबत असलेल्या छायाचित्रांच्या रुपाने विरोधकांच्या हाती कोलीतच सापडले. सर्वांनी एकसाथ मिळून आज सरकारविरोधात आवाज उठवला.
भाजपचे सरकार अशी गोष्टींना पाठीशी घालते, सरकारमधील उच्चपदस्थांच्या आशिर्वादानेच अमली पदार्थांचा वापर असणाऱ्या या पार्टीचे आयोजन केले गेले असा आरोप आज विरोधकांनी केला. त्यांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या राजीनाम्याचीही मागणी केली. हणजूण शिवोली विधानसभा मतदारसंघात येते. तेथे हा प्रकार घडला. त्या मतदारसंघाचे प्रतिनिधीत्व गोवा फॉरवर्डचे आमदार विनोद पालयेकर करतात. या आधी त्यांनी अमली पदार्थ व्यवहारांची आपणास इत्यंभुत माहिती आहे. ती माहिती देऊनही राज्य सरकार दखल घेत नसल्याने त्यांनी याचा अहवाल पंतप्रधानांना पाठवला होता. त्यांनीच पत्रकार परिषदेत ही माहिती दिली होती. आपण नावागावासह सारी माहिती दिल्याचा दावा त्यांनी केला होता.
पिसुर्ले येथील एका बंद कारखान्यात केटामाईनचा मोठा साठा सापडल्यानंतर सत्ताधारी व अमली पदार्थ यांच्या साटेलोट्यांविषयी आरोप होऊ लागले. त्यानंतर कळंगुटमध्ये अमली पदार्थ पकडले गेल्यानंतर सत्ताधाऱ्यांकडे त्याची सुई वळवण्याचे प्रयत्न विरोधकांकडून सातत्याने झाले. हणजूण येथे पडलेल्या छाप्यानंतर या खदखदीचा स्फोट झाला आहे. सरकारने जिल्हा पंचायतींवर प्रशासक नेमले आहेत. पालिका निवडणुका पुढे ढकलण्याचा निर्णय आज जरी जाहीर झाला तरी त्याची कुणकुण राजकीय वर्तुळात केव्हापासूनची होती. त्यामुळे सरकारविरोधात कोविड वगळता कोणता मुद्दा हाती येतो याच्याच शोधात विरोधक होते आणि तो मुद्दा मिळाला आता विरोधक उठसूठ त्याच मुद्यावरून सत्ताधाऱ्यांना झोडपणार हे ठरून गेलेले आहे. मात्र सत्ताधाऱ्यापैकी कोण बचावात्मक पवित्र्यात जाणार हे पाहणे औत्स्युक्याचे ठरणार आहे.

संबंधित बातम्या