चांदरच्या राज्य महामार्गावरून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न

दैनिक गोमन्तक
गुरुवार, 7 जानेवारी 2021

कदंबकालीन राजधानी असलेल्या चांदर गावातील वारसास्थळे तसेच घरांना फटका बसू नये, यासाठी राज महामार्गाचा दर्जा रद्द करण्याची चांदरवासीयांची मागणी आहे.

मडगाव: चांदर-कुडचडे मार्ग कुंकळ्ळी मतदारसंघातील राजकारणाचा केंद्रबिंदू बनला असून या मार्गाचा राज्य महामार्गाचा दर्जा रद्द करण्याच्या विषयावरून राजकीय लाभ मिळवण्याचा प्रयत्न कॉंग्रेस व भाजप या दोन्ही पक्षांकडून केला जात आहे. 

कदंबकालीन राजधानी असलेल्या चांदर गावातील वारसास्थळे तसेच घरांना फटका बसू नये, यासाठी राज महामार्गाचा दर्जा रद्द करण्याची चांदरवासीयांची मागणी आहे. चांदरवासीयांच्या या मागणीचा राजकीय विषय बनवून राजकीय नेते व पक्ष आपापले फासे टाकत आहेत.  

कॉंग्रेसमध्ये अलीकडे प्रवेश केलेले युवा नेते युरी आलेमाव यांनी नुकताच हा विषय पुन्हा वर काढला. चांदर गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची अधिसूचना रद्द करण्यास मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिला आहे. नवीन अधिसूचनेचा मसुदा तयार होऊन १८ महिने उलटले तरी नवीन अधिसूचना जारी का होत नाही, असा सवाल आलेमाव यांनी केला असून याचे आमदार क्लाफास डायस यांनी उत्तर देण्याची मागणी त्यांनी केली आहे. 

ऐतिहासिक गाव असलेल्या चांदरमधून जाणाऱ्या या मार्गाच्या विषयावरून गेली काही वर्षे वेगवेगळ्या राजकीय नेत्यांमध्ये व पक्षांमध्ये राजकारण खेळले जात आहे. या विषयाची तड लावून श्रेय मिळवायचे व कुंकळ्ळी मतदारसंघात आपली पकड मजबूत करण्याची या नेत्यांची रणनीती 
आहे. 

गोवा फॉरवर्ड सरकारात सहभागी होता तेव्हा युरी आलेमाव गोवा फॉरवर्डमध्ये होते. गोवा फॉरवर्डचे अध्यक्ष विजय सरदेसाई यांच्याशी तेव्हा युरी आलेमाव व त्यांचे वडील तथा माजी नगरविकासमंत्री ज्योकीम आलेमाव यांची जवळीक होती. युरी आलेमाव यांना तेव्हा गोवा फॉरवर्डचे कुंकळ्ळीचे संभाव्य उमेदवार म्हणून प्रोजेक्ट करण्यात आले होते. तेव्हा नगरनियोजन खात्याचा ताबा असलेले उपमुख्यमंत्री विजय सरदेसाई यांनी चांदर गावातून जाणाऱ्या राज्य महामार्गाची अधिसूचना रद्द करण्याचा निर्णय सरकारने घेतला असल्याचे जाहीर केले होते.

तेव्हा कॉंग्रेसमध्ये असलेले कुंकळ्ळीचे आमदार क्लाफास डायस यांना शह देण्यासाठी ही चाल खेळण्यात आली होती. तथापि, पुढे गोवा फॉरवर्डला सरकारमधून बाहेर काढण्यात आले व डायस भाजपात गेले. त्यामुळे या मतदारसंघातील सत्तेची समीकरणे पार बदलून गेली. तेव्हा सत्तेच्या बाहेर असलेले आमदार डायस आज सत्ताधारी पक्षात आहेत, तर युरी आलेमाव सरकारच्या विरोधी बाजूने आहेत. 

युरी आलेमाव यांनी मंगळवारी घेतलेली पत्रकार परिषद राजकीय हेतुनेच होती, असा आरोप क्लाफास डायस यांनी केला आहे. या विषयावर ८ जानेवारी रोजी मी बैठक बोलावली आहे. चांदर व गिरदोलीचे सरपंच, सार्वजनिक बांधकाम खात्याचे अभियंता या बैठकीत उपस्थित असतील. सार्वजनिक बांधकाममंत्री दीपक पावसकर यांनाही या बैठकीत निमंत्रित करण्यात आले आहे. तेही बैठकीत उपस्थित राहण्याची शक्यता आहे. या बैठकीत राज्य महामार्ग विषयावर चर्चा करून निर्णय घेण्यात येईल, असे डायस यांनी सांगितले.

 मी आमदार असूनही यापूर्वी मला वगळून हा विषय सरदेसाई यांच्या मार्फत सरकार दरबारी नेण्यात आला होता. आलेमाव यांच्या सोबत पत्रकार परिषदेत उपस्थित राहून माझ्यावर आरोप करणाऱ्यांना मी आमदार असल्याची जाणीव आताच कशी झाली, असा सवालही डायस यांनी केला आहे.

संबंधित बातम्या