गोव्यातील जिल्हा पंचायतींसाठी डिसेंबरला मतदान

Polling for district panchayats in Goa on Saturday 12th December
Polling for district panchayats in Goa on Saturday 12th December

पणजी :  गोवा राज्य निवडणूक आयोगाने उत्तर गोवा आणि दक्षिण गोवा जिल्हा पंचायतींच्या ४८ जागांसाठी येत्या शनिवारी (ता.१२) मतदान घेतले जाईल, अशी घोषणा केली. या घोषणेसोबत राज्यभरात आचारसंहिता लागू झाली. उमेदवारांना प्रचाराची कोणतीही संधी न देता थेटपणे मतदानाच्या तारखेची घोषणा झाल्याने उमेदवार संभ्रमात पडले आहेत. २२ मार्च रोजी होणारी निवडणूक आता ८ महिन्यांनी घेत, मतदारांनी आपल्या मतदारसंघात कोण कोण उमेदवार होते, हे आत्तापर्यंत लक्षात ठेवावे, अशी आयोगाने अपेक्षा ठेवल्याचे आजच्या घोषणेतून दिसते. मतमोजणी १४ रोजी होणार आहे. ही निवडणूक १२ रोजी घेतली जाणार असल्याचे वृत्त सर्वप्रथम दै.‘गोमन्तक’ने २४ नोव्हेंबर रोजीच्या अंकात दिले होते. राज्य निवडणूक आयुक्त चोखाराम गर्ग यांनी पत्रकार परिषदेत या तारखांची घोषणा केली. यावेळी आयोगाचे सचिव मेल्विन वाझ, विशेष कार्य अधिकारी दुर्गाप्रसाद, सागर गुरव, आशुतोष आपटे, ब्रिजेश मणेरकर आदी उपस्थित होते. 


गर्ग यांनी सांगितले, मतदान सकाळी ८ ते सायंकाळी ५ यावेळेत होणार आहे. दुपारी ४ ते सायंकाळी ५ यावेळेत कोविडची लागण झालेल्या रुग्णांना मतदान करता येणार आहे. त्यावेळी त्यांच्यासाठी वेगळी व्यवस्था असेल. मतदान हे मतपत्रिकेवर शिक्का मारणे, या पद्धतीने होणार आहे. सांकवाळ येथील उमेदवार बिनविरोध निवडून आल्याने आणि नावेली येथील उमेदवाराचा मृत्यू झाल्याने तेथे मतदान होणार नाही. यामुळे दक्षिण गोवा जिल्हा पंचायतीच्या २३ जागांसाठीच मतदान होणार आहे. राज्यात १५ ठिकाणी १४ रोजी सकाळी ८ वाजल्यापासून मतमोजणीस सुरुवात होईल. आचारसंहिता १४ रोजी मध्यरात्रीपर्यंत अमलात राहणार आहे, अशी माहिती देऊन त्यांनी सांगितले, पोलिस अहवालानुसार १० मतदान केंद्रे संवेदनशील म्हणून ठरवण्यात आली आहेत. यापूर्वी २२ मार्च रोजी मतदान होणार होते. त्यापूर्वी निवडणूक अधिसूचित करणे, उमेदवारी अर्ज मागवणे, त्यांची छाननी करणे, उमेदवारी अर्ज माघारी घेणे, निवडणूक चिन्हांचे वाटप करणे, प्रचार करणे आदी टप्पे पूर्ण करण्यात आले आहेत. केवळ २२ मार्च रोजी मतदान होणे आणि त्यानंतर मतमोजणी करणे बाकी होते. त्यामुळे आता केवळ बाकी असलेला निवडणुकीचा टप्‍पा घेतला जात आहे. त्यात केवळ मतदान आणि मतमोजणीला स्थान आहे. प्रचार मार्चमध्येच संपला आहे.


उमेदवारांना आता सार्वजनिकरीत्या प्रचार करता येणार नाही. राजकीय पक्षांना मेळावे घेता येणार नाहीत असे नमूद करून त्यांनी सांगितले, की आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची दक्षता घेण्यासाठी आत्तापासून भरारी पथके कार्यान्वित केली आहेत. मतदानावेळी दोन मतदारांत सहा फुटांचे अंतर राहील, ते सॅनिटायझर आणि मुखावरणाचा वापर करतील याची दक्षता घेण्यात येणार आहे. मुखावरण न वापरणाऱ्यास मतदान केंद्रात प्रवेश नाकारला जाईल. मतदाराची ओळख पटवण्याची वेळ आली तर तेवढ्यापुरते त्याचे मुखावरण दूर करण्यास सांगण्यात येणार आहे. एका मतदान केंद्रावर जास्तीत जास्त ८०० मतदार असतील त्यामुळे तेथे गर्दी होण्याची वेळ येणार नाही नाही असे एका प्रश्नावर सांगून ते म्हणाले, बिहारमधील विधानसभा निवडणूक कोविड काळात घेतली गेली आहे. त्यातून काही नव्या प्रथा परंपरा तयार झाल्या आहेत. त्या पद्धतींचा येथे अवलंब केला जाईल. देशाच्या इतर भागात निवडणुका झालेल्या आहेत त्यामुळे गोव्यातही निवडणूक घेणे सुरक्षित आहे, याशिवाय कोविडचा प्रादुर्भाव घटत असल्याचे दिसते. एकूण साडेनऊ हजार कर्मचारी या मतदान प्रक्रियेत सहभागी असतील.
 

पंचायतमंत्री तोंडघशी!


जिल्हा पंचायत निवडणूक जानेवारीत घेतली जाणार आहे. आपण त्याविषयी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करू असे सांगणारे पंचायतमंत्री माविन गुदिन्हो हे राज्य निवडणूक आयोगाच्या आजच्या निर्णयाने तोंडावर आपटले आहेत. पंचायतमंत्र्यांना सरकारी निर्णयांची माहिती कशी नसते, हे यानिमित्ताने सर्वांसमोर आले आहे. यापूर्वीही त्यांनी जिल्हा पंचायत निवडणुकांविषयी वक्तव्य करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. आताच्यावेळी तर डिसेंबरमध्ये निवडणूक होणार नाही, तर ती जानेवारीत घेतली जाईल, असे पंचायतमंत्र्यांचे म्हणणे होते. मुख्यमंत्र्यांनी याबाबत संयमीपणे, सरकारने आपले मत दिले आहे, निर्णय आयोग घेईल असे सांगितले होते. मात्र त्यांच्यापुढे एक पाऊल टाकण्याचा प्रयत्न केलेल्या गुदिन्हो यांना आयोगाने आपल्या निर्णयाने दणका दिला.

एकूण उमेदवार  -  २००
उत्तर गोवा  -   १०४
दक्षिण गोवा  -  ९६

उत्तर गोवा
आरक्षित मतदारसंघ - १५
मतदान केंद्रे   -    ६४१
संवेदनशील केंद्रे    -    ६
मतमोजणी केंद्रे      -   ६

उत्तर गोवा उमेदवार
भाजप     -    २५
कॉंग्रेस   -      २१
राष्ट्रवादी   -  ३
मगो    -       ७
आप     -      ७
रा.स.प.    -   १
अपक्ष    -      ४०

दक्षिण गोवा उमेदवार
भाजप  -     १६
कॉंग्रेस  -     १६
राष्ट्रवादी  -  ०३
मगो   -       १०
आप    -      १३
रा.स.प.    -   ०
अपक्ष   -      ३८


एकूण मतदार     ७९१८१४
उत्तर गोवा     ४१८९२१
पुरुष         २०४५७१
महिला     २१४३५०
दक्षिण गोवा     ३७२८९३
पुरुष         १८०६५१
महिला     १९२२४२

उत्तर गोवा
आरक्षित मतदारसंघ  १५
मतदान केंद्रे       ६४१
संवेदनशील केंद्रे        ६
मतमोजणी केंद्रे         ६

दक्षिण गोवा 
आरक्षित मतदारसंघ   १५
मतदान केंद्रे        ५४६
संवेदनशील केंद्रे         ४
मतमोजणी केंद्रे         ९

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com