फोंडा नगराध्यक्षपदासाठी भाजप आणि मगो पक्षात रस्सीखेच

गोमन्तक वृत्तसेवा
शुक्रवार, 21 ऑगस्ट 2020

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा व्यंकटेश नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्षपदी कुणाची निवड होते. याबाबत फोंडावासीयांत सध्या चर्चा सुरू आहे.

फोंडा: फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदाच्या निवडणुकीत तिघेजण शर्यतीत असल्याची कबुली खुद्द या पालिकेचे एक नगरसेवक तथा फोंडा भाजप मंडळाचे अध्यक्ष शांताराम कोलवेकर यांनी दिली आहे. या शर्यतीत रितेश नाईक, शांताराम कोलवेकर तसेच विश्‍वनाथ दळवी यांची नावे असली तरी पक्षश्रेष्ठींशी चर्चा करूनच योग्य तो निर्णय घेतला जाईल, असेही शांताराम कोलवेकर यांनी स्पष्ट केले. 

फोंडा पालिकेच्या नगराध्यक्षपदाचा व्यंकटेश नाईक यांनी राजीनामा दिल्यानंतर नगराध्यक्षपदी कुणाची निवड होते. याबाबत फोंडावासीयांत सध्या चर्चा सुरू आहे. फोंडा पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुरवातीला मगो समर्थक प्रदीप नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र, भाजप व मगो समर्थक नगरसेवकांनीच प्रदीप नाईक यांच्याविरोधात अविश्‍वास आणल्यानंतर भाजप समर्थक व्यंकटेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली. एका वर्षानंतर ठरल्याप्रमाणे व्यंकटेश नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला असल्याने आता हे पद रिक्त झाले आहे. तरीपण नगराध्यक्षपदी कोण याचे कुतुहल फोंडावासीयांत आहे. 

मागच्या काही दिवसांत फोंड्यात राजकीय क्षेत्रात मोठ्या घडामोडी घडल्या होत्या. त्यात कॉंग्रेसचे आमदार रवी नाईक यांचे पुत्र रितेश नाईक व रॉय नाईक यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. फोंड्यातील भाजप मंडळाचे सदस्यही या भाजप प्रवेशावेळी राजधानीत उपस्थित होते. या भाजप प्रवेशाबाबतची कारणमिमांसा प्रत्येकजण आपल्यापरीने करीत असला तरी त्यामागचा उद्देश काय हे स्पष्ट होत असल्याचा राजकीय निरीक्षकांचे मत आहे. कॉंग्रेसमधून भाजपमध्ये प्रवेश करण्यामुळे एक तरी नगराध्यक्षपदाची माळ रितेश नाईक यांच्या गळ्यात पडणार की विधानसभेसाठी रितेश नाईक यांना संधी दिली जाणार, हा मात्र चर्चेचा विषय ठरला होता.

सातजणांचे बळ: ‘मगोप’
मगो पक्षाचे समर्थक प्रदीप नाईक यांची पालिका निवडणुकीत नगराध्यक्षपदी निवड झाली होती. मात्र नंतरच्या काळात मगोच्या समर्थक नगरसेवकांनी व्यंकटेश नाईक यांना समर्थन दिले. तरीपण फोंडा पालिकेत मगोचे सातजणांचे बळ असल्याचा दावा मगो पक्षाचे नेते तथा आमदार सुदिन ढवळीकर यांनी केला आहे. आम्हाला इतरांना समर्थन करण्याची गरजच नाही, इतरांनी आम्हाला समर्थन द्यावे, असे मगोच्या जेष्ठ कार्यकर्त्यांचे म्हणणे आहे. वास्तविक मगोचे आठ नगरसेवक आहेत. मात्र, हा आठवा नगरसेवक अन्य कुणाला समर्थन देत असल्याचेही सांगण्यात आले. अन्यथा वाट ‘क्‍लिअर’ असल्याचे मगोचे म्हणणे आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या