रवी नाईकांसह रितेशही कोरोना पॉझिटिव्ह; नागरिकांमध्येही भीती

गोमन्तक वृत्तसेवा
शनिवार, 22 ऑगस्ट 2020

सुरवातीला खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर तर आता माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक आणि त्यांचे पुत्र असलेले फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक यांच्यापर्यंत हा कोरोना पोचला आहे.

फोंडा: कधी नव्हे ती यंदा जगभर कोरोना महामारीमुळे बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.या  कोरोनाच्या महामारीचा संसर्ग सर्वसामान्यांपासून राजकारण्यांपर्यंत पोचला असून त्यात अंत्रुज महालातील पंचायत ते पालिका आणि आमदार ते खासदारापर्यंतच्या लोकप्रतिनिधींचा समावेश आहे. सुरवातीला खासदार तथा केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक, त्यानंतर माजी उपमुख्यमंत्री तथा मडकईचे आमदार सुदिन ढवळीकर तर आता माजी मुख्यमंत्री तथा फोंड्याचे आमदार रवी नाईक आणि त्यांचे पुत्र असलेले फोंड्याचे नगरसेवक रितेश नाईक यांच्यापर्यंत हा कोरोना पोचला आहे. पंचायत पातळीवरील प्रतिनिधींनाही कोरोनाचा फटका बसला असून सर्वसामान्य नागरिक तर भीतीच्या छायेत आहेत. 

केंद्रीय आयुषमंत्री श्रीपाद नाईक यांना इस्पितळात दाखल करण्यात आले आहे. आमदार सुदिन ढवळीकर यांच्यावरही इस्पितळात उपचार करण्यात आले तसेच आमदार रवी नाईक, नगरसेवक रितेश नाईक यांच्यावरही उपचार सुरू असून त्यांना होम कॉरन्टाईन करण्यात आले आहे. 

कोरोनाच्या या महामारीमुळे ऐन गणेशोत्सवात बाहेर पडणे आमदार तथा खासदारांना धोकादायक ठरले असून कोरोनाचा वाढता संसर्ग आणि सरकार पातळीवरील अपयश यामुळे सर्वसामान्य नागरिक धास्तावला आहे. विशेष म्हणजे फोंड्यात सध्या दोन आमदार आणि एक खासदार पॉझिटिव्ह मिळाल्यानंतर त्यांच्या कार्यकर्त्यांतही खळबळ उडाली होती, मात्र उपलब्ध माहितीनुसार स्थिती नियंत्रणात असल्याचे समजते. आपले नेते पॉझिटिव्ह झाल्याचे समजल्यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी आपली टेस्ट करवून घेतली आहे. पत्रकार तर नेहमीच प्रत्येक ठिकाणी पुढे असतो, त्यामुळे लोकप्रतिनिधी पॉझिटिव्ह झाल्यानंतर बऱ्याच पत्रकारांनीही टेस्ट करवून घेतली आहे. त्यात सर्वजण निगेटिव्ह आले आहेत. 

दरम्यान, यंदा गणेशोत्सवात कोरोना महामारीचे संकट दूर होऊ दे हाच गणरायासमोरील गाऱ्हाण्यातील पहिला विषय असेल, अशीही प्रतिक्रिया काही गणेश भक्तांनी दिली. दरम्यान, मंत्री गोविंद गावडे, आमदार रवी नाईक, सुदिन ढवळीकर तसेच सुभाष शिरोडकर यांनी सर्वांना गणेश चतुर्थीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. 

"तय''च्या दिवशी फोंड्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा
गणेश चतुर्थीच्या आदल्या "तय''च्या दिवशी फोंड्यातील बाजारात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र पहायला मिळाले. चतुर्थीच्या अगोदर दोन दिवस खरेदीसाठी थोडी बहुत लोकांनी काळजी घेतली होती. तरीपण चतुर्थीच्या आदल्या दिवशी मात्र लोकांनी खरेदीवर भर दिला. त्यात बऱ्याच जणांचे मास्क हनुवटीवर दिसले आणि सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडवत ही खरेदी झाल्याचे पहायला मिळाले.

नगराध्यक्ष निवडणूक लांबणीवर
फोंडा पालिकेचा एक नगरसेवकच कोरोनाबाधीत झाल्याने नगराध्यक्षपदाची निवडणूक लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळाले आहेत. नगराध्यक्ष निवडणुकीत सर्व नगरसेवक उपस्थित असणे क्रमप्राप्त आहे, मात्र रितेश नाईक सध्या पॉझिटिव्ह सापडल्यामुळे ही निवडणूक लांबणीवर पडल्यात जमा आहे.

 

संपादन: ओंकार जोशी

संबंधित बातम्या