माटोळी बाजार, मासेविक्रेते यांच्या नोंदणीसंबंधी निर्णय

प्रतिनिधी
बुधवार, 12 ऑगस्ट 2020

फोंडा पालिका क्षेत्रात मासळी विक्री करणाऱ्यांच्या नोंदणीसाठी फोंडा पालिकेने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली. या मासे विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क भरावे आणि पालिकेकडून ना हरकत दाखला घ्यावा.

फोंडा: फोंडा पालिका क्षेत्रात मासळी विक्री करणाऱ्यांची सरकार दरबारी नोंदणी करण्यासंबंधी तसेच यंदाच्या गणेशोत्सवासाठी माटोळीच्या सामानाचा बाजार फोंड्यात कुठे भरवावा यासंबंधीचे सर्वाधिकार पालिका मंडळाने पालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांना दिले आहेत. फोंडा पालिकेच्या आज (मंगळवारी) झालेल्या खास बैठकीत हे दोन्ही निर्णय घेण्यात आले.

 

या बैठकीला नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक, उपनगराध्यक्ष विश्‍वनाथ दळवी इतर नगरसेवक तसेच मुख्याधिकारी केदार नाईक उपस्थित होते. बैठकीत चतुर्थीचा माटोळी बाजार तसेच मासे विक्रेत्यांची सरकार दरबारी नोंद अशा दोन महत्त्वाच्या विषयांवर चर्चा झाली.

 

फोंडा पालिका क्षेत्रात मासळी विक्री करणाऱ्यांच्या नोंदणीसाठी फोंडा पालिकेने पुढाकार घेतला असून त्यादृष्टीने कार्यवाही सुरू करण्यात आली. या मासे विक्रेत्यांनी पालिकेकडे नोंदणीसाठी पाचशे रुपये शुल्क भरावे आणि पालिकेकडून ना हरकत दाखला घ्यावा. हा दाखला मत्स्योद्योग खात्याकडे सादर केल्यानंतर त्यांची नोंदणी होऊन त्यांना सरकारी योजनांचा लाभ मिळू शकेल, त्यासाठी ही नोंदणी करण्यात येणार आहे. मत्स्योद्योग खात्याच्या निर्देशानुसारच ही कार्यवाही केली जात असल्याचे नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक म्हणाले.

 

राज्यातील चतुर्थीचा सण जवळ आला असून माटोळी तसेच इतर सामानाचा बाजार तसेच लोकांची गर्दी आणि कोरोनाचा धोका यावर चर्चा झाली.

 

यंदा कोरोनाचा धोका असल्याने माटोळीचा बाजार तसेच गोवा बागायतदारमध्ये होणारी सामान खरेदीसाठीची गर्दी लक्षात घेऊन कोरोनाचा फैलाव अशा गर्दीमुळे होण्याचा धोका आहे. त्यामुळे राज्य व केंद्र सरकारच्या कोरोनासंबंधीच्या मार्गदर्शक तत्वानुसार यंदाचा माटोळीचा बाजार भरवण्यासाठी पालिकेचे मुख्याधिकारी तसेच कोविड व्यवस्थापन समितीचे फोंड्यातील अधिकारी केदार नाईक यांना पालिका मंडळाने सर्वाधिकार दिले आहे.

 

माटोळीचा हा बाजार कसा व कुठे भरवायचा यासंबंधीची पाहणी करण्याबरोबरच पोलिस व पालिकेच्या कर्मचाऱ्यांची मदतही या कामाला मिळणार असल्याचे नगराध्यक्षानी सांगितले.

 

नगराध्यक्ष व्यंकटेश नाईक यांचा राजीनामा

फोंडा पालिकेचे नगराध्यक्ष व्यंकटेश ऊर्फ दादा नाईक यांनी आपल्या पदाचा राजीनामा आज (मंगळवारी) पालिका संचालकांना सादर केला. वर्षभरापूर्वी व्यंकटेश नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड करण्यात आली होती. पालिका बैठकीनंतर हा राजीनामा देण्यात आला आहे.

 

फोंडा पालिकेची निवडणूक झाल्यानंतर सुरवातीला मगो पक्षाने आपले प्राबल्य दाखवत प्रदीप नाईक यांची नगराध्यक्षपदी निवड केली होती. पण, नंतरच्या काळात प्रदीप नाईक यांच्याविरोधात अविश्‍वास ठराव आणल्यानंतर भारतीय जनता पक्षाचे समर्थक व्यंकटेश नाईक यांची निवड नगराध्यक्षपदी झाली होती. वर्षभराच्या कार्यकाळानंतर आता व्यंकटेश नाईक यांनी आपला राजीनामा सादर केला असून आपल्याला कोणत्याच प्रकारचा वाद नको असल्याने आपण हा राजीनामा दिला असल्याचे सांगून आपल्या वर्षभराच्या कारकिर्दीत पालिकेच्या महत्त्वाच्या प्रकल्पांना चालना लावण्यात यशस्वी ठरलो असल्याचे त्यांनी नमूद केले.

 

फोंडा पालिकेत सुरवातीला मगो, भाजप व कॉंग्रेस अशा तिन्ही राजकीय पक्षांचे समर्थक निवडून आले होते. आता कॉंग्रेसचे समर्थक तिन्ही नगरसेवक भाजपमध्ये सामील झाल्याने नगराध्यक्षपदी रितेश नाईक यांची वर्णी लागते की, अन्य कुणाची अथवा व्यंकटेश नाईक यांना पुन्हा संधी मिळते याबाबत चर्चा होत आहे.

संबंधित बातम्या